सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची ओळख पटविण्यात अमेरिकेतील साऊथ डाकोटा राज्य विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. या विकरांना नियंत्रित केल्यास सोयाबीनची सहनशीलता वाढणे शक्य आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय सोयाबीन तंत्रज्ञान केंद्रातील संशोधनानुसार, वाढत्या उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट येत असून, नफ्याचे प्रमाण घटत आहे.
वाढत्या तापमानामध्ये तग धरू शकतील अशा सोयाबीन जाती विकसित करण्यासाठी सातत्याने संशोधन केले जात आहे. मात्र पारंपरिक पद्धतीमध्ये नव्या जाती विकसित करण्यासाठी अधिक वेळ लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी साऊथ डाकोटा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये उष्णता आणि दुष्काळ सहनशीलतेसंदर्भात मूलद्रव्यीय पातळीवर संशोधन करण्यात येत आहे. विद्यापीठातील, जीवशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापक जय रोहिला या समस्येबाबत 2010 पासून संशोधन करीत आहेत.
सोयाबीनमधील कोरड्या, उष्ण वातावरणामध्ये तग धरण्याच्या क्षमतेसाठी कारणीभूत मूलद्रव्यीय यंत्रणेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्या सोबत मिनिसोटा विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार जीम ओर्फ कार्यरत आहेत. जीम यांनी सोयाबीनच्या दोन सहनशील जाती व एक संवेदनशील जात रोहिला यांना संशोधनासाठी दिली आहे.
संशोधनाबाबत रोहिला यांनी सांगितले, की दुष्काळ व उष्णता सहनशीलतेसाठी गुंतागुंतीची व एकापेक्षा अधिक जनुकांचा समावेश असलेली यंत्रणा सोयाबीनमध्ये कार्यान्वित असते. सोयाबीन पिकाच्या बाह्य स्थिती आणि अंतर्स्थितीमध्ये होणाऱ्या बदलांची सांगड घालण्याचे काम या प्रकल्पात करण्यात येत आहे. त्यासाठी संवेदनशील व सहनशील जातींतील जनुकीय पातळीवर तुलनात्मक अभ्यास करण्यात येत आहे.
जनुके प्रथिनांच्या कार्यक्षमतेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे रासायनिक बदल घडून वातावरणातील परिस्थितीला वनस्पती वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. अर्थात, दुष्काळ सहनशीलतेसाठी एकापेक्षा अधिक जनुकांचा अभ्यास केला जात आहे. सध्या आयुध दास यांना 90 प्रथिने आढळली आहेत. ही प्रथिने विकरांच्या साह्याने वनस्पतीच्या चयापचयाच्या प्रक्रियेवर परिणाम करतात. तसेच कर्बोदके, लिपिड आणि अमिनो आम्लांसह विविध घटकांच्या निर्मिती परिणाम करतात.
दुष्काळाच्या स्थितीमध्ये पाण्याचा ताण निर्माण होताच, सहनशील जातीमध्ये प्रथम पर्णरंध्रे बंद होतात. वनस्पतीतील पाणी वातावरणामध्ये जाण्याचे प्रमाण कमी होते. अर्थात, त्याचे परिणाम वनस्पतीच्या वाढीवर होतात. कारण पर्णरंध्रे बंद झाल्याने किंवा लहान झाल्याने वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक कार्बन- डाय- ऑक्साइड कमी प्रमाणात शोषला जातो. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक कर्बोदकांची निर्मिती कमी होते.
विकरांच्या पातळीची तुलना केली असता, संशोधकांना दोन विकरांची ओळख पटली आहे. ही विकरे उष्णतेमुळे निर्माण झालेल्या ताणस्थितीमध्ये काम करतात. या दोन विकरांना नियंत्रित केले असता वनस्पती उष्णतेला सहनशील बनू शकते. अद्याप या संदर्भात अधिक संशोधन करण्यात येणार असून, सोयाबीनची सहनशीलता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दास यांनी सांगितले.
1) प्रयोगशाळेत सोयाबीन लागवड केलेल्या कुंडीतील मातीमधील ओलाव्याचे प्रमाण तपासताना संशोधक विद्यार्थी आयुध दास. पर्यावरणातील दुष्काळ आणि वाढत्या तापमानामध्ये तग धरण्याची क्षमता वाढविण्यासाठी कारणीभूत घटकांचा शोध मूलद्रव्यीय पातळीवर घेण्यात येत आहे.
(स्रोत - साऊथ डाकोटा स्टेट युनिव्हर्सिटी)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबत...
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापना...