অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बायोगॅस प्रकल्प

बायोगॅस संयंत्राबाबत

बायोगॅस संयंत्रासाठी प्रामुख्याने जनावरांचे शेण, डुकरे-कोंबड्याची विष्ठा, जनावरांचे मूत्र, शौचालय जोडलेले असल्यास मानवी विष्ठा, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ, वाया गेलेल्या भाजीपाल्यांचे बारीक तुकडे इत्यादीचा वापर करता येतो. मात्र बायोगॅस संयंत्रामध्ये ओले गवत, हिरवा पाल्याचा लागलीच वापर केल्यास गॅस प्लॅंटमध्ये आम्लता वाढण्याचा धोका असतो, म्हणून हे पदार्थ पाच दिवस चांगले कुजवून नंतर संयंत्रात सोडावे. लाभार्थीकडे जनता प्रकारचा बायोगॅस असेल तर सदर संयंत्राचे इनलेट (पूरक कुंडी) मोठे असते. बायोगॅस संयंत्रामध्ये शेणराडा किंवा इतर कुजणारे पदार्थ पाण्यासोबत त्याच्या विशिष्ट प्रमाणात घातले असता त्यांची नैसर्गिक कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. सदरची प्रक्रिया हवेच्या अनुपस्थितीत होते. कुजण्याची प्रक्रिया निर्वातीय किटाणूमुळे सुलभरीत्या होते. तयार होणारा गॅस वरच्या डोममध्ये साठविण्यात येतो. सदर गॅसमध्ये मिथेन वायू 50 ते 75 टक्के, कार्बनडाय ऑक्‍साईड 25 ते 50 टक्के तसेच हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजनचे प्रमाण एक टक्‍क्‍यापर्यंत असते.
बायोगॅस संयंत्रातील पदार्थ कुजल्यानंतर तयार होणारी स्लरी गॅसच्या दाबामुळे बाहेर पडते. स्लरी हे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत आहे. बायोगॅस संयंत्रामध्ये कुजण्याची प्रक्रिया हवाविरहित होत असलेमुळे मानवी विष्ठा अगर इतर प्राण्याची विष्ठा वापरण्यात कोणतीच अडचण येत नाही. बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडलेले असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी फिनाईल, डिटर्जंट साबणाचा वापर करू नये. यामुळे निर्वातीय किटाणू मारले जाऊ शकतात, तसेच पदार्थ कुजवण्याची प्रक्रिया बंद पडू शकते.

बायोगॅस स्लरीचे खत


बायोगॅसपासून मिळणारे खत हे द्रवरूप आणि घनरूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते. सदरच्या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास खत शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते.
गोबरगॅस व लाभार्थीचे शेत यामधील अंतर जास्त असल्यास किंवा वाहतूक करण्यास अडचण असल्यास द्रवरूपातील खत शेतामध्ये नेणे अडचणीचे होईल. अशावेळी गॅसप्लॅंटजवळ खत साठविण्यासाठी खड्डा तयार करावा लागेल. खत साठविण्यासाठी आऊटलेटला लागून (रेचक कुंडी) दोन खड्डे करावे लागतील. एक खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात स्लरी सोडावी. खत वाळल्यानंतर ते हंगामानुसार शेतात वापरावे.

बायोगॅससाठी जागा

बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी. जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी. जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा. बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.

बायोगॅसचे प्रकार

केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे. बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात. स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन त्याच्या बांधकामाचे नियोजन करावे. ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे. ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.
दीनबंधू स्थिर घुमट संयंत्र प्रकारचा बायोगॅस कमी खर्चात होणारा बायोगॅस आहे. तो सर्वसामान्य लाभार्थीस परवडणारा आहे, मात्र या संयंत्राचे बांधकाम प्रशिक्षित व कसबी गवंड्याकडूनच करून घ्यावे लागते. तरंगत्या टाकीचा बायोगॅस बांधकामास खर्च बराच येतो.

बायोगॅससाठी अनुदान


ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते. बायोगॅस बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो. मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते. याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केल्यास (उदा. - इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान देण्यात येते. आपल्याला ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे त्याचा खर्च लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असतो. बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.

बायोगॅस प्रकिया

सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.
बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायूंचा समावेश असतो. यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे. कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा, इ. पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते. पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार होतात व ऍसिटिक ऍसिड तयार होऊन पाच विभिन्न प्रकारचे जिवाणू तयार होऊन मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो व त्याचे उष्णता मूल्य 4700 किलो कॅलरी इ. असते.
बांधकामाचा खर्च संयंत्राच्या आकारावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा दीनबंधू प्रकाराचे संयंत्र बांधण्याचा खर्च 40-45 हजार रुपये येऊ शकतो.
तरंगती टाकीचे बायोगॅस (फ्लोरिंग डोम) संयंत्राला येणारा खर्चही त्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा खादी ग्रामोद्योग प्रकारच्या संयंत्रासाठी अंदाजित साधारणपणे 45-50 हजार रुपये खर्च होतो.
बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची सोय करावी लागते, तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा गॅस व खत बाहेर येण्याची व साठविण्याची सोय करावी लागते.

शेणावर चालणाऱ्या बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी आवश्‍यक गोष्टी 

एक घन मी. गॅसनिर्मितीसाठी अंदाजे 25 किलो शेणाची आवश्‍यकता असते.
बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी वीजनिर्मितीसाठी तसेच काही वेळा स्वयंपाकासाठीदेखील वापरला जातो. बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो. त्यांची किंमत क्षमतेनुसार वेगवेगळी आहे.

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate