(गु. पानकोबी, कोब्जी हिं.बंद गोभी; क.कोबीगुड्डी; इं. कॅबेज;लॅ. ब्रॅसिका ओलेरॅसिया प्रकारकॅपिटॅटा; कुल-क्रुसिफेरी). ही ⇨औषधी मूलतः भूमध्यसामुद्रिक प्रदेशातून यूरोपात गेली व नंतर तिचा इतरत्र प्रसार झाला. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांच्या वापरात असलेली ही एक पुरातन भाजी आहे. तिची शारीरिक लक्षणे⇨क्रुसिफेरीकुलात वर्णन केल्याप्रमाणे आहेत.
कोबीचा गड्डा ही त्या वनस्पतीची खूप मोठी कळी असल्याने ती अनेक जाड मांसल पानांची बनलेली असते. तिचा सॅलड, उकडून, लोणचे, सूप तसेच निर्जलीकरण करून अशा विविध स्वरूपात उपयोग करतात. शांटुंग हा चिनी प्रकार खाण्यास चांगला असतो. तसेच लाल कोबीचाही एक प्रकार आहे. कोबीत भरपूर खनिजे व क१, ब१, ब२आणि अ ही जीवनसत्त्वे असतात.गुरांच्या व कोंबड्यांच्या खाद्यातही कोबीचा उपयोग करतात. कोबीचे तुकडे, काप वा ठेचा तिच्याच रसात आंबवून आणि थोडे मीठ घालून साउरक्राउट नावाचा खाद्यपदार्थ तयार करतात. हा रशिया, जर्मनी व अमेरिका येथे अतिशय लोकप्रिय आहे. कोबीतील घटकद्रव्यांची सर्वसाधारण टक्केवारी पुढीलप्रमाणे आढळते:पाणी ९०·२, प्रथिन १·८, वसा (स्निग्ध पदार्थ) ०·१, तंतू १·०, कार्बोहायड्रेटे ६·३, खनिजद्रव्ये ०·६, कॅल्शियम ०·०३ आणि फॉस्फरस ०·०५.
कोबीचे पीक सापेक्षतः थंड आर्द्र हवामानात चांगले येते. भारतात त्याची मुख्यतः हिवाळी पीक म्हणून लागवड करतात. डोंगराळ भागात वसंत ऋतूत व उन्हाळ्यात त्याची लागवड करतात. काही भागांत त्याची दोन पिकेही घेतात.
या पिकाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. हळव्या (लवकर तयार होणाऱ्या) पिकाला रेताड चिकण जमीन चांगली, पण भरपूर उत्पन्नासाठी त्याची लागवड भारी जमिनीत करतात. फार अम्लधर्मी जमिनीत त्याची वाढ चांगली होत नाही. या पिकाला जमिनीचे ५·५-६·५ हेpH मूल्य इष्टतम होय [→ पीएच मूल्य].
पानांचा आकार, आकारमान व रंग तसेच गड्ड्याचा आकार, आकारमान, रंग व घट्टपणा यांवरून कोबीचे प्रकार ठरवितात.
(१) गोल गड्डा : गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, कोपनहेगन मार्केट.
(२) पसरट गड्डा : पुसा ड्रमहेड.उन्हाळी पिकासाठी रोप तयार करताना फार काळजी घेतात. जरूर पडल्यास रोप उगवेपर्यंत वाफ्यावर बारदानाचे आच्छादन घालतात. वाढ जोमदार व्हावी म्हणून अमोनियम सल्फेट देतात आणि रोग व किडीपासून बचाव करण्यासाठी कवकनाशके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा नाश करणारी द्रव्ये) आणि कीटकनाशके फवारतात. हळव्या पिकासाठी हेक्टरी ५०० ग्रॅ. व गरव्या पिकासाठी ३७५ ग्रॅ.बी लागते.
दोन वेळा उभेआडवे २० सेंमी .खोल नांगरून व कुळवून भुसभुशीत व स्वच्छ केलेल्या शेतास हेक्टरी २५ टन शेणखत देतात.लागवड ३·५×१·५ मी. वाफ्यात अगर ६०–७५ सेंमी. अंतरावर सरीवर करतात. ४–६ आठवड्यांत रोपे कायम जागी लावण्यास तयार होतात. दोन रोपांतील अंतर सामान्यतः वाफ्यात ६० सेंमी. आणि सरीला ४५ सेंमी ठेवतात. दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर संध्याकाळी लागवड करतात व लगेच पाणी भरतात.
कोबीची मुळे जमिनीत पाच–सात सेंमी.खोल जातात. त्यामुळे त्याला खुरपण्यासारखी हलकी मशागत मानवते. खोल मशागत केल्यास मुळांना इजा पोहोचते.
(१) काळी माशी :(ॲथॅलिया प्रॉक्सिमा). या किडीचा उपद्रव ऑक्टोबर–मार्च दरम्यान होतो. त्यासाठी पायरेथ्रमाची फवारणी करतात. [→ काळी माशी].
(२) रंगीत ठिपक्याचे ढेकूण:(बॅग्रॅडा पिक्टा). हे पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे पिवळी पडतात. ऑक्टोबर–मार्चमध्ये हे क्रियाशील असतात. बंदोबस्तासाठी १०% बीएचसी पिस्कारतात.
(३) मावा:(ब्रेव्हिकॉरिने ब्रॅसिकी). माव्याचा या पिकाला फारच उपद्रव होतो. पीक विक्रीस तयार झाल्यावर माव्याने प्रत कमी होते. प्रतिकारासाठी नियमित एंड्रिन, मॅलॅथिऑन अगर सार्वदैहिक कीटकनाशकाची फवारणी करतात.
(४) गड्डा पोखरणारी अळी:(लिरिओमायझा ब्रॅसिकी). ही गड्डे तयार व्हायला लागल्यावर दिसते. ती सूर्यास्तानंतर कार्यशील असते. ती गड्ड्यांना भोके पाडते आणि त्यात राहते. संध्याकाळी अॅझिन्फॉससारख्या कीटकनाशकाची फवारणी करतात.
(१) घाण्यारोग :हाझँथोमोनस कँपेस्ट्रिसया सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्याचा प्रसार बियांद्वारे होतो. तेव्हा बंदोबस्तासाठी बियांस जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) पारायुक्त कवकनाशकाची २५ – ३० मिनिटे प्रक्रिया करून रोप टाकतात. तसेच बियांवर उष्णजल प्रक्रिया (५००सें. तापमानाला २५–३० मिनिटे) करतात. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर पिकास कमी व जास्त अंतराने पाणी देतात. तीव्र रोगाने गड्डे अजिबात तयार होत नाहीत.
(२) मुळांवरील गाठी:हाप्लास्मोडिओफोरा ब्रॅसिकीया कवकामुळे होतो. अम्लयुक्त जमिनीत (उदा., महाबळेश्वर) हा आढळतो. मुळांना होणाऱ्या इजेतून त्यांचा वनस्पतीत प्रवेश होतो. त्यामुळे मुळांना वाटोळ्या व लांबट गाठी येतात. पाने मलूल होऊन शेवटी झाड मरते. या रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी दीर्घ मुदतीची फेरपालट करतात आणि रोपे जलविद्राव्य पारायुक्त कवकनाशकाच्या विद्रावात बडुवून लावतात.
(३) करपा:हाआल्टर्नेरिया ब्रॅसिकीकोला या कवकामुळे होतो. कवकाचे बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) व कवकजाल रोगट पाल्यात जिवंत राहतात. बियांवरही कवक बीजाणू असल्यामुळे उगवण कमी होते. रोगामुळे पानांवर लहान काळ्या रंगाचे ठिपके पडतात व ते वाढून वर्तुळाकार होतात. रोगाचे बीजाणू हातास चिकटतात व त्यांचा हवेतून फैलाव होतो. गड्डे साठवणीत काळे पडतात.
लेखक- पाटील, पां. ल. क्षीरसागर, ब. ग.,पाटील, ह.चिं.
संदर्भ: Choudhury, B.Vegetables, New Delhi, 1967.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी, फ्लॉवर (फुलकोबी), नव...
बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी, फ्लॉवर आणि ब्र...
या विभागात कोबी आणि फूलकोबी या पिकाविषयी माहिती द...