অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकरी कुटुंबासाठी शासनाची कन्या वन समृद्धी योजना

शेतकरी कुटुंबासाठी शासनाची कन्या वन समृद्धी योजना

पर्यावरण, वृक्षलागवड आणि संवर्धनाबाबत सध्याच्या आणि भावी पिढीत आवड निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने कन्या वन समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला शासनाच्यावतीने विविध वृक्षांची दहा रोपे लागवडीसाठी विनामूल्य दिली जाणार आहेत.

भौगोलिक क्षेत्राच्या ३३% क्षेत्र वनाच्छदित करण्यासाठी वन विभागाकडून नवनवीन योजना नियमितपणे राबविण्यात येत आहेत. या योजनेमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, यासाठी सामान्य लोकांच्या सामाजिक गरजांचे भान ठेऊन योजना तयार केल्या जातात. या पार्श्वभूमीवर सध्या अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे लोकसंख्या वाढ आणि स्त्री भ्रूणहत्या. याबाबत सामाजिक जनजागृती आवश्यक आहे.

वैश्विक तापमान वाढीचे संकट, त्यामुळे निसर्गामध्ये झालेले मोठे फेरबदल, ऋतु बदलामुळे पावसाचा लहरीपणा, गारपीट/ वादळ / अवकाळी पाऊस/ ढगफुटी/ अतिवृष्टी/ महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेली वाढ, वाढते प्रदूषण इत्यादी कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवसृष्टीची स्थिरता (Ecological Stability) यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याशिवाय पर्याय नाही, हे जागतिकस्तरावर मान्य झाले आहे. त्यासाठी विविध माध्यमातून राज्यातील वन क्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी वन विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने समाजातील सर्व घटकांचा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभाग घेऊन जास्तीत जास्त झाडे लावणे अपेक्षित आहे. या सर्व बाबींचा विचार करुन “कन्या वन समृद्धी” ही योजना सुरु करण्यात आली.

योजनेचा उद्देश :

वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेत्तर क्षेत्र वनाखाली आणणे.

ज्या कुटूंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दाम्पत्यांला 10 रोपे विनामूल्य देऊन प्रोत्साहित करणे.

पर्यावरण, वृक्ष लागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इत्यादी बाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे.

अशा योजनेमधून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे. तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर अशा योजनांद्वारे काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे.

योजनेचे स्वरुप :

सदर योजनेच्या लाभाकरिता शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंद केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहीत नमुन्यात अर्ज करावा.

ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होईल त्या शेतकरी दांम्पत्याने मुलीसाठी तिच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत 10 झाडे लावण्याची संमती विहीत नमुन्यातील अर्जात दर्शवावी.

अर्जामध्ये मुलीचे संपूर्ण नाव, पालकाचे संपूर्ण नाव, संपर्कासाठी संपूर्ण पत्ता व आधार कार्ड क्रमांक इत्यादींचा उल्लेख करावा.

मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपणासाठी १० खड्डे खोदून तयार ठेवावेत.

नजीकच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेतून 10 रोपे विनामूल्य ग्रामपंचायतीमार्फत दिली जातील. त्यामध्ये सागाची 5 रोपे /सागवान आंबा 2 रोपे, 1 फणस, 1 जांभूळ आणि 1 चिंच इत्यादी भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या फळांच्या रोपांचा समावेश असेल.

एकंदर 10 झाडांची लागवड पूर्ण झाल्यावर लागवड केलेल्या ठिकाणाचे तपशील व मोबाईलद्वारे किंवा कॅमेराद्वारे रोपांचे फोटो संबंधित शेतकऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीस सादर केले जातील. सदर माहिती ग्रामपंचायतीमार्फत एकत्रित करून तालुकास्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना दरवर्षी 31 जुलै पर्यंत पाठविली जाईल.

लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीच्या कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविणे व मुलीच्या उज्जवल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या एैच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहील.

लागवड केलल्या झाडांची निगा, संरक्षण, संगोपन आणि झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण उच्च रहावे याकरिता शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला सामाजिक वनीकरण विभागामार्फत देण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांनी दरवर्षी दि.31 मे रोजी वृक्ष जिवंत असल्याच्या प्रमाणाबाबत ग्रामपंचायतीस माहिती द्यावी. ग्रामपंचायतींनी त्या संदर्भातील नोंद योग्य त्या प्रपत्रात व रजिस्टरमध्ये ठेवावी. तसेच दरवर्षी दि.30 जून पर्यंत वृक्ष जिवंत राहण्याच्या प्रमाणाबाबत एकत्रित माहिती ग्रामपंचायतींनी तयार करून संबंधित तालुक्यांचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना पाठवावी.

ही योजना ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 मुली जन्माला येतील व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल त्यांच्याचपुरती मर्यादित असेल. म्हणजेच 1 मुलगा किंवा मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उपलब्ध जागेत किमान 10 वृक्ष लावावेत. यासंदर्भात ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित आणि उद्युक्त करतील. शेतकरी कुटूंबात मुलगी जन्माला आल्याबद्दल ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी संबंधित शेतकरी कुटूंबाची भेट घेऊन अभिनंदन करतील. मुलीच्या जन्माच्या नोंदीच्या वेळी “कन्या समृद्धी योजनेबाबत” संपूर्ण माहिती, अर्ज करणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि प्रत्यक्ष वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संगोपन करणे इत्यादी माहिती ग्रामपंचायतीद्वारे संबंधित शेतकरी कुटूंबास सविस्तरपणे सांगण्यात येईल.

रोपांच्या वाटपाचा कालावधी –

मागील वर्षाचा दि. 1 एप्रिल ते चालू वर्षाचे 31 मार्च हे वर्ष गृहित धरून प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये किती शेतकरी कुटूंबामध्ये मुलींचा जन्म झाला त्याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीने तयार करावी. संबंधित तालुक्याचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी दि.31 मे पर्यंत माहिती ग्रामपंचायतीकडून घेऊन संकलित करावी. वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांनी नजिकच्या रोपवाटिकेतून प्रत्येक ग्रामपंचायतींना रोपांची उपलब्धता दि.30 जून पर्यंत करावी.

ज्या शेतकऱ्यांच्या कुटूंबात मुलीचा जन्म झाला आहे, त्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत 1 जुलै या एकाच दिवशी रोपांचे वाटप करावे. संबंधित शेतकऱ्याने या योजनेच्या अनुषंगाने दि.1 ते 7 जुलै पर्यंत वृक्ष लागवड करून माहिती संबंधित ग्रामपंचायतीला द्यावी. तसेच वर नमूद केल्याप्रमाणे लागवड केलेल्या ठिकाणाचे तपशील व मोबाईलद्वारे किंवा कॅमेराद्वारे रोपांचे फोटो संबंधित शेतकऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीस सादर केले जातील. सदर माहिती ग्रामपंचायतींनी एकत्रित करून तालुका स्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण यांना दरवर्षी दि.31 जुलै पर्यंत पाठविली जाईल.

रोपांचे वाटप व वृक्ष लागवडीची नोंद- रोपांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात यावे. रोपांचे वाटप करण्यापूर्वी ज्या कुटुंबात रोपांचे वाटप करावयाचे असेल त्यांना किमान 4 ते 6 दिवस आधी ग्रामपंचायतीमार्फत टोकन दिले जाईल. त्यामुळे कमी वेळात व्यवस्थितरित्या रोपांचे वाटप होऊ शकेल. तसेच संबंधित कुटुंबानी दि.1 ते 7 जुलै या आठवड्यात अशी झाडे लावण्याबाबत योग्य ती नोंद ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये वृक्ष नोंदवहीतील फॉर्म क्र.33 मध्ये ठेवावी.

रोपांची उपलब्धता- सामाजिक वनीकरण विभागाकडून एमजी-नरेगा अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या रोपवाटिकांमधून या योजनेसाठी लागणारी रोपे प्रामुख्याने उपलब्ध करून देण्यात येतील. जर अगदी अपवादात्मक परिस्थितीत रोपांची उपलब्धता एमजी-नरेगा अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या रोपवाटिकांमधून उपलब्ध होऊ शकली नाही तर वन विभागाच्या इतर नियमित योजना/कार्यक्रमांमधून उदा.वनमहोत्सव, मध्यवर्ती रोपमळे इत्यादीतून विकसित केलेल्या रोपवाटिकांमधून अगदी आवश्यक असतील तेवढी रोपे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

- विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate