অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उन्हाळी घेवडा आणि गवार

उन्हाळी घेवडा आणि गवार

उन्हाळी हंगामातील कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी पाण्यात शेंगवर्गीय भाजीपाल्याचे पीक म्हणजे घेवडा.  द्विदल वर्गातलं पीक फेरपालटीला आणि बहुविध पीक पद्धतीला अनुकूल असल्यानं आर्थिकदृष्ट्या तर परवडतेच शिवाय जानिमिची सुपीकता टिकवण्यासाठी जास्त उपयुक्त ठरते.

घेवड्याच्या कोवळ्या शेंगाची भाजी, पक्व दाण्याची उसळ, वाळलेल्या दाण्याचा भाजीसाठी आणि पीठ करून बेकरी पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करता येतो.  शेंगामध्ये अ, ब ही जीवनसत्त्वे, खनिजे, लोह आणि चुना, तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत.  याच्या झुडूपवर्गीय जातीत फुले सुयश, फुले सुरेखा, कंटेन्डर, पुसा पार्वती, अरका कोमल, पंत अनुपमा, जंपा, व्हीएलबोनी – १, फाल्गुनी, सेविल या शेंगासाठी आणि केंटुरी वंडर आणि पुसा हिमलता या वेलवर्गीय जाती आहेत.

घेवडा

अशा या उन्हाळी घेवड्याची लागवड उत्तम निचऱ्याच्या मध्यम खोल सेंद्रिययुक्त अशा जमिनीत ४० बाय २० सें. मी.  अंतरावर फेब्रुवारीत करावी.  एकरी १५ ते २० किलो बियाणे पुरेसे होते.  या बियाण्याला रायझोबियम या जिवाणूंची प्रक्रिया करून टोकल्यास उगवण चांगली होउन उत्पादन वाढते.  पूर्वमशागतीच्या वेळी एकरी १० – १२ टन शेणखत टाकावे.  त्यानंतर पेरणीच्या वेळी एक गोणी युरिया + दोन गोण्या सुपर फॉस्फेट + १|| गोण्या पोटॅश वापरावे.

त्यानंतर महिन्याच्या आत एक गोणी युरिया वापरावा.  योग्य अवस्थेत म्हणजे – वाढीची, शेंगाची, फुलांची, शेंगा लागण्याच्या तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पेंडिमिथिलीन हे तणनाशक पीक पेरल्यानंतर उगवणीपूर्वी फवारावे.  पीक तणविरहित ठेवावे.  फुले लागताना आणि त्यानंतर ८ दिवसांनी १० पीपीएम तीव्रतेचे एन. डी. एम. या संजीवकाच्या दोन फवारण्या कराव्यात.  माव्यासाठी मॅलॅथिआन शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी ५ टक्के कार्बारील धुरळावी खोडमाशीसाठी सायपरमेथ्रीन फवारावे.  बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी म्हणजे मर रोग होत नाही.  मोझॅकच्या नियंत्रणासाठी फुलकीडीचं नियंत्रण करावे त्यासाठी फॉस्फोमिडान फवारावे.  लागवडी नंतर १|| ते २ महिन्यांनी तयार झालेल्या कोवळ्या लुसलुशीत शेंगा तोडून विक्रीसाठी पाठवाव्यात.  ३ – ४ तोडण्या मिळतात.  ओल्या शेंगाचे उत्पादन दरएकरी साधारणतः ६० ते ८० क्विंटल मिळते.  उन्हाळ्यात बाजारभाव चांगला असल्याने एकरी ५० हजारांहून १ लाखापर्यंत उत्त्पन्न घेतल्याच्या काही यशोगाथा आहेत.  जमिनीची सुपीकता आणि आर्थिक लाभ या दोन्ही गोष्टी मिळत असल्याने उन्हाळी घेवड्याचे पीक घ्यावे.

गवार

गवार हे शेंगवर्गीय भाजीचे पीक आहे.  हे द्विदल वर्गातले, फेरपालटीचे आणि बहुविध भाजीपाला पीक पद्धतीला अनुकूल आहे.

गवारीच्या शेंगांना वर्षभर मागणी असल्याने दरभाव चांगलाच मिळतो.  गवारीत अ, क हि जीवनसत्वे लोह या खनिजाचे प्रमाण जास्त आहे.  गवार हे उष्ण, दमट हवामानात येणारे पीक आहे.  १० ते ३० अंश सें.ग्रे. तापमान उत्तम असल्याने खरीप आणि उन्हाळी या हंगामात गवार चांगली येते.  सर्व प्रकारच्या निचऱ्याच्या ७.५ ते ८ सामू असणाऱ्या भुसभुशीत तसेच सेंद्रीययुक्त एकरी ८ ते १२ टन शेणखत घालून उत्तम प्रकारे पूर्व मशागत करून तयार केलेल्या जमिनीत गवारीचे पीक जरूर घ्यावे.

गवारीची स्थानिक म्हणजे गावरान ही जात गिऱ्हाईक जास्त पसंत करतात.  पुसा सदाबहार, पुसा मोसमी आणि शरद बहार इतरही काही खासगी कंपनीच्या जाती आहेत.  अनुभवानुसार जातीची निवड करावी.

चांगल्या निचऱ्याच्या भुसभुशीत ८ ते १२ टन शेणखत घातलेल्या सेंद्रिययुक्त जमिनीची पूर्वमशागत करून पेरून, टोकून अगर सरीवर ४५ बाय २० सें.मी. अंतरावर टोकण करावी.  टाकते वेळी १५० किलो १९:१९:१९ अगर युरिया सुपर फॉस्फास्फेट ही खाते घालावीत.  महिन्याभराने १ गोणी युरिया द्यावा.  पाणी कमी लागत असले तरी फुले लागल्यानंतर ओलावा कमी पडू देऊ नये.

या गवारीवर मावा- तुडतुडे येतात.  १२ मि.लि. १०० डायमेथीएट १० लिटर पाण्यातून फवारावे.  भूरीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम अगर कॅलक्झीन १० मि.लि. १० लिटर पाण्यातून फवारावे. बियाण्याला प्रतिकिलोस ३ ग्रॅम थायमेट चोळल्यास मर रोग होत नाही.  कॉपर ऑक्झिरा क्लोराईडही फवारावे.

भाजीसाठी हिरव्या कोवळ्या लुसलुशीत पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची तोडणी करावी.  शेंगा जून होऊ देऊ नयेत.  ३ ते ४ तोडण्या मिळतात.  हिरव्या शेंगांचे जातीनिहाय एकरी ४० ते ५० क्विंटल उत्पादन मिळते.  आर्थिक आणि जमिनीची सुपीकता या दोन फायद्यामुळे गवारीचे पीक अवश्य घ्यावे.

माहिती लेखक: प्रल्‍हाद यादव

स्‍त्रोत - कृषी प्रवचने

अंतिम सुधारित : 8/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate