অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करा मरळ माशाचे संवर्धन

योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्धन काळ पूर्ण झाल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात व त्यांच्या जीविताचे प्रमाण देखील ९० ते ९५ टक्के एवढे मिळू शकते.

मरळ माशाच्या डोक्याचा आकार हा सापाच्या डोक्यासारखा असतो म्हणून या माशास इंग्रजी मध्ये ‘स्नेकहेड’ असे म्हटले जाते. हा मासा सवयीप्रमाणे उथळ पाण्यात (तलाव, सरोवर) आढळतो. मरळ माशामधील झालेल्या विकासामुळे हा मासा हवेतील प्राणवायू श्‍वसनासाठी वापरतो. हा मासा पाण्याबाहेर काही तास ते काही दिवस जिवंत जगू शकतो व एका पाण्याच्या तळ्यातून जमिनीवरून रेंगाळत जाऊन दुसऱ्या पाण्याच्या तळ्यामध्ये जाऊ शकतो. कमी पाण्यातही हा मासा काही दिवस जगू शकतो. मरळ हा मासा गोड्या पाण्यातील अतिशय प्रचलित मासा असून, भारतात बऱ्याच ठिकाणी गोड्या पाण्यात या माशाचे वास्तव्य बघावयास मिळते. मरळ माशास बाजारात अत्यंत मागणी आहे. हा मासा चविष्ट असून, त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात व काटे कमी असतात. अत्यंत मांसभक्षक असल्याकारणांमुळे मरळ माशाचे संवर्धन दुसऱ्या माशांसोबत करण्याचे टाळावे.

मरळ माशाचे सर्वसाधारण वैशिष्ट्ये


  • मरळ माशाचे डोके सापाच्या डोक्याच्या आकारासारखे दिसते. डोके खवल्यांनी आच्छादलेले असते व ते वरच्या भागास तबकडीसारखे दिसते. मरळ माशाच्या पाठीवरचे, गुदपर व जोडीतील पर मोठे व काटे विरहीत असतात.
  • भारतामध्ये मरळ जातीचे मासे नदी, तळे, पाणी साठवणीची जागा, कृत्रिम तलाव, लहान सरोवर, दलदलीच्या भागात इ. ठिकाणी सापडतात.
  • मरळ माशाची जैवरासायनिक जडनघडन जातीजाती प्रमाणे वेगवेगळी सापडते; पण साधारणपणे मरळ माशामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक तर कॅल्शिअम व चरबीचे कमी प्रमाणात असते.
  • भारतामध्ये मरळ माशाच्या संवर्धन करण्यासाठी मुख्यतः महाकाय मरळ, पट्टेरी मरळ, ठिपकेदार मरळ या तीन जातींचा वापर केला जातो.

मरळ माशाचे बीजोत्पादन

मरळ माशाच्या बीजोत्पादनासाठी, माशांना चांगले प्रथिनयुक्त खाद्य पुरविणे गरजेचे असते. यामध्ये कोंबड्यांची आतडी, माशांचा टाकाऊ भाग, इतर जनावरांचा यकृताचा भाग अशा खाद्यपदार्थांचा समावेश होतो.

  • खाद्याचे प्रमाण, प्रत, खाद्य पुरविण्याची वेळ योग्य असेल तर मासे चांगल्या प्रतीची अंडी देतात. मरळ एका वेळी ६००० पेक्षा जास्त अंडी देऊन त्यापैकी ९० टक्के अंडी फलित करू करतो. प्रजननक्षम मासे पालनाकरिता ६ मी x ५ मी x १ मी आकाराचे तळे वापरतात. तळ्यामधील पाण्याची पातळी साधारणतः १ मी एवढी असते. एका चौरस मीटरकरिता एक मासा अशी संचयन घनता तळ्यामध्ये ठेवतात.
  • मऊ व फुगीर पोट असलेली मादी प्रजननासाठी योग्य समजली जाते. परिपक्व मादीच्या पोटात हलकासा दाब दिल्यास थोडी अंडी बाहेर येतात. मरळ माशाच्या प्रजननाकरिता ‘ओव्हप्रिम’ किंवा ‘ओव्हाटाइड’सारख्या संप्रेरकाचा वापर केला जातो. प्रजननाकरिता १ मादीस २ नर या प्रमाणात माशाची निवड केली जाते. संप्रेरकाचे इंजेक्शन दिल्यानंतर परिपक्व मासे ६ मी. x ५ मी. x १ मी. आकाराच्या सिमेंट काँक्रीटच्या अथवा मातीच्या तळ्यात सोडले जातात.
  • सिमेंट काँक्रीटची टाकी वापरल्यास टाकीच्या तळाशी २५ सें.मी. एवढा थर काळ्यामातीचा अथवा चिकन मातीचा पुरविला जातो. माशांना लपण्यासाठी जागा मिळावी म्हणून प्रजनन टाकीमध्ये पान वनस्पती सोडल्या जातात. ६ ते १० तासांनंतर मासे अंडी देण्यास सुरवात करतात. संपूर्ण अंडी देण्याकरिता २४ ते ३० तास एवढा कालावधी लागतो.
  • मरळ माशामध्ये अंड्याचे फलन शरीराबाहेर होते व फलित झालेली अंडी पाण्यावरती तरंगू लागतात. अंडी फलित होण्याचा दर साधारणतः ७० ते ९० टक्क्यांएवढा असतो. अंडी फलित झाल्यानंतर पुढील २४ ते ३० तासांपर्यंत २.८ ते ३.२ मीमी लांबीची पिल्ली अंड्यामधून बाहेर येतात. मरळ मासे विशेषतः नर मरळ मासा पिल्लांची काळजी घेतो. साधारणतः एका मरळ मादीपासून ४ ते ८ हजार पिल्ले प्राप्त होतात.
  • सुरवातीचे तीन दिवस पिल्ले शरीरामध्ये साठविलेल्या अन्नद्रव्याचा उपयोग वाढीकरिता करतात. तीन दिवसांनंतर पिल्ले बाहेरील पाण्यातील प्राणीप्लवंग खाण्यास सुरवात करतात. पुढील दोन आठवडे पिल्लांना पालक माशांसोबतच टाकीमध्ये ठेवले जाते; परंतु दोन आठवड्यानंतर पिल्लांना पालक माशांना टाकीबाहेर काढले जाते.
  • दोन आठवड्यांच्या पिल्लांना सडलेली कोंबड्याची आतडी अथवा टाकाऊ माशांचे भाग अन्न म्हणून दिले जाते. एका महिन्यानंतर पिलाचा रंग लालसर व लांबी साधारणतः १५ मी.मी. एवढी होते. एक महिन्याच्या पिलांना पुढे ३ मी. x १ मी. x १ मी. आकारमानाच्या टाकीमध्ये एका चौरस मीटर क्षेत्रफळासाठी ५०० पिले एवढ्या प्रमाणात सोडले जातात. दोन महिन्यांनंतर पिले ४ ते ५ सें.मी.पर्यंत वाढतात व त्यांना बोटुकली म्हणून संबोधले जाते.

मरळ संवर्धन

  • मरळ संवर्धन करण्यासाठी साधारणपणे ५० स्क्वे.मीटर आकाराचे (१० मी. x ५ मी.) तळे असावे. पाण्यासाठी संवर्धनाच्या ठिकाणी विहीर किंवा पाण्याचा दुसरा नैसर्गिक स्रोत असावा. मरळ खाद्यासाठी खास करून कोंबड्याचे आतडे किंवा टाकाऊ कमी दर्जाचे मासे असणे आवश्‍यक असते.
  • मरळ संवर्धनासाठी जमिनीत खोदलेले तळे वेगवेगळ्या आकारांचे असू शकतात. जमिनीत खोदलेल्या तळ्यास बाजूने सिमेंट लावलेले असावे. तळ्यात पाण्याची खोली साधारणपणे १ मी.पर्यंत असावी. संवर्धन तळाच्या बुडापासून २५ सें.मी. पर्यंत चिकन मातीचा थर असावा.
  • तळे साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात १ मी. पाण्याने भरून घ्यावे. तळ्यामध्ये सारख्या आकाराची बोटुकली (८ सें.मी. ते १० सें.मी.) व वजनाने ५ ते १२ ग्रॅम प्रति हेक्टरी १२००० ते १५००० नग ऑक्टोबर महिन्यात संचयन करावीत.
  • बोटुकलीस उकडलेल्या कोंबड्याचे आतडे माशांच्या वजनाच्या ५ ते १० टक्के एवढे खाद्य पुरवावे. तळ्यामध्ये विहिरीचे अथवा इतर पाण्याच्या स्रोतामधून पाणी भरणा सतत करत राहावा. कारण तळ्यामधील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे अथवा पाण्याच्या होणाऱ्या जमिनीतील निचऱ्यामुळे कमी होऊ शकते. तळ्यामधील पाणी ३ ते ४ महिन्यांत पूर्णपणे बदलावे, त्यामुळे रोगराईचे प्रमाण कमी होते.
  • योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्धन काळ पूर्ण झाल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात व त्यांच्या जीविताचे प्रमाण देखील ९० ते ९५ टक्के एवढे मिळू शकते.
  • मरळ हा हवेतील प्राणवायू घेणारा मासा असल्यामुळे मरळ मासे तळ्याच्या पृष्ठभागावर श्‍वसन करण्यासाठी येत असतात. त्या वेळी ते इतर पक्ष्यांचे भक्ष बनू शकतात म्हणून त्यास प्रतिबंध म्हणून तलावावर पक्षी प्रतिबंधक जाळे बसविणे आवश्‍यक असते.


श्री. उमेश अरुण सूर्यवंशी, ९०९६९००४८९
(लेखक मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत)

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

करा मरळ माशाचे संवर्धन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate