অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भेंडीवरील किडी – रोग

भेंडीवरील किडी – रोग

 

भारतात भेंडीपिकाखालील क्षेत्र भाजीपाला पिकांत सर्वात जास्त म्हणजे जवळपास साडेचार लाख हेक्टर एवढे आहे.  महाराष्ट्र राज्यात हे क्षेत्रफळ साडेचार हजार हेक्टर पेक्षा अधिक आहे. परंतु राज्यातील उत्पादकता देशातील सरासरी उत्पादकतेपेक्षा अत्यल्प आहे.

भेंडी हे पिक तिन्ही हंगामात घेतले जात असल्यामुळे या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. याचा प्रत्यक्ष परिणाम या पिकाच्या खालावलेल्या उत्पादकतेतून दिसून येतो.  शेतकरी बांधवांद्वारे भेंडी पिकाच्या विविध प्रकारच्या जातींची लागवड केली जाते.  अधिक उत्पादनासोबत किडी व रोगांना सहज बळी पडणा-या वाणांमुळे या पिकावर किडी – रोगांचा संसर्ग मोठया प्रमाणावर दिसून येतो.  एकूणच या पिकावरील प्रमुख किडी व रोगांविषयीची ओळख तसेच त्यांच्या नियंत्रणाविषयीची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे.

भेंडीवरील प्रमुख किडी

मावा  (मायझस परसिकी, ऑफिस  गॉसीपी)

लक्षणे :

पिल्ले व प्रौढ पानाखाली राहून पानातील रस शोषून घेतात प्रादुर्भावग्रस्त स्थितीत    पानांच्या कडा खालील बाजूस वळतात या किडीद्वारे शरीराबाहेर विसर्जित केलेल्या चिकट- गोड पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होवून झाडाची वाढ खुंटते.

नियंत्रण :

अ)   नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा

ब) सर्व्हेक्षणानंतर प्रतिपान प्रतिझाड १० मावा कीटक आढळल्यास एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १५ मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १२ मि.ली. यापैकी एका किटक- नाशकाची १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.

क) विद्यापिठाद्वारे शिफारशीत पिकसंरक्षण वेळापत्रकाचा अवलंब करावा.

तुडतुडे :( अॅमरास्का डीव्हॅस्टन्स, अॅमरास्का बिगुटूला बिगुटूला )

लक्षणे :

पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात.  प्रादुर्भावग्रस्त परिस्थितीमध्ये पानांच्या कडा वरील बाजूस दुमडतात.  पानांवर लालसर तांबडे डाग दिसून येतात ( हॉपर बर्न )

नियंत्रण :

अ) सर्व्हेक्षणानंतर झाडावर प्रतिपान ५ पिल्ले अथवा प्रौढ आढळल्यास एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ब) विद्यापिठाद्वारे शिफारशीत पिक संरक्षण वेळापत्रकाचा अवलंब करावा.

क) एकिकृत किडव्यवस्थापनांतर्गत बाबींचा अवलंब करावा .

पांढरी माशी : (बेमिसिया टॅबॅसी)

लक्षणे : प्रौढ माशी व पिल्ले पानांतील रस शोषण करतात. या किडीद्वारे

शरीराबाहेर विसर्जित केलेल्या चिकट- गोड पदार्थावर कालांतराने काळ्या बुरशीची वाढ होऊन झाडांची वाढ खुंटते.  या किडीमुळे भेंडीपिकात यलो व्हेन मोझॅक किंवा केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

नियंत्रण :

अ) किडीचा प्रादुर्भाव १० प्रौढ अथवा पिल्ले प्रतिपान इतका आढळून आल्यास

डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १० मि.ली. यापैकी कुठल्याही एका किटकनाशकांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ब) एकिकृत किडव्यवस्थापानांतर्गत बाबींचा अवलंब करावा.

लाल कोळी ( ट्रेट्रॅनायकस सिनेबॅरिनस)

लक्षणे : प्रौढ व पिल्ले पानांतील रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त पानांतील हरितद्रव्य कमी होऊन पाने पिवळसर पांढरे होतात. व झाडांची वाढ खुंटते.

नियंत्रण :

अ)   तणांचा बंदोबस्त करावा भेंडीचे सलग पिक घेणे टाळावे.  नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.

ब) अधिक प्रादुर्भावग्रस्त परिस्थितीत पाण्यात मिसळणारी गंधक भुकटी २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

क) एकिकृत किडव्यवस्थापनांतर्गत बाबींचा अवलंब करावा.

शेंडे व फळे पोखरणारी अळी (एरियास फॅबी)

लक्षणे : अळी भुरकट रंगाची असून अंगावर सर्वत्र विटकरी रंगाचे ठिपके आढळून येतात.  झाडांना फळे लागण्यापूर्वी अळी झाडाच्या शेंड्यात शिरून शेंडा पोखरते, त्यामुळे शेंडे वाळून झाडे मरतात. झाडांना फुले व फळे लागल्यानंतर अळ्या त्यांना पोखरून त्यावर आपली उपजिविका करतात.  लहान फळांना इजा झाल्यास त्यांचा आकार बदलतो व त्यांना बाजारात मागणी राहत नाही.

नियंत्रण :

अ) भेंडीचे सलग पिक घेणे टाळावे.

ब) किडग्रस्त फुले,फळे जाळून नष्ट करावी.

क) विद्यापिठाद्वारे शिफारसीत पिकसंरक्षण वेळापत्रकाचा अवलंब करावा.

भेंडीवरील प्रमुख रोग

केवडा ( येलो चेन मोझॅक )

लक्षणे  : कोवळ्या पानांच्या शिरा पिवळ्या पडतात.  पानाचा  इतर भागही पिवळसर हिरवट दिसतो.  त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.  हा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार पांढ-यामाशीद्वारे होतो.

नियंत्रण:

अ) प्रादुर्भावग्रस्त झाडे ताबडतोब उपटून नष्ट करावीत.

ब) सिलेक्शन २-२, परभणी क्रांती व अर्का अनामिका या वाणांचा पेरणीसाठी वापर करावा.

क) पांढ-या माशीच्या नियंत्रणाकरिता एकिकृत किडव्यवस्थापनांतर्गत बाबींचा अवलंब करावा.

भुरी रोग ( पावडरी मिलड्यू)

लक्षणे : पाने, शेंडे, फांद्या, फुले, तसेच फळांवर राखोळ्या पावडरच्या स्वरूपातील बुरशीची वाढ दिसून येते.  त्यामुळे झाडांची वाढ खुंटून फळांचा आकार बदलतो.  हा बुरशीजन्य रोग असून याचा प्रसार हवेमार्फत होतो.

नियंत्रण:

अ) शेत स्वच्छ ठेवावे.

ब) पाण्यात मिसळणारी गंधक भुकटी (८०%) २५ ग्रॅम अथवा ट्रायडेमार्फ ( कॅलेक्झीन ) ५ मि.ली. अथवा डीनोकॅप ( कॅराथेन ) १० मि.ली. यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भेंडी पिकाकरीता पिकसंरक्षण वेळापत्रक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोलाद्वारे शिफारशीत भेंडी पिकाच्या पिकसंरक्षण वेळापत्रकानुसार भेंडी पिकात बी उगवणीनंतर १५ दिवसांनी फवारणी सुरु करून दोन आठवड्याच्या अंतराने ४ फवारण्या कराव्यात.  पहिल्या व तिस-या फवारणीकरीता एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १७ मि.ली. १० लिटर पाण्यात आणि दुस-या फवारणीकरिता सायपरमेथ्रीन २५ टक्के ४ मि.ली.किंवा फेनव्हेलरेट २० टक्के ५ मि.ली.१० लिटर पाण्यात घेऊन फवारावे.(फवारणीनंतर ८ दिवस भेंडीची तोडणी करू नये.)

भेंडीवरील एकीकृत किडव्यवस्थापनांतर्गत महत्वाच्या बाबी

राष्ट्रीय एकात्मिक किडव्यवस्थापन केंद्र, नवी दिल्ली यांनी भेंडी पिकावरील किडी व रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनासंबधी काही मुद्दे नमूद केलेले आहेत.

१ ) जमिनीची खोल नांगरणी करावी, जेणेकरून जमिनीतील किडींच्या अवस्थांचा नाश होईल.

२)  लागवडीकरीता पंजाब-७ एम.पी.-७ ए.ई.-२२,क्लेमसन स्पाईनलेस या वाणांचा वापर करावा, कारण ह्या जाती शेंडा/फळे पोखरणा-या किडींस प्रतिबंधक आहेत. त्याचप्रमाणे परभणी क्रांती, वर्षा उपहार ह्या जाती केवडा या विषाणूजन्य रोगास प्रतिबंधक आहेत.

३) भेंडीसोबत कांदा हे आंतरपिक घ्यावे.

४) पांढ-या माशींच्या नियंत्रणाकरिता पिवळ्या रंगाचे सापळे तयार करून कमीत कमी १० सापळे प्रती हेक्टरी या प्रमाणात शेतामध्ये लावावे.

५)  शेंडे व फळे पोखरणा-या (ठिपक्याची अळी) किडीकरीता तसेच फळे पोखरणा-या हिरव्या बोंड अळीच्या (हेलीकोव्हरपा) या किडींच्या सर्व्हेक्षणाकरिता फेरोमेन सापळ्यांचा वापर करावा( हेक्टरी ५ प्रमाणे )

६)किडग्रस्त शेंडे / फळे तसेच विषाणूग्रस्त पाने/ झाडे शेतातून उपटून नष्ट करावीत.

७)   पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणाकरिता ट्रायकोग्रामा ब्रासिलिएन्सींस या परोपजीवी किटकाची अंडी एक ते दीड लाख प्रती हेक्टरी या प्रमाणात वापरावीत.  मात्र, त्यानंतर किटकनाशकांची फवारणी करू नये.

८) तुडतुडे, कोळी, तसेच पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणाकरिता पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केल्यास या किडींच्या प्रसारात आळा बसतो.

किटकनाशकांचा प्रतिक्षाकाळ

भेंडीपिकावरील किडीच्या नियंत्रणाकरिता रासायनिक किटकनाशकांचा वापर केल्यास भेंडीच्या काढणीपुर्वी एक ठराविक प्रतिक्षाकाळ जाऊ द्यावा लागतो.  अन्यथा त्यावरील किटकनाशकांचा अंश आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकतो.  फळे लागणीनंतर या पिकावर एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही या किटकनाशकाची फवारणी केल्यास प्रतिक्षा कालावधी दोन दिवसांचा आहे.  तसेच सायपरमेथ्रीन २५ किंवा फेनव्हेलरेट २० टक्के या किटकनाशकांची फळे असतांना फवारणी केल्यास प्रतीक्षा काळ ७ दिवसांपर्यत असतो.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

कृषि विज्ञान केंद्र विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ

माहिती दाता  :- डॉ. प्रमोद यादगीरवार , कार्यक्रम समन्वयक किंवा डॉ.उपेंद्र कुलकर्णी संशोधन सहयोगी(पिक संरक्षण)

विषय विशेषज्ञ, दूरध्वनी क्र.(०७२३२) २४८२३५

संकलन :- अनिरुद्ध मिरीकर

अंतिम सुधारित : 5/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate