অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मृद आरोग्य पत्रिका अभियान

मृद आरोग्य पत्रिका अभियान; करूया जमिनीच्या आरोग्याचे रक्षण...

ही काळी आई... धनधान्य देई... जोडते मनाशी नाती.. ही आमची माती... काही वर्षांपूर्वी हे गीत सर्वांच्या मुखात होते. कारण बळीराजाने शेताशी आईचे नाते जोडले होते. पण आता सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे व अन्य कारणांमुळे या भूमातेचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. भूमातेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दर तीन वर्षांनंतर त्याच्या शेताची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन घ्यावयाची आहे. राज्यात या कालबद्ध महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी अत्यंत परिणामकारकपणे सुरु आहे.

मृद आरोग्य अभियान 2014-15 ते 2017-18 या तीन वर्षांमध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये आगामी तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील सर्व गावांची टप्प्याटप्प्याने निवड करुन तीन वर्षांत सर्व शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून त्याच्या जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती देण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाचा 50 टक्के व राज्य शासनाचा 50 टक्के आर्थिक सहभाग राहणार आहे.

योजनेचे उद्देश

  • रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर करुन कमी करुन मृद तपासणीवर आधारित, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे.
  • मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खत, निंबोळी / सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.
  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे.

योजनेचे नियोजन व अंमलबजावणी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने करावयाची असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. अभियानासाठी जिल्ह्यात 724 गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी जिल्ह्यातून एकूण 37 हजार, 820, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 51 हजार 113 असे एकूण तीन वर्षांसाठी 1 लाख 40 हजार 46 नमुने घेण्याचे नियोजन आहे. त्यातील बागायत क्षेत्रासाठी अडीच हेक्टर क्षेत्रामधून एक असे एकूण 96 हजार 270 नमुने आणि जिरायत क्षेत्रासाठी 10 हेक्टर क्षेत्रामधून एक असे 43 हजार 775 मृद नमुने घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे यांनी स्पष्ट केले.

यावर्षी खरीप हंगामासाठी 17 हजार नमुने घेण्यात आले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन गावातून 698, मिरज तालुक्यातील पाच गावातून 2 हजार 714, वाळवा तालुक्यातील पाच गावातून 3 हजार 554, आटपाडी तालुक्यातील सात गावातून 1 हजार 906, जत तालुक्यातील तीन गावातून 2 हजार 364, शिराळा तालुक्यातील पाच गावातून 1 हजार 116, पलूस तालुक्यातील दोन गावातून 985, खानापूर तालुक्यातील चार गावातून 1 हजार 45, कडेगाव तालुक्यातील तीन गावातून 1 हजार 511, तासगाव तालुक्यातील तीन गावातून 1 हजार 784 असे एकूण 17 हजार 677 नमुने घेण्यात आले आहेत. काढलेल्या मृद निर्धारित केलेल्या वर्षात विश्लेषणाचे काम सुरु आहे.

मृद आरोग्य अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात खरिपाचा लक्षांक पूर्ण झाला असून नमुने विश्लेषणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एका शासकीय आणि 8 खाजगी प्रयोगशाळेतून या मृद नमुन्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामध्ये मातीचा सामू व क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश, मुक्त चुना, सोडियम, सूक्ष्म मूलद्रव्ये आदि घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. रब्बी हंगामासाठी नमुने घेण्याचे काम जवळपास 60 ते 70 टक्के झाले आहे.

खरिपातील लाभार्थींना रब्बी हंगामाच्या आधी मृद आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात येणार आहे. मृद आरोग्य पत्रिकेत जमिनीचे आरोग्य म्हणजेच त्यातील घटकांची मात्रा सांगितली जाणार आहे. सुपीकता पातळीनुसार रासायनिक व सेंद्रिय खतांची मात्रा किती प्रमाणात वापरावी, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

-संप्रदा द. बीडकर
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, सांगली.

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate