অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निमखाऱ्या पाण्यात खेकडा संवर्धन फायद्याचे...

निमखाऱ्या पाण्यात खेकडा संवर्धन फायद्याचे...

खेकडा संवर्धन हे प्रामुख्याने हिरव्या खेकड्यांचे (क्रॅब किंवा ग्रीन क्रॅब) केले जाते. ही जात अत्यंत चविष्ट असल्याने दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये या खेकड्यांना चांगली मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जिवंत स्वरूपात खेकड्यांची विक्री केली जाते.
खेकडे हे आपणास जवळपास पाण्यामध्ये पाहावयास मिळतात. जास्त करून खाडीच्या आसपास आणि जेथे आसऱ्याची जागा आहे अशा ठिकाणी पाहावयास मिळतात. तिवऱ्यांची झाडे हे त्यांचे आवडते ठिकाण आहे. निमखाऱ्या पाण्यामध्ये खेकडा संवर्धन फायदेशीर ठरते.

  1. खाडीमध्ये हे खेकडे शिंपले आणि इतर हळू चालणाऱ्या प्राण्यांना आपले भक्ष्य बनवितात. खेकडे हे एकाच ठिकाणावर राहत नाहीत. ते बरेच किलोमीटर प्रवास करतात. रात्रीच्या वेळेस त्यांचा चालण्याचा वेग हा 10 ते 19 मीटर प्रतितास एवढा असतो. त्यांच्या जीवनकाळानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी आपले जीवन व्यथित करतात.
  2. प्रजनन झाल्यानंतर खेकडा मादी ही अंडी सोडण्यासाठी खोल समुद्रामध्ये जाते. सुरवातीच्या अवस्था साधारणपणे 3 ते 4 आठवड्यांमध्ये पूर्ण होतात. या अवस्था पूर्ण होईपर्यंत खेकडे त्यांच्या इप्सित स्थळी पोचतात. सुरवातीच्या अवस्थामंध्ये हे खेकडे आडवे स्थलांतर करण्यासाठी समर्थ नसतात, त्यासाठी त्यांना सागरी प्रवाहाच्या वेगावर अवलंबून राहावे लागते.
  3. तारुण्यावस्थेपर्यंत खेकडे हे जास्त क्षारतेच्या पाण्याकडून कमी क्षारतेच्या पाण्यामध्ये म्हणजेच खाडीमध्ये स्थलांतरित होतात. प्राथमिक अवस्था या पाण्याच्या तळाशी राहणे पसंत करतात, त्यामुळे आपणास त्या पाण्याच्या वरच्या भागात आढळत नाहीत.
  4. भारतामध्ये किनारपट्टीच्या तळाची माती ही वाळू आणि चिखलयुक्त असते. खेकड्याचे बीज हे ओहोटी आणि भरतीच्या भागामध्ये काही दगडांच्या खाली, तसेच तिवरांच्या मुळाशी आपणास सापडते. आपणास खेकडे हे समुद्राच्या उथळ पाण्यामध्ये समुद्र रानाच्या मुळाशी एकवटलेले दिसतात. त्यांची लपण्याची वृत्ती ही अत्यंत प्रबळ आहे. तसेच, ते चिखलामध्ये स्वतःला गाडूनसुद्धा घेतात. अशामुळे ओहोटीच्या वेळी ते आपल्या शरीराला थंड ठेवू शकतात आणि भक्ष्य होण्याचेसुद्धा टाळता येते.

हिरवे खेकडे मिळण्याची ठिकाणे

  1. हिरवा खेकडा (मड क्रॅब) हा बऱ्याच ठिकाणी सापडतो. हा खेकडा दक्षिणपूर्व आणि पूर्व आफ्रिकी ते दक्षिणपूर्व आशिया आणि हिंदी महासागर आणि पॅसिफिक भागात म्हणजेच अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राच्या आसपास सापडतो.
  2. वृत्तीय समुद्रात असलेली बेटे आणि तिवरांची जंगले प्रामुख्याने या खेकड्यांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे.
  3. भारतामध्ये हिरवा खेकडा हा केरळ ते गुजरात किनाऱ्यालगत, तसेच पश्‍चिम बंगाल ते तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत आणि अंदमान बेटांच्या किनाऱ्याजवळ आढळून येतो.
  4. भारतामध्ये तपकिरी खेकडा (ब्राऊन क्रॅब, Scylla Olivacea) हा पूर्ण वर्षभर किनाऱ्याजवळ तिवरे असलेल्या पाण्यामध्ये आढळून येतो; परंतु त्यामानाने हिरवा खेकडा (ग्रीन क्रॅब, Scylla Serrata) हा कमी प्रमाणात आढळतो.
  5. तपकिरी खेकड्याची बीजे पावसाळ्यानंतरच्या महिन्यांमध्ये दक्षिणपूर्व किनारपट्टीवर चिखल असलेल्या उथळ पाण्यामध्ये, समुद्र रान आणि मुबलक प्रमाणात प्लवंग असलेल्या पाण्यामध्ये आढळतात.

मातीच्या तलावातील खेकडा संवर्धन

हिरवा खेकडा हा क्षारता आणि तापमानामध्ये होणाऱ्या फरकांशी तग धरणारा आणि बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणारा प्राणी आहे. हा खेकडा 12 ते 35 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाच्या फरकामध्ये तग धरून राहू शकतो. जेव्हा तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली असेल, तेव्हा त्याच्या खाण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

  1. खेकड्याची वाढ ही 15 ते 30 पीपीटी क्षारतेमध्ये चांगली होते.
  2. कोळंबी संवर्धनातून बाद झालेले अथवा तेथे सुरू असलेले आणि मुख्यत्वाने तिवरांच्या बाजूला असलेले आणि वस्तीपासून दूर असलेले मत्स्यतलाव खेकडा संवर्धनासाठी उपयुक्त आहेत.
  3. तलावामध्ये पाणी आत आणि बाहेर जाण्यासाठी लागणाऱ्या उघाड्या असलेले, एक मीटर खोली असलेले आणि 0.25 ते 0.5 हेक्‍टर क्षेत्रफळ असलेले तलाव खेकडा संवर्धनासाठी उत्तम मानले जातात.
  4. तलावाच्या मातीमध्ये गाळाचे प्रमाण जास्त असू नये. तलावातून खेकडे निसटून जाऊ नयेत म्हणून जाळीचे कुंपण हे तलावाच्या आतील बाजूस बांधावे.

साठवणुकीच्या अगोदर तलावाची मशागत

  • तलावातील पाणी पूर्णपणे काढून घ्यावे.
  • तलावाचा तळ सुकवावा आणि त्यानंतर नांगरावा.
  • उपद्रवी कीटक आणि प्राणी मारण्यासाठी शिफारशीत प्रमाणात अमोनियम सल्फेट आणि कॅल्शिअम ऑक्‍साईडसारखी रसायने वापरावीत किंवा मोहाची पेंड वापरावी.
  • प्लवंग निर्मितीसाठी शिफारशीत प्रमाणात युरिया, डीएपी, सुपर फॉस्फेटसारखी रासायनिक खते वापरावीत. मुबलक प्रमाणात प्लवंग निर्मितीमुळे खेकड्याच्या पिलांना खाद्य मुबलक प्रमाणात मिळून स्वकुलभक्षण क्रिया कमी होऊन जगणुकीचे प्रमाण वाढते.
  • पाण्याची क्षारता 22 ते 32 पीपीटीच्या दरम्यान ठेवावी. पाण्याची खोली 100 सें.मी. इतकी ठेवावी.

खेकड्यांचे संवर्धन

  • संगोपन तलावामध्ये वाढविलेले खेकड्याचे बीज संवर्धनासाठी वापरले जाते. जवळपास 6 ते 7 महिन्यांमध्ये विक्रीयोग्य असे 700 ग्रॅमपर्यंत खेकडे तयार होतात.
  • दुसऱ्या पद्धतीमध्ये दोन महिन्यांपर्यंत 50 ते 70 ग्रॅमपर्यंत खेकडे तलावात वाढविले जातात. नंतर हेच खेकडे मोठ्या तलावात वाढवून पुढील 4 ते 5 महिन्यांमध्ये 500 ग्रॅमच्या वर वाढविले जातात.
  • मोठ्या तलावात खेकडे साठवणुकीअगोदर आकारानुसार वेगळे केले जातात, त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये त्यांच्या आकारांमध्ये जास्त फरक पडत नाही. जगणुकीचे प्रमाणसुद्धा चांगले मिळते. हा जगणुकीचा दर 60 टक्‍क्‍यांपर्यंत जातो. साठवणुकीचा दर जर 0.5 नग प्रति वर्ग मीटर ठेवल्यास हा जगणुकीचा दर 70 टक्‍क्‍यांच्या वर जाऊ शकतो.
  • तलावात तिवऱ्यांच्या फांद्या, लपण्यासाठी सिमेंटचे- प्लॅस्टिकचे रिकामे पाइप, इतर टाइल्स ठेवल्यास खेकड्यांची वाढ आणि जगणुकीच्या दरात चांगली वाढ होते. स्वकुलभक्षणाचा दर कमी होतो.
  • खेकड्याची बीजे हवेशीर बांबूच्या बास्केटमधून, प्लॅस्टिक ट्रे किंवा कार्डबोर्डच्या डब्यातून वाहतूक केली जातात. प्रत्येक ट्रे किंवा डब्यामध्ये पाणी धरून ठेवणारी तिवरांची पाने आणि उपयुक्त साधनांचा वापर करावा. अशामुळे प्रवासादरम्यान खेकड्यांमध्ये मारामारीचे प्रमाण कमी होते, तापमान कमी राहण्यास मदत होते.
  • खेकड्याची बीजे मत्स्यतलावात सोडण्यापूर्वी तलावाच्या पाण्याशी अनुकूल करणे अत्यंत गरजेचे असते. कारण तापमानाच्या आणि क्षारतेच्या फरकामुळे अचानक मरतूक होण्याची शक्‍यता असते.

पाणी व्यवस्थापन

संवर्धनादरम्यान पाण्याचे तापमान, क्षारता, विद्राव्य प्राणवायू, सामू, पाण्याचा रंग, पाण्याची पारदर्शकता तपासावी. पाण्याच्या गुणवत्तेनुसार तलावातील पाणी बदलावे लागते.

खाद्य व्यवस्थापन

  • संवर्धनाच्या पूर्ण खर्चाच्या 50 ते 60 टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो. उत्तम प्रतीचे खाद्य आणि त्यांचा प्रमाणात उपयोग हे खाद्य व्यवस्थापन आणि पाण्याची गुणवत्ता चांगली राखण्याचे गमक आहे.

खाद्य हे अधिक संख्येच्या ट्रे मधून देणे सोयीचे असते, कारण खेकडे खाद्य खातात की नाही याचे निरीक्षण करणे व्यवस्थापनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. खाद्याचे प्रमाण हे खेकड्याच्या वरच्या कवचाच्या रुंदीवर अवलंबून असते.

खेकड्यांना खाद्य दोन वेळा द्यावे, त्यामध्ये 40 टक्के खाद्य हे दिवसा आणि 60 टक्के खाद्य हे सायंकाळी द्यावे.

कवचाची रुंदी (सें.मी.) - टक्के खाद्य

<6 - 10
>6 - 15 - 8
>15 - 6

कुंपणातील खेकडा संवर्धन

20 मी. x 10 मी. x 1.2 मी. आकाराच्या 10 मि.मी. आसाच्या "एचडीपीई'च्या जाळ्यांच्या कुंपणामध्ये खेकड्याचे बीज विक्रीयोग्य आकारापर्यंत वाढविले जाते. अशा कुंपणामध्ये साठवणूक क्षमता ही 0.5 ते 1 नग प्रति वर्ग मीटर एवढी असते.

कुंपणातील खेकडा संवर्धनाचे फायदे

विविध आकारांचे खेकडे विविध कुंपणांमध्ये साठविले जाऊ शकतात. त्यामुळे उत्पन्न आणि जगणुकीचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
तिवरे असलेल्या जागेमध्ये ही पद्धत अवलंबता येते.

खेकड्यांच्या वाढीचे निरीक्षण करण्यास आणि ते पकडण्यास सोपे जाते.

कुंपणाचे बांधकाम

प्लॅस्टिकचे चौकोनी, षटकोनी, तसेच डायमंडच्या आकाराची 5 ते 12 मि.मी. आसाची जाळी अशा प्रकारचे कुंपण बनविण्यास वापरतात. खेकडे तलावातून निसटून जाऊ नयेत म्हणून हे कुंपण सभोवताली जमिनीमध्ये 30 सें.मी. खोल लावतात. पाण्याच्या वर राहिलेल्या जाळीवर प्लॅस्टिक पेपरचे किंवा सिल्पॉलिनचे आवरण देतात.

खेकड्यांची पकडणूक आणि विक्री

  • संवर्धन कालावधीदरम्यान निवडक मोठ्या खेकड्यांची पकडणूक केली जाते, त्यामुळे लहान खेकड्यांची वाढ होण्यास मदत होते.
  • निवडक मोठे झालेले खेकडे छोट्या उचलणाऱ्या जाळ्याने अथवा स्कूप नेटच्या साह्याने पकडतात.
  • पकडण्याच्या वेळी माशाच्या मांसाचा तुकडा आमिष म्हणून जाळ्यात ठेवला जातो. खेकड्यांची पूर्ण पकडणूक ही 120 ते 150 दिवसांनंतर केली जाते.
  • तलावातील पाणी संपूर्ण काढल्यानंतर हाताने वेचून अथवा हातजाळ्याने खेकड्यांची पूर्ण पकडणूक केली जाते.


संपर्क - शार्दुल गांगण - 8275270167 
(लेखक तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate