অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतकरी - अपघात विमा योजना

प्रस्तावना

शेतात कष्टाने कामे करताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. घराचे अर्थकारण शेतकऱ्यावरच अवलंबून असल्याने समस्या अधिक गंभीर बनते. या संकटातून सावरण्यासाठी आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते.

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेली कारणे

शेती व्यवसाय करतांना, नैसर्गिक आपत्ती, विज पडणे, पुर यासोबतच विजेचा झटका बसणे, सर्पदंश, विंचुदंश, रस्त्यावरील वाहन अपघात, जनावरांने चावल्याने किंवा हल्ला केल्याने, खून झाल्यास, दंगलीत मृत्यू झाल्यास तसेच अन्य कोणत्याही अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ या अपघात विमा योजनेअंतर्गत देण्यात येतो. परंतू विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंधन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, भ्रमिष्टपणा, बांळतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून झाल्यास या कारणास्तव विमा संरक्षण लागू होत नाही.

विमा दावा करण्यासाठी आवश्यक घटक आणि कागदपत्रे

महसूल नोंदीनुसार 7/ 12 उताऱ्यावर नावाचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील सर्व महिला किंवा पुरुष शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे. शेतकऱ्यांच्या वतीने विमा हप्त्याची रक्कम शासन विमा कंपनीस अदा करत असते. योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अपघातात अपंगत्व आल्यास शेतकऱ्याने किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनी विहीत नमुन्यातील दाव्यासाठीचा अर्ज सादर करणे आवश्यक असते. अर्जासोबत शेतकरी म्हणून अपघातग्रस्ताच्या नावाचा समावेश असलेला 7/12 उतारा, ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबधित फेरफार नोंद (गाव नमुना नंबर 6-ड), शेतकऱ्यांचे वारस म्हणून तलाठी यांच्याकडील गाव नमुना नं.6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र हे कागदपत्रे मुळ स्वरुपात सादर करावेत. तसेच शेतकऱ्याचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, राजपत्रित अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेले ग्रामपंचायत प्रमाणपत्र, शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण भरलेला दाव्यासाठीचा अर्ज क्षेत्रिय कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा.

भरपाईची रक्कम आणि कालावधी

विमा कंपनीकडून दावे सादर केल्याच्या दोन महिन्याचा आत निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या किंवा वारसदारांच्या बचत खात्यात जमा केले जातात. यात शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातामुळे 2 डोळे निकामी झाल्यास, 2 अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. अपघामुळे एक डोळा निकामी झाल्यास किंवा एक अवयव निकामी झाल्यास 50 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात येते. तसेच विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्याबाबत विमा कंपनीकडून पत्राद्वारे अर्जदारास कळविण्यात येते. विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याबाबत काही वाद उद्भवल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियंत्रण समिती निर्णय घेते. विमा दावा विवादास्पदरित्या नामंजूर झाला असल्यास अर्जदार या समितीकडे तक्रार दाखल करू शकतात.

आपल्या हितासाठी शेतकरी बांधवांनी या योजनेची माहिती करून घ्यायला हवी. तसेच एखाद्या शेतकऱ्याला अपघातात अपंगत्व आल्यास त्याने किंवा मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाने भरपाईसाठी दावा दाखल करणे आवश्यक आहे. 

लेखक : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी.

स्त्रोत:महान्यूज

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate