অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विविध योजना - पालघर जिल्हा

विविध योजना - पालघर जिल्हा

  1. कृषी शैक्षणिक सहल
  2. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने जल उपसा सिंचन साधनांचा पुरवठा
  3. नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक उद्भवणाऱ्या किड रोगाचे नियंत्रण
  4. शेतकरी चर्चा सत्रे व पीक प्रात्यक्षिके
  5. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने निविष्ठा संच पुरवठा
  6. शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने पीक संरक्षण अवजारांचा पुरवठा
  7. कृषी दिन साजरा करणे
  8. अपंग शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानाने कृषी साहित्याचा पुरवठा
  9. जिल्हा व तालुका पातळीवर कृषी प्रदर्शने
  10. बचत गटाच्या शेती व्यवसायास चालना देणे
  11. ताडपत्री पुरवठा
  12. सुधारित कृषी अवजारांचा व स्वयंचलित/मनुष्यचलित कापणी व मळणी यंत्रांचा पुरवठा
  13. विजेत्या शेतकऱ्यांसाठी बक्षिसाची तरतूद करणे

राज्य शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित असते. या योजनांबरोबरच पालघर जिल्हा परिषदही सेस निधीमधून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काही विविध योजना राबवित आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधूपर्यंत या योजना पोहोचाव्यात, असा जिल्हा परिषद पालघरचा मानस आहे. या योजनांचा आढावा या लेखाद्वारे घेण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्याची ओळख सागरी, नागरी व डोंगरी जिल्हा अशी असली तरी प्रामुख्याने इथला व्यवसाय शेती आहे. त्यामुळे इथल्या शेती विकासासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच जिल्हा परिषद पालघरही प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या काही प्रमुख योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील.

कृषी शैक्षणिक सहल

कृषी तंत्रज्ञानविषयक अद्ययावत प्रगतीची माहिती व फळे/पिकांच्या लागवड पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना देवून राज्यातील विविध कृषी संशोधन केंद्रांना तसेच शेतीवर आधारित उद्योगधंदे, प्रक्रिया केंद्र इत्यादींना भेटी देणे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीविषयक शिक्षण देणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे. यासाठी शेतकऱ्यांची शैक्षणिक सहल कृषी विद्यापिठे व त्याची प्रक्षेत्रे येथे आयोजित करण्यात येते.

शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने जल उपसा सिंचन साधनांचा पुरवठा

पिकांना संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. उपलब्ध ओढे, नाले, विहिरी, नदी, यासारख्या जलस्त्रोतामधून सिंचनाकरिता पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल इंजिन, पेट्रो केरोसीन इंजिन, इलेक्ट्रीक मोटार पंपसंच, एचडीपीई पाईपचा शेतकऱ्यांना पुरवठा करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यक साहित्य 50 टक्के अनुदानाने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते.

नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक उद्भवणाऱ्या किड रोगाचे नियंत्रण

पालघर जिल्हा हा खरिपांचा जिल्हा असून विविध पिकावर वातावरणाच्या बदलामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर किड रोग आढळून येतात. किड रोगाचे योग्य आणि प्रभावी नियंत्रण करुन शेतकऱ्यांच्या शेतीचे पर्यायाने उत्पन्नाचे नुकसान रोखणे, उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे. किड रोग नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्याने फॅारेट, मोनाक्रोटोफॉस, मॅलेथिऑन, डायमेथोएट, कार्बन डायझीन इत्यादी किटकनाशके/बुरशीनाशके 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार या योजनेअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येतात.

शेतकरी चर्चा सत्रे व पीक प्रात्यक्षिके

कृषी विद्यापीठांनी संशोधन केलेल्या सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून करण्यात येतो. तसेच शेतकऱ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रसार केल्यास शेतीच्या उत्पादनातही वाढ होते. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात लागवड हंगामामध्ये कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन तसेच प्रत्येक पंचायत समिती गणात पीक प्रात्यक्षिकांचेही आयोजन करण्यात येते.

शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने निविष्ठा संच पुरवठा

शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धतीने बियाण्याचा वापर केल्याने अपेक्षित उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. शेतीचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे बदलाच्या प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी पिकांचे सुधारित व संकरित बियाणे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने उपलब्ध करुन देण्यात येतात. परसबागेसाठी भाजीपाल्याचे मिनीकीट बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते. सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.

शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने पीक संरक्षण अवजारांचा पुरवठा

हवामान, पर्जन्य यामधील लहरी बदलामुळे विविध पिकावर किड रोगाचे प्रमाण वाढत आहे. शेतात लागवड होणाऱ्या पिकांवर येणाऱ्या किड रोगामुळे शेतीचे अतोनात नुकसान होते व उत्पन्नात घट होते. मात्र किटकनाशके फवारणीसाठी स्प्रे पंप नसल्याने शेतकरी फवारणी करु शकत नाहीत. शेतकऱ्यांना किटकनाशकासोबत वेळेवर योग्य क्षमतेचे स्प्रे पंप उपलब्ध करुन दिल्यास योग्य मात्रेत किटकनाशकांची फवारणी करणे सोईचे होते. यासाठी शेतकऱ्यांना हस्तचलित स्प्रे पंप (नॅपसॅक स्प्रे पंप, आऊट साईड चेंबर, रॉकिंग स्प्रेअर व फूट स्प्रेअर) आणि स्वयंचलित स्प्रे पंप (पॉवर स्प्रेअर व HTP स्प्रेपंप) 50 टक्के अनुदानाने पुरवठा करण्यात येते. सर्व शेतकरी याचा लाभ घेवू शकतात.

कृषी दिन साजरा करणे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती दरवर्षी कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी शेतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन करुन जिल्ह्यातील शेतीनिष्ठ प्रगतशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. सत्कारामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांनी केलेल्या कामामुळे इतर शेतकऱ्यांना स्फूर्ती मिळते. प्रत्येक तालुक्यातील आदिवासी व सर्वसाधारण शेतकऱ्यांचा या योजनात समावेश करण्यात येतो. जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेले व स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केलेल्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येतो. या उपक्रमांमुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळते.

अपंग शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानाने कृषी साहित्याचा पुरवठा

या योजनेंतर्गत अपंग शेतकऱ्यांना कृषि साहित्याचा लाभ देण्यात येतो. अपंग शेतकरी स्वत: व त्याचे कुटुंबातील सदस्य यांनी त्याचा शेतीसाठी वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे व त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या योजनेमागील उद्देश आहे.

जिल्हा व तालुका पातळीवर कृषी प्रदर्शने

उत्तम दर्जाच्या शेती उत्पादनासाठी शेतकऱ्यामध्ये स्पर्धा निर्माण करणे तसेच शेतीमालाच्या उत्तम प्रतीच्या नमुन्यांना बक्षिसे देऊन शेतकऱ्यांसाठी सुधारित कृषी तंत्रज्ञानावरील जिल्हा व तालुका पातळीवर परिसंवादाचे आयोजन करण्यात येते. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व उत्पादकांची उत्पादने याविषयी शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

बचत गटाच्या शेती व्यवसायास चालना देणे

जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहत आहे. शेतीमध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत बचत गटांना सुधारित अवजारे, उपसा जलसिंचन साधने, पीक संरक्षण अवजारे अनुदानावर पुरवठा करुन त्यांना स्वयंपूर्ण करण्यास या योजनेद्वारे मदत होत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद गटातून एका बचत गटास रुपये 30,000/- चे मर्यादित सहाय्य देण्यात येते.

ताडपत्री पुरवठा

ताडपत्रीचा उपयोग शेतकऱ्यांना धान्य सुकविणे, मळणीसाठी जागा तयार करणे, अवेळी पावसापासून कापणी झालेल्या पिकाचे संरक्षण करणे आदी कामाकरिता होतो. शेतकऱ्यांना अनुदानाने ताडपत्री उपलब्ध करुन दिल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. यासाठी या योजनेंतर्गत ताडपत्री 50टक्के अनुदानाने पुरवठा करण्यात येते.

सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सुधारित कृषी अवजारांचा व स्वयंचलित/मनुष्यचलित कापणी व मळणी यंत्रांचा पुरवठा

शेतात लागवड होणाऱ्या पिकांवर मजुरीच्या खर्चात व वेळेची बचत करणारी विविध सुधारित कृषी अवजारे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानाने सुधारित कृषी अवजारे दातेरी विळे, गवत कापणी यंत्रे, कडबाकुट्टी यंत्रे, रोटरी टिलर, रोटा व्हेटर इत्यादी उपलब्ध करुन देण्यात येतात. भात कापणी व मळणीची कामे वेळेत करणे आवश्यक असते. कापणी केलेले भात व अन्य पिकांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मळणी केल्याने दाणे व पेंढा याचे गुणोत्तर वाढविण्यास मदत होते. सर्व शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.

विजेत्या शेतकऱ्यांसाठी बक्षिसाची तरतूद करणे

पीक स्पर्धा दरवर्षी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगाम अशा तालुका/जिल्हा/राज्य पातळीवर घेण्यात येतात. पीक स्पर्धांमधून भाग घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करणे व त्यासाठी सहाय्यभूत अर्थसहाय्य या योजनेतून देण्यात येते. तालुका पातळीवरील तीन विजेत्या शेतकऱ्यांना एकूण 10 हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम देण्यात येते. या योजनांच्या अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषी )अथवा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, या कार्यालयाशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्र.02525-27722 असा आहे. शिवाय राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेमार्फतही या योजना राबविण्यात येतात.

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पालघर.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate