गेल्यावर्षी बांधावर रासायिनक खत वाटपाच्या शासनाच्या योजनेला शेतकऱ्यांचा मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांना रासायनिक खताबरोबरच मुबलक व माफक प्रमाणात सकस बी-बियाणेही बांधावर उपलब्ध करुन देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतलेला आहे. कृषी विभागाच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत होत असून समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वर्षी खता बरोबरच शेतकऱ्यांना बी-बियाणांचाही बांधावरच पुरवठा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी गटांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 931 शेतकरी गटांचे सहकार्य घेतले जाणार असून संबंधीत गावांना एकूण किती बी-बियाणे व रासायनिक खत लागणार आहे याची माहिती संबंधित बचतगटांमधून घेतली जाणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबिण, भुईमुग, नागली, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, ज्वारी आदी पिके घेतली जातात. त्यादृष्टीने जिल्ह्यात साधारणत: 3 लाख 75 हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी अपेक्षीत आहे. त्यानुसार जिल्हा कृषी विभागाने सुमारे 32 हजार क्विंटल बियाणे आणि सुमारे 1 लाख 97 हजार टन खताची उपलब्धता केलेली आहे. तालुका कृषि अधिकारी यांच्या शिफारशीने कृषि विकास अधिकारी कार्यालयाकडे ज्या शेतकरी गटांनी 15 ते 20 क्विंटल बियाण्याची मागणी केलेली आहे. अशा गटांना महाबीज मार्फत इश्यू प्राईजवर बांधावर बियाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी संबंधीत शेतकरी गटाने धनादेशामार्फत वेळेत रक्कम महाबीजकडे जमा करणे आवश्यक आहे.
गतवर्षी प्रथमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून बांधावर खत पुरवठा करण्यात आला होता. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाही जिल्हा कृषी विभागाने बांधावर खत वाटपाचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या संबंधित शेतकरी गटांनी तालुका कृषि अधिकारी यांच्या शिफारशीसहीत किमान 10 टन खताची मागणी नोंदविलेली आहे, अशा गटांना मार्केटींग फेडरेशन किंवा महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळामार्फत बांधावर शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करण्यात येणार आहे.
खत आणि बियाणांचा बांधावर पुरवठा करणाऱ्या शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे वेळेवर व रास्त दराने खत आणि बियाणे उपलब्ध होणार असून खत, बियाणे, पुरवठादार, कंपन्या व विक्रेत्यांकडून शेतकऱ्याची फसवणूक व अडवणूक करणाऱ्या दृष्टप्रवृत्तींना पायबंध घालणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात खरीप पेरणी काळात 14 भरारी पथकांचा जिल्ह्यातील खत, बी-बियाणांच्या विक्रेत्यांवर लक्ष असणार असून त्यांच्याकडून बनावट मालाची विक्री होऊ नये यासाठी ही पथके दक्ष राहणार आहेत.
गेल्यावर्षी राज्यात बहुतांशी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यामुळे अन्नधान्याचा उत्पादनाबरोबरच चारा उपलब्धतेच्या दृष्टिनेही यंदाचा खरीप हंगाम महत्वाचा आहे. बऱ्याचदा खाजगी विक्रेत्यांकडून चढ्या दराने बियाणे व खतांची शेतकऱ्यांना विक्री केली जाते. शिवाय काही वेळा हे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. गतवर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही बाब गांभिर्याने लक्षात घेता जिल्हा कृषी विभागाने नियोजनबध्द आखणी करुन जिल्ह्यात रासयनिक खते व बी-बियाणे बांधावर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणाऱ्या या उपक्रमाची आखणी केलेली आहे. ती निश्चितच कौतुकास्पद आहे. असेच म्हणावे लागेल ..!
- ४ जुलै २०१३
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 8/6/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...