অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोबी व फूलकोबी

प्रस्तावना

कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये जवळ जवळ सर्व जिल्‍हयात या पिकाची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये कोबी पिकाखाली अंदाजे 7203 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. तर फुलकोबी या पिकाखाली अंदाजे 7000 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या पिकांमध्‍ये फॉस्‍फरस, पोटॅशियम, सल्‍फर, चुना, सोडीयम, लोह ही खनिज द्रव्‍ये असून अ ब क ही जीवनसत्‍वे मुबलक प्रमाणात असतात. त्‍यामुळे या भाजीपाला पिकांना आहारात महत्‍व आहे.

हवामान

या पिकांना हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते. फूलकोबीच्‍या जाती तापमानाच्‍या बाबतीत अधिक संवेदनशील असल्‍यामुळे त्‍यांची निवड त्‍या त्‍या हवामानाच्‍या गरजेनुसार करावी.

जमीन

रेताड ते मध्‍यम काळी निच-याची जमीन या पिकास लागवडीस योग्‍य आहे. जमिनीचा सामु 5.5 ते 6.6 च्‍या दरम्‍यान असावा.

पूर्वमशागत

जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुळवाच्‍या पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भुसभुशित करावी. जमिनीत20 ते 30 टन हेक्‍टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे. जमीनी सपाट करून या भाज्‍यांच्‍या लवकर व उशिरा येणा-या जातींच्‍या लागवडीस अनुसरून अनुक्रमे 45 व 60 सेमी अंतरावर स-या तयार करून घ्‍याव्‍यात. कोबी या पिकाची लागवड सपाट वाफयावर सुध्‍दा केली जाते. त्‍याकरिता जमिनीच्‍या उताराप्रमाणे योग्‍य अंतरावर वाफे तयार करावेत.

लागवडीचा हंगाम –

या पिकांची लागवड सप्‍टेबर, आक्‍टोबर महिन्‍यात करतात.

बियाण्‍याचे प्रमाण

हेक्‍टरी 0.600 ते 0.750 किलो बियाणे लागते. पेरणीपुर्वी बी गरम पाण्‍यात 50 अंश सेल्सिअस तापमानास अर्धा तास किंवा स्‍ट्रेप्‍टोसायक्‍लीन च्‍या 100 पीपीएम द्रावणात 2 तास बुडवावे. व नंतर बी सावलीत सुकवावे.

लागवड

या पिकाची रोपे गादी वाफयावर तयार करतात. वाफयाच्‍या रूंदीस समांतर 12  ते 15 सेमी अंतरावर रेषा ओढून बियाणे पातळ पेरावे व बियाणे मातीने अलगद झाकावे.

बियांची उगवण होईपर्यंत झारने पाणी द्यावे. बी पेरल्‍यापासून 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीस तयार होतात. लागवडीपूर्वी सरी वरंबे अथवा वाफे यांना खतांचा मात्रा द्यावी. लवकर येणा-या जातींकरीता 45 बाय 45 सेमी वर तर उशिरा येणा-या जातींना 45 बाय 60 सेमी किंवा 60 बाय 60 सेमी अंतरावर लागवड करावी. रोपांची लागवड करण्‍यापूर्वी रोपे 10 लिटर पाण्‍यात 36 इसी मोनोक्रोटोफॉस टाकून या द्रावणात बुडवून घ्‍यावी.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

कोबी पिकास लागवडीपूर्व 80 किलो नत्र 80 किलो स्‍फूरद व 80 किलो पालाश द्यावे व लागवडीनंतर 1 महिन्‍याने 80 किलोचा नत्राचा दुसरा हप्‍ता द्यावा. तसेच फुलकोबीसाठी 75 किलो नत्र 75 किलो स्‍फूरद आणि 75 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्‍याने 75 किलो नत्राचा दुसरा हप्‍ता द्यावा.

लागवडीनंतर तिस-या दिवशी आाणि नंतर पुरेसा ओलावा राहील. अशा अंतराने जमिनीचा मगदूर पाहून पाण्‍याचा पाळया द्याव्‍यात. कोबी व फूलकोबीचे गडडे निघू लागल्‍यापासून गडडयांची वाढ होईपर्यंत भरपूर पाणी द्यावे व नंतर हलकेसे पाणी द्यावे.

आंतरमशागत

शेत 2 ते 3 खुरपण्‍या देऊन तणविरहीत करावे. खुरपणी करताना रोपांच्‍या बुंध्‍याशी मातीचा आधार द्यावा म्‍हणजे रोपे कोलमडत नाही व रोपांची वाढ चांगली होते. फूलकोबीच्‍या गडडयांची पांढरी शुभ्र प्रतीक्षा तयार होण्‍याकरिता गडडे काढणीपूर्वी 1 आठवडाभर गडडयाच्‍या आतील पानांची झाकून घ्‍यावे. त्‍यामुळे सूर्यप्रकाशामुळे होणारी हानी टाळली जाते.

किड व रोग

कोबीवर्गीय भाज्‍यांना मावा तुडतुडे फूलकिडे कोबीवरील अळी कॅबेज बटर फलाय असे विविध किडींचा तसेच ब्‍लॅक लेग, क्‍लब रूट, घाण्‍या रोग, रोपे कोलमडणे, लिफ स्‍पॉट या रोगांचा प्रादुर्भाव होतो.

किडींच्‍या बदोबस्‍तासाठी रोपवाटीकेतीील रोपांपासून ते लागण झालेल्‍या भाज्‍यांवर एन्‍डोसल्‍फान 35 सीसी 290 मिली किंवा फॉस्‍फोमिडॉन 85 डब्‍ल्‍यू एस सी 60 मिली किंवा मॅलेथिऑन 50 सीसी 250 मिली 250 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारावे. किडी व रोगाचे एकत्रितरित्‍या नियंत्रण करण्‍यासाठी मॅलॅथिऑन 50 सीसी 500 मिली अधिक कॉपर ऑक्‍झक्‍लोराईड 50 डब्‍ल्‍यूपी 1050 ग्रॅम् किंवा डायथेम एम 45, 500  लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. वरील किटक नाशकांच्‍या 2 ते 3 फवारण्‍या 10 ते 12 दिवसांच्‍या अंतराने कराव्‍यात.

काढणी व उत्‍पादन

जातीपरत्‍वे कोबी 2ण्‍5 ते 3 महिन्‍यात तयार होतो. तयार गडडा हातास टणक लागतो. तयार गडडा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्‍यावर तो फूटून नुकसान होण्‍याचा संभव असतो. म्‍हणून तो वेळीच काढून घ्‍यावा. फूलकोबी चा गडडा पिवळसर पडण्‍यापूर्वी काढावा.

कोबीचे 200 ते 250 क्विंटल तर फूलकोबीचे 100 ते 200 क्विंटल हेक्‍टरी उत्‍पादन घेता येते.

स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate