অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फायदेशीर शेतीसाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’

फायदेशीर शेतीसाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’

राज्यातील 82 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीव्दारे मिळणाऱ्या उत्पन्नाचे साधन विकसित करण्यासासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग अग्रक्रम देत आहे. साधारणपणे गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर शेतकरी पुढील वर्षाच्या शेतीचे नियोजन सुरु करतो. त्यानुसार शासनानेही येत्या खरीप हंगामाचे आणि कृषि विकास व विस्ताराचे नियोजन तेव्हापासून सुरु केले आहे.
‘पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा तसेच पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न राज्यातील शेतकऱ्याला खात्रीशीरपणे मिळावे’ हा या वर्षीच्या शासनाच्या कृषीविषयक नियोजनाचा गाभा आहे. चालूवर्षी ‘रोहिणी’ नक्षत्रातील 15 दिवस (25 मे ते 8 जून) ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात सर्व कृषी शास्त्रज्ञ व कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी / कर्मचारी हे गावोगावी जावून आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि विविध योजनांची माहिती देऊन राज्यातील सुमारे 2 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार आहेत.

या वर्षीपासून कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी तालुका हा विकास घटक ठरवून नियोजन करण्यात आले आहे.


खरीप हंगामातील निविष्ठा वाटपाचे नियोजन

खरीप हंगामामध्ये लागणारे उत्तम प्रकारचे बियाणे, मुबलक प्रमाणात खते, दर्जेदार कीटकनाशके तसेच शासकीय प्रयोगशाळेतून जैविक द्रवरुप खते व जैविक कीटकनाशकांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. एवढेच नव्हे तर पुढील 5 वर्षांचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा देखील तयार केला आहे. 

सूक्ष्म सिंचन


पाण्याच्या प्रत्येक थेंबातून अधिक पीक उत्पादन (More Crop per drop) घेणेसाठी राज्यामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा सुयोग्य वापर करुन जास्तीत जास्त पिकांना सिंचन उपलब्ध होईल, असे नियोजन करुन उपलब्ध सिंचनाचा काटकसरीने वापर होण्यासाठी विविध सूक्ष्म सिंचन पद्धतीने अवलंब वाढविण्यावर भर दिला जात आहे. विशेषत: ऊस पिकासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी ऊस पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी यावर्षी ठिबक सिंचनाकरिता निधीत भरीव वाढ करण्यात आली असून एप्रिल ते डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जेणेकरुन पीक लागवडीपासूनच ठिबक सिंचन संच बसविणे शक्य होईल.

कृषी यांत्रिकीकरण


कृषी यांत्रिकीकरण मोहिमेद्वारे छोटे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, थ्रेशर तसेच भातासाठी ट्रान्सप्लांटर, रिपर, उसासाठी पाचट कुट्टी यंत्र, फळबागेसाठी स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर इ. यंत्र खरेदीसाठी वर्षाच्या सुरुवातीपासून शासन अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. ही यंत्रे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीने खरेदी करण्याची मुभा असणार आहे. गाव पातळीवर 10 हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्राधान्याने शेतकरी गटातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे.

कांद चाळ उभारणी


कांदा चाळ उभारणीसाठी असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन या वर्षात 2 लाख मे. टन कांदा साठवणूक क्षमता निर्माण करण्यासाठी 8 हजार चाळींची उभारणी करण्याचे नियोजन आहे.

जमीन आरोग्य पत्रिका


राज्यातील शेत जमिनींच्या आरोग्य पत्रिका तयार करुन शेतकऱ्यांना वितरीत केल्या आहेत. त्याआधारे पिकांना आवश्यक असलेल्या खतांची मात्रा जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक मदत व मार्गदर्शन करणार आहे.

ऊस उत्पादनात वाढ करणे


राज्यातील उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी उसाच्या सुधारित वाणांची लागवड करण्याच्या दृष्टीने रोपांपासून उसाची लागवड करण्याच्या तंत्रज्ञानास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर शेडनेटमध्ये उसाची रोपवाटिका तयार करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया


शेतकऱ्यांना शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करुन मूल्यवर्धित माल बाजारपेठेत विक्रीस नेणे शक्य व्हावे म्हणून प्राथमिक प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची नवीन योजना कृषी विभाग सुरु करीत आहे.

मूल्य साखळी निर्मिती- (Value Chain Development)-


काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर, साठवणूक सुविधांची निर्मिती व वापर, खरेदीदारांबरोबर समन्वय व आवश्यकतेनुसार करार करणे, प्राथमिक प्रक्रिया सुविधांची निर्मिती/वापर करणे आणि देशांतर्गत व देशाबाहेरील बाजारपेठांसाठी उत्पादकांची जोडणी करणे, यासाठी मूल्य साखळी निर्मिती करण्यात येणार आहे.

पीक विमा योजना


शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तसेच फळपिकांच्या उत्पादनाच्या कालावधीत पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग, गारपीट इत्यादी हवामान घटकातील चढ उतारामुळे होणाऱ्या फळपिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण मिळण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.

पीक उत्पादन खर्चात बचत


पीक उत्पादन खर्चात बचत करुन पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरच पडणार आहे. याकरिता पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पिकनिहाय कृषि विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शन करण्यात येत आहे. यातही विविध पीक योजनांमध्ये प्रात्यक्षिकाव्दारे सदर उपाययोजनांची परिणामकारकता दाखविण्यावर भर असणार आहे.

पीक पद्धतीमध्ये फेरबदल (Diversification of Cropping Pattern)


सध्या राज्यातील खरीप हंगामातील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी जवळपास 53 टक्के क्षेत्र केवळ कापूस व सोयाबीन या पिकाखाली आले असून परिणामी ज्वारी, बाजरी, कडधान्य व भुईमुगासारख्या तेलबियामध्ये लक्षणिय घट झाली आहे. त्यामुळे पीक पद्धतीमध्ये फेरबदल (Diversification of Cropping Pattern) करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश करता येईल.

कमी उत्पादकता आणि उत्पन्न देणाऱ्या पिकांऐवजी जास्त उत्पादकता आणि उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविणे. त्यात कापूस व सोयाबीन पिकाखालील क्षेत्राला दाळवर्गीय आणि तेलबिया पिकांकडे वळविणे आणि यासाठी आंतरपिक पद्धतीचा (सोयाबीन + तूर, कापूस + मूग /उडीद इ. ) अवलंब करणे. ज्वारी व बाजरी पिकाखालील क्षेत्रात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. भात पिकाच्या बांधावर तूर लागवडीस प्रोत्साहन देणे. भात पिकानंतर रब्बी हंगामात कडधान्य (हरभरा, लाखोळी, मसुर, इ.) तेलबिया (सुर्यफूल, जवस, तीळ इ.) व भाजीपाला पिकांखालील क्षेत्र वाढविणे. ऊस व मका पिकानंतर फेरपालटीसाठी कडधान्य व तेलबिया पिकांची लागवड करणे, जेणेकरुन जमिनीची सुपिकता टिकून राहील, आदी उपाययोजनांचा अवलंब करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

आंतरपिकाच्या माध्यमातून कडधान्य उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे


कडधान्य पिकाखालील सलग क्षेत्रामध्ये वाढ करण्यास मर्यादा असल्याने इतर प्रमुख पिकांमध्ये आंतरपिक म्हणून लागवडीस वाव आहे. सोयाबीन + तूर, कापूस + मूग, कापूस +उडीद, ज्वारी + तूर इत्यादी आंतरपीक पद्धती यशस्वी ठरल्याने त्यांचा अवलंब करण्यात येईल.

जलयुक्त शिवार अभियान


पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरविणे हे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीतील ओलाव्यातील सुरक्षितता (Soil Moisture Security) टिकविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान तसेच जल व मृद संधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. एकंदर विविध उपाययोजनांचा अवलंब करुन शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन हे आर्थिकदृष्ट्या फायद्यात आणता यावे यासाठी ‘उन्नत शेती -समृद्ध शेतकरी’ हे अभियान प्रभावी ठरेल हे निश्चित.

संकलन-जिल्हा माहिती कार्यालय,जळगाव
स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate