- आष्ट्याचे शेतकरी संजीव माने यांचा पुढाकार
- तीनशे शेतकऱ्यांचा ग्रुप तयार
कोल्हापूर : उसाचे व्यवस्थापन कसे करावे, शिफारशीनुसार, तसेच पीकवाढीच्या अवस्थेनुसार कोणती खते द्यावीत, याबाबतची माहिती आता "व्हॉट्स ऍप'वर मिळणार आहे. एकरी दीडशे टन उत्पादनाचे उद्दिष्ट घेऊन कार्यरत असणारे सांगली जिल्ह्यातील आष्ट्याचे प्रगतिशील शेतकरी संजीव माने यांनी व्हॉट्स ऍपवर तीनशे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून वेळच्या वेळी शेतकऱ्यांना तातडीच्या सूचना एकाच क्लिकवर मिळणार आहेत.
व्हॉट्स ऍप या मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून शेतीसाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम श्री. माने यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. "टारगेट 151 टन' हे नाव या ग्रुपला देण्यात आले आहे. यात पन्नास शेतकऱ्यांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत. याबाबतच्या माहितीच्या आदानप्रदानाला 26 फेब्रुवारीपासून सुरवात झाली आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे.
गेल्या वर्षी एक हजार शेतकऱ्यांचा गट श्री. माने यांनी तयार केला होता. हे शेतकरी एकरी दीडशे टन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. या भागात साधारणतः आडसाली लागवडी जुलैच्या दरम्यान होतात. यामुळे मार्चपासून शेतकऱ्यांना माहिती देण्यास सुरवात केल्यास जमिनीच्या तयारीपासून ती देता येऊ शकते, म्हणून यंदा हा कार्यक्रम मार्चमध्येच सुरू करण्यात आला आहे. जमीन सुपिकता, माती परीक्षण, पाण्याच्या वेळा, बियाणे, हवामानानुसार व्यवस्थापन अशा सर्व सूचना याद्वारा देण्यात येत आहे. याबाबत संपर्क साधणाऱ्यांसाठी एक वेबसाइट तयार करण्यात येत आहे. त्याअगोदर व्हॉट्स ऍपद्वारे माहिती देण्याचा प्रयोग सुरू करण्यात येत आहे.
मोबाईलमध्ये कॅमेऱ्यासह व्हॉट्स ऍपची सुविधा असणारे शेतकरी उसावर एखाद्या कीड- रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याचा फोटो काढून या ग्रुपवर तत्काळ पाठवून माहिती मागवू शकतात. तसेच अशा समस्या आल्यास श्री. माने यांच्याकडून हा फोटो तज्ज्ञांना पाठवून तज्ज्ञांनी दिलेली माहिती पुन्हा या ग्रुपवर टाकण्यात येणार आहे. याचा फायदा ग्रुपच्या इतर शेतकऱ्यांनाही होऊ शकतो.
श्री. माने यांनी सांगितले, की "टारगेट 151 टन' या नावाने हा ग्रुप आम्ही तयार केला आहे. या ग्रुपवर फक्त उसाबाबतच्या अडचणीत मांडल्या जाव्यात, त्यावर चर्चा व्हाव्यात, अशी नम्र सूचना मी केली आहे. त्याला शेतकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. या ग्रुपला मी "विनम्र' आणि "सोज्वळ ग्रुप' असेही नाव दिले आहे. उसाच्या व्यवस्थापनाबाबतच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी काम करणार असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...