सक्षम रोपांसाठी योग्य कांदा रोपवाटिका
गादी वाफा पद्धती व ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब कांदा रोपवाटिकेमध्ये केल्यास कमी बियामध्ये सक्षम रोपे उपलब्ध होऊ शकतात.
एक हेक्टर कांदा लागवडीसाठी रोपवाटिका करण्यासाठी सुमारे 10 ते 12 गुंठे जमीन लागते.
रोपवाटिकेची जागा निवड
- रोपवाटिकेसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची व शक्यतो विहिरीजवळ असणारी जागा निवडावी. पाणी साचणारी सखल जमीन निवडू नये.
- लव्हाळा किंवा हरळी यासारखे गवते असणारी जमीन निवडू नये.
- तणाची शक्यता असल्यास किंवा शेणखतामधून तण होण्याची शक्यता असल्यास वाफे बी पेरण्यापूर्वी भिजवून घ्यावेत. तणाचे बी उगवून आल्यानंतर खुरपणी करून कांद्याचे बी पेरावे.
गादी वाफ्यावर रोपवाटिका आवश्यक
शेतकरी कांदा रोपे गादी वाफा किंवा सपाट वाफे यावर तयार करतात. मात्र, गादी वाफ्यावर रोपे तयार करणे चांगले.
- गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते.
- रोपांच्या मुळांभोवती पाणी फार काळ साचून राहात नसल्याने रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही.
- लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात.
- रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
गादी वाफ्यावर लागवड
- गादी वाफे एक मीटर रुंद व तीन ते चार मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची 15 सेंमी ठेवावी.
- गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि 50 ग्रॅम मिश्र खत घालावे. खते आणि वाफ्यातील माती मिसळून दगड किंवा बारीक ढेकळे वेचून घ्यावीत. वाफा सपाट करावा. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात आणि त्यात बी पातळ पेरून मातीने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे.
- जमिनीच्या उताराचा विशेष अंदाज न घेता लांबच्या लांब सपाट वाफे करून त्यात बी फेकून पेरतात आणि पाणी देतात. अशा पद्धतीने बी पाण्याबरोबर वाहत जाऊन वाफ्याच्या कडेने जमा होते. त्यामुळे रोपांची दाटी होते. रोपे कमकुवत राहतात.
- गादी वाफा करणे शक्य नसल्यास, नेहमीप्रमाणेच सपाट वाफे करावेत. मात्र, त्यांची रुंदी 1 मीटर आणि लांबी 3 ते 4 मीटर ठेवावी. शेणखत आणि रासायनिक खत घालून मिसळल्यानंतर बी फेकून न देता रुंदीशी समांतर खुरप्याने रेघा पाडून त्यात पेरावे. पाणी द्यावे. बी ओळीत पेरल्याने दोन ओळी व रोपातील अंतर समान राहते. रोपे एकसारखी वाढतात. तसेच दोन ओळीत अंतर राखल्यामुळे खुरपणी किंवा माती हलवणे ही कामे सुलभ होतात.
- बियांची उगवण क्षमता चांगली असल्यास एक हेक्टर लागवडीसाठी 6 ते 7 किलो बी पुरेसे होते.
- साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर 10 ग्रॅम बी पेरावे, म्हणजे एका वाफ्यावर 30 ग्रॅम बी पेरावे. मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रति किलो बियांना 2 ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे आणि बी पेरावे. केवळ रेषा पाडण्याचा कंटाळा केल्यामुळे कधी-कधी 30 ते 40 टक्के रोपांचे नुकसान होते.
पाणी व्यवस्थापन
- बी पेरल्यानंतर शक्यतो पहिले पाणी झारीने द्यावे. मात्र, अधिक क्षेत्रावर रोपवाटिका असल्यास पाण्याचा प्रवाह कमी ठेवून पाटाने पाणी दिले तरी चालते. त्यासाठी वाफ्याच्या तोंडाशी गवताची पेंढी ठेवावी.
- पहिल्या पाण्यानंतर रोप उगवत असताना किंवा त्याची तोंडे दिसत असतात लगेच हलके पाणी द्यावे. कारण त्यामुळे उगवण सुलभ होते.
- त्यानंतर पाणी बेताने आणि 7 ते 8 दिवसांच्या अंतराने द्यावे.
- पुनर्लागणीच्या अगोदर पाणी कमी-कमी करावे म्हणजे दोन पाळ्यांमधील अंतर वाढवावे, त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र, रोपे उपटण्यापूर्वी 24 तास अगोदर पाणी दिल्यास रोपे काढणे सोपे होते.
- रब्बी हंगामात रोप तयार होण्यासाठी 50 ते 55 दिवस लागतात.
रोपवाटिकेसाठी ठिबक किंवा तुषार सिंचन ठरते फायद्याचे
ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपवाटिका तयार करण्यासंदर्भात केंद्राने प्रयोग केले. ट्रॅक्टरने 1 मीटर रुंद, 60 मीटर लांबीचे व 15 सेंमी उंचीचे गादीवाफे तयार केले.
- त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या 60 सेंमी अंतरावर ओढून घेतल्या.
- तसेच तुषार सिंचनासाठी दोन नोझलमध्ये 3 x 3 मीटरचे अंतर ठेवून पाणी देण्याची व्यवस्था केली.
- वाफ्यावर रुंदीशी समांतर 10 सेंमी अंतरावर रेघा पाडून त्यात बी पेरले. प्रत्येक चौरस मीटरला ठिबक व तुषार सिंचनाखाली 8.5 ग्रॅम बी पेरले तर नेहमीच्या पद्धतीत 12 ग्रॅम बी पेरले.
- लागवडीलायक रोपांची संख्या ठिबक सिंचनावर 1080 मिळाली. तुषार सिंचनावर 1172 मिळाली तर नेहमीच्या पद्धतीमध्ये 1059 मिळाली.
- याचा अर्थ असा, की ठिबक किंवा तुषार सिंचनावर रोपे तयार केल्यास एकरी केवळ 2 किलो बी पुरेसे होते, तर नेहमीच्या पद्धतीमध्ये 3.5 किलो बी लागते. एकरी 1.5 किलो बियाण्याची बचत होऊ शकते. याशिवाय पाण्यामध्ये 30 ते 40 टक्के व पाणी देण्याच्या मजुरीमध्ये प्रति एकरी 550 रुपयांची बचत होते.
योग्य वयाची रोपे लावणे आवश्यक
- कोवळी रोपे लावल्यास त्यांची मर होते. शिवाय कांदा उशिरा तयार होतो. बऱ्याच वेळा त्याची चिंगळी कांदा म्हणूनही काढणी करावी लागते.
- फार जुनी रोपे लावल्यास कांदा काढणीला लवकर तयार होतो; परंतु त्याची वाढ मर्यादित राहते. कांदे पोसत नाहीत. आकाराने लहान राहतात आणि उत्पादनात घट येते.
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर जि. पुणे येथे डॉ. विजय महाजन हे मुख्य शास्त्रज्ञ व डॉ. जय गोपाल हे संचालक आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.