অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परसबाग भाजीपाला

कोकणासारख्या काही भागात पावसाळ्यामध्ये खूप जोरदार पाऊस पडत असतो. अशा ठिकाणी पालेभाज्यांची लागवड करणे अवघड होते. अशा वेळी पॉलिटनेल तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने परसबागेतील पालेभाज्या लागवडीसाठी पॉलिटनेल तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केली आहे. या पद्धतीने कमी क्षेत्रात मेथी, कोथिंबीर, पालक व इतर पालेभाज्यांची लागवड करता येते. घरच्या घरी बनविता येणारे अतिशय कमी खर्चाचे असे हे पॉलिटनेल आहे.

पॉलिटनेल बनविण्याची पद्धती

दोन मीटर लांब बांबूच्या दोन जाड पट्ट्या घ्याव्यात. त्याला एक मीटर लांब आडव्या दोन पट्ट्या तारेने बांधून आयताकृती साचा तयार करावा. यानंतर ८ फूट लांबीच्या ९ बांबूंच्या पट्ट्या अर्धवर्तुळाकार वाकवून कमान तयार करून घ्यावी. आता १० फूट लांबीच्या सात बांबूच्या पट्ट्या घेऊन त्या कमानीला काटकोनात एकमेकांना समांतर बांधाव्यात. त्यामुळे दोन पट्ट्यांमध्ये एक फुटाचा चौरस तयार होईल. यानंतर तयार झालेल्या कमानीवर २०० मायकॉन जाडीचा प्लॅस्टिक पेपर टाकून झाकून घ्यावे.

भाजीपाला लागवड

  • मेथी, पालक, कोथिंबीर, लाल माठ अशा नाजूक पालेभाज्यांचे उत्पादन घेऊ शकतो.
  • लागवडीसाठी प्रथम १० बाय २ फूट आकाराचा व १० सें. मी. उंचीचा गादीवाफा तयार करावा.
  • गादी वाफ्यावर ५ किलो चांगले कुजलेले कंपोस्ट खत व १५० ग्रॅम ट्रायकोडर्मा यांचे मिश्रण टाकावे. यावर १० सें. मी. अंतराने आडव्या रेघा पाडून वर सांगितलेल्या पालेभाज्यांच्या बिया पेराव्यात.
  • अधिक पावसाच्या वेळी पॉलिटनेलने गादीवाफा झाकावा. पाऊस नसताना हे पॉलिटनेल काढून बाहेर ठेवावे.
  • बियांच्या पेरणीपासून या भाज्या २५ ते ३० दिवसात काढणीला तयार होतात.

पॉलिटनलचे फायदे

  • पावसापासून रोपांचे संरक्षण.
  • उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण.
  • कोंबड्या, कुत्रे व गुरांपासून संरक्षण.
  • पावसाळ्यातही ताज्या हिरव्या भाजीपाल्याची उपलब्धता शक्य.

खर्च

  • एकूण २०० ते ३०० रुपयांमध्ये हे लहानसे पॉलिटनेल उभारता येते.
  • या पॉलिटनेलचा वापर करून परसबागेत वर्षाकाठी ८ वेळा पालेभाज्या पेरता येतात व त्यातून हमखास उत्पादन घेता येते.
  • या पॉलिटनेलमधून वर्षाकाठी ३० ते ३२ किलो पालेभाज्यांचे उत्पादन मिळते. प्रति किलो ४० रु. भावाने एकूण १२०० रुपयांचे उत्पादन मिळू शकते.

 

संपर्क - रूपाली देशमुख, ८६९८७०११७७.
(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल. ता. डहाणू, जि. ठाणे. येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate