অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपत्कालीन पर्यायी पीक योजना

अनियमित पावसावर मात करण्यासाठी  आपत्कालीन पर्यायी पीक योजना

पावसाचा अनियमितपणा मागील काही वर्षांत  कमालीचा वाढला आहे. येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाऊस वेळेवर सुरू होऊन मध्येच मोठा खंड पडणे, पाऊस उशिरा सुरू होणे, लवकर संपणे, उशिरापर्यंत पडणे, अतिवृष्टी होणे अशा घटनांचे गंभीर परिणाम शेती क्षेत्रावर होत असतात. म्हणूनच यावर मात करण्यासाठी जाणून घेऊया आपत्कालीन स्थितीत करावयाच्या उपाययोजनांविषयी म्हणजेच ‘आपत्कालीन पर्यायी पीक योजने’विषयी ...

महाराष्ट्रातील बहुतांशी शेती जिरायती असल्याने ती पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भारतातील मुख्य पिकांचे जगाच्या तुलनेत उत्पादन फारच कमी आहे. राज्यातील जमीन, हवामान आणि पर्जन्यमानात विविधता असल्याने पिकांच्या प्रकारातही विविधता आढळते. निसर्गाच्या प्रामुख्याने पावसाच्या लहरीपणामुळे बर्‍याचवेळा पिकांच्या दृष्टीने बिकट परिस्थिती निर्माण होते. विशेषतः जिरायती शेती करणार्‍या शेतकर्‍यांना पावसाच्या अनियमितपणास बर्‍याच वेळा तोंड द्यावे लागते. पाऊस वेळेवर सुरू होऊन मध्येच मोठा खंड पडणे, पाऊस उशिरा सुरू होणे, लवकर संपणे, उशिरापर्यंत पडणे, अतिवृष्टी होणे अशा आपत्कालीन परिस्थितीत पीक पेरणीच्या तारखांमध्ये बदल करावे लागतात. अशा स्वरूपाची आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन कराव्या लागणार्‍या बदलांनाच ‘आपत्कालीन पर्यायी पीक योजना’ असे म्हणतात. अनियमित पावसामुळे निर्माण होणार्‍या आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यासाठी शेतकर्‍याने पुढीलप्रमाणे पर्यायी पीक योजना राबवावी.

पावसाची वेळेवर सुरुवात व पेरणीनंतर खंड पडणे

अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये पावसात खंड पडणे हे वरचेवर आपणास अनुभवास येते. पावसात खंड हा सर्वसाधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यात पडतो. पाऊस वेळेवर सुरू झाला, तर 15 जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके चांगली येतात. मात्र, 15 जुलैनंतर पावसामध्ये दोन ते चार आठवडे खंड पडला, तर पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट येते. म्हणून कोणतेही सलग पीक घेण्यापेक्षा खरीप हंगामात आंतरपिकाची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बाजरी + तूर (2:1) किंवा सूर्यफूल + तूर (2:1 व 2:2) ही आंतरपीक पद्धती चांगली दिसून आलेली आहे. हलकी जमीन असेल, तर बाजरी + मटकी (2:1) ही आंतरपीक पद्धती योग्य आहे, तसेच मटकी, हुलगा, उडीद यांसारखी ‘धूप प्रतिबंधक पिके’ पट्टा पेर पद्धतीने घ्यावीत. पावसाने फारच ओढ दिली, तर बाजरी कापून वैरणीसाठी वापरावी. म्हणजे पुन्हा पावसास सुरुवात झाल्यावर कोंब फुटून त्यापासून धान्य तसेच वैरण मिळते. अशा पिकावर 2 ते 3 टक्के युरियाची फवारणी करावी. भुईमूग पिकांवर 2 ते 3 टक्के डायअमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. सूर्यफूलाच्या बाबतीत विरळणी करून झाडांची कमीत कमी संख्या म्हणजेच हेक्टरी 30 हजारांपर्यंतच ठेवावी. त्यामुळे जमिनीतील ओल पिकास जास्त दिवस पुरेल आणि उत्पादनात स्थैर्य येण्यास मदत होईल, तसेच खरीप पिकामध्ये निंदणी करून पीक तणमुक्त ठेवून कोळपण्याची संख्या वाढवावी.

पावसास उशिरा सुरुवात

अवर्षणप्रवण भागामध्ये पावसास बर्‍याच वेळा जुलै-ऑगस्टमध्ये सुरुवात होते. अशावेळी खरीप पिके घ्यावीत किंवा नाहीत अशा संभ्रमात शेतकरी असतात. अशा परिस्थितीत शेतकरी खरिपातील क्षेत्र रबी पिकाखाली घेण्याचा प्रयत्न करतात; परंतु खरीप जमिनी या हलक्या आणि कमी ओल साठविणार्‍या असल्यामुळे रबी पिके समाधानकारक येत नाहीत. म्हणून खरीप हंगामातच उशिरा पेरणीसाठी पिकांचे योग्य नियोजन करणे हे आपत्कालीन पीक योजनेचे महत्त्वाचे तंत्र आहे. म्हणजेच जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यापर्यंत बाजरी, सूर्यफूल तसेच हुलगा यांसारखी पिके चांगली उत्पादन देतात; परंतु मटकीसारखे पीक उशिरा पेरणीस योग्य ठरत नाही. खरीप हंगामामध्ये उशिरा पेरणी करताना कडधान्य, गळीतधान्य तसेच तृणधान्य इत्यादी पिकांचे उत्पादन स्थिर करण्यासाठी अनुक्रमे तूर, हुलगा, सूर्यफूल, एरंडी, राळा अशी पिके घ्यावीत. पर्यायी पिकांचे उत्पादन नेहमीच्या सरासरीइतके येणार नाही; परंतु कठीण परिस्थितीत काही प्रमाणात उत्पादन येऊन परिस्थिती सुसह्य होईल, हे मात्र निश्‍चित. या सर्व पर्यायी पिकांच्या बियाणांची पूर्तता मात्र वेळेवर करणे गरजेचे असते.

पाऊस लवकर संपणे (सप्टेंबर अखेर)

ज्यावेळी रबी हंगामात पाऊस वेळेवर सुरू होतो; परंतु ऑक्टोबर मध्यापर्यंत पडण्याऐवजी सप्टेंबर अखेरच थांबतो त्यावेळी पिकांवर अनिष्ट परिणाम होतो. अशा वेळी रबी पिकांच्या बाबतीत योग्य ते नियोजन करण्यासाठी खालील बाबींचा विचार व्हावा.

  • रबी ज्वारीची पेरणी खोल करावी, तसेच खतांची मात्रा पेरणीबरोबर द्यावी.
  • उपलब्ध ओलीचा कार्यक्षम वापर होण्यासाठी रबी पिकांची विरळणी करून ताटांची संख्या हेक्टरी निम्मी करावी. ज्वारीचे उदाहरण घेतले तर हेक्टरी एक लाख ताटाऐवजी 50 हजार ताटे ठेवावीत. विरळणी करताना एकाआड एक ताट काढावे किंवा एकाआड एक ओळ काढावी.
  • रबी पिकामध्ये कोळपणीची संख्या वाढवून जमिनीत ओल जास्त टिकवावी.
  • ज्वारीच्या पिकामध्ये काडी-कचरा किंवा तुरकाट्याचा आच्छादन म्हणून वापर करावा. agri/extension हे आच्छादन हेक्टरी 5 टन वापरावे. पीक उगवणीनंतर  लगेच म्हणजे 15 दिवसांच्या आत आच्छादन टाकावे, ज्यामुळे पिकास उपलब्ध ओलावा भरपूर मिळून उत्पादनात घट येणार नाही.
  • पीक वाचविण्यासाठी शक्य झाल्यास पेरणीनंतर 30 ते 35 व्या दिवशी संरक्षित पाणी द्यावे. दोन पाण्याची सोय असल्यास पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी आणि दुसरे पाणी 55 ते 60 दिवसांनी द्यावे.

पाऊस उशिरापर्यंत पडणे, अतिवृष्टी होणे

रबी हंगामात पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडत राहिला, तर ज्वारीच्या पेरण्या वेळेवर होत नाहीत. अशावेळी उशिरा पेरणीसाठी ज्वारीचे पीक धान्यासाठी न घेता वैरणीसाठी घ्यावे आणि त्याची पेरणी दाट करावी. पाऊसकाळ वाढल्यामुळे थंडीचा कालावधी वाढतो. अशावेळी जर ज्वारीऐवजी हरभरा घेतला, तर उत्पादन चांगले मिळते. कधी कधी पीक पेरणीनंतर उगवणीच्या वेळेस, दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत किंवा काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाली, तर पिकांचे नुकसान होते. पीक उगवून आल्यानंतर अतिवृष्टीने एक महिन्याच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास परत त्या क्षेत्रात पेरणी करताना पिकांची फेरबदल करून कमी कालावधीमध्ये येणार्‍या वाणांचे बियाणे वापरावे. पक्व होण्याच्या अवस्थेत अगर काढणीपूर्वी पाऊस सतत पडत राहिला, तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उदा. ज्वारीचे दाणे काळे पडून त्यास बाजारभाव कमी मिळतो. त्याकरिता हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असल्यास पक्व झालेल्या (Physiological Maturity) पिकांची काढणी त्वरीत करून योग्य प्रकारे साठवणूक करावी.

बियाणे निवड

विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्यास पुढीप्रमाणे उपाययोजना करावी.

1) पिकांचा फेरबदल करावा.

2) उशिरा पेरणीस योग्य असलेल्या वाणांची व पिकांची निवड करावी.

3) कमी कालावधीमध्ये येणार्‍या वाणांची निवड करावी.

4) फक्त चार्‍यासाठी पिकाची निवड करावी.

5) बियाणांची उपलब्धता विचारात घेता फक्त अडचणीच्या परिस्थितीतच निर्धारित उगवणशक्तीपेक्षा थोडी कमी उगवणशक्ती असलेले बियाणे शेतकर्‍याकडे उपलब्ध असेल, तर त्यांनी ते बियाणे कृषी खात्याच्या शिफारशीप्रमाणे प्रति हेक्टरी पेरणीसाठी वापरावे.

पाणी व्यवस्थापन

  • पाण्याची कमतरता असल्यास शक्य तेथे एक सरी आड पाणी द्यावे.
  • आच्छादनाचा वापर करावा.
  • ठिबक/तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेमध्येच पाणी द्यावे.

 

स्रोत ः कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

स्त्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 7/25/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate