অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतमालतारण कर्ज योजना : शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापनाची सुवर्णसंधी

शेतमालतारण कर्ज योजना : शेतकऱ्यांना आर्थिक व्यवस्थापनाची सुवर्णसंधी

शेतमालाच्या काढणी हंगामात उतरत्या बाजार भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. हे आर्थिक नुकसान टाळून त्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यातील बाजार समित्यांचे माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे. शेतकऱ्यास सुगीच्या कालावधीत असलेली आर्थिक निकड विचारात घेऊन, त्यांना गरजेच्या वेळी सुलभ व त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे हा शेतमालतारण कर्ज योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते.

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य बाजारभाव मिळावा, या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेली शेतमालतारण कर्ज योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे ही योजना व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. शेतमाल तारण कर्ज योजना अधिक व्यापक करून, सदर योजनेचा लाभ राज्यातील घेवडा व सुपारी उत्पादकांना व्हावा, यासाठी वाघ्या घेवडा (राजमा) व सुपारी या शेती उत्पादनांचा तारण कर्ज योजनेत समावेश करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातर्फे घेण्यात आला आहे. तसेच चालू हंगामामध्ये प्रायोगिक तत्वावर गुळासाठी तारण कर्ज देण्यासही मान्यता दिली आहे.

गेल्या काही वर्षापासून कृषि पणन मंडळामार्फत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे. शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा, हळद इ. शेतमालाचा समावेश आहे. आता त्यामध्ये सुपारी व वाघ्या घेवडा (राजमा) आणि गुळ यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा, आपल्या कार्यक्षेत्रात व्यापक प्रचार व प्रसिद्धी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल तारण स्वरुपात स्वीकारून, शेतकऱ्यांना तारण कर्ज अदा करावे यासाठी सन 2016-17 मध्ये, बाजार समित्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस योजना सुरू केली आहे. त्यामध्ये विभागातील सर्वात जास्त शेतकऱ्यांचा शेतमाल तारणात स्वीकारून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तारण रकमेचे वाटप केले आहे, अशा पहिल्या तीन बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाने प्रेरणा घेऊन, सन 2018-19 या वर्षात 138 बाजार समित्यांनी सुमारे 2 लाख क्विंटल शेतमाल तारणाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याची विभागनिहाय थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे ;

विभाग

बाजार समिती संख्या

शेतकरी संख्या

शेतमाल (क्विंटल)

तारण रक्कम रूपये(कोटीत)

अमरावती

45

2184

84889.14

19.71

औरंगाबाद

22

320

12240.35

2.72

कोल्हापूर

1

9

365.72

0.18

नागपूर

26

1416

58602.47

9.50

नाशिक

14

58

1353.56

0.26

पुणे

12

492

8578.91

1.73

लातुर

17

599

33253.51

6.21

कोकण

1

14

806.80

0.81

एकुण

138

5092

2,00,090.46

41.13

शेतमाल तारण कर्ज योजनेचे ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत-

• राज्यातील बाजार समित्यांमार्फत 2 लाख क्विंटल शेतमाल तारणात ठेवण्याचा टप्पा पूर्ण.

• शेतमाल तारण कर्ज योजनेचा 5,092 शेतकऱ्यांनी चालू हंगामात लाभ घेतला आहे.

• सन 2017-18 मध्ये 138 बाजार समित्यांनी 2092 शेतकऱ्यांचा शेतमाल तारणात ठेवला आहे.

• सदर योजनेसाठी निधी कमी पडू नये म्हणुन कृषि पणन मंडळामार्फत चालू आर्थिक वर्षात रूपये 25 कोटीची तरतूद.

• राज्यातील ज्या बाजारसमित्यांकडे शेतमाल तारण योजना राबविण्याकरीता निधीची कमतरता आहे, अशा बाजार समित्यांना योजना राबविण्यासाठी 5 लाखरूपये अग्रिम देण्यातआला आहे. याचा 29 बाजार समित्यांनी लाभ घेतला. त्यांना 1 कोटी 11 लाख रूपये रक्कम अग्रिम देण्यात आली.

• चालू हंगामात काजू बी तारणाच्या कर्ज रक्कमेत 20 रुपये प्रति किलो वाढ करण्यात आली. रत्नागिरी बाजार समितीने योजनेत भाग घेऊन चालू वर्षात प्रथमच कोकण विभागात 14 शेतकऱ्यांचा 806 क्विंटल काजू बी तारणात घेऊन सुमारे 80 लाख रुपये तारण कर्जाचे वाटप केले.

• सन 2018-19 साठी योजनेची व्यापकता वाढविण्यासाठी योजनेत “सुपारी” व “वाघ्याघेवडा” (राजमा) यांचा तारण योजनेत समावेश करण्यात आला. तसेच प्रायोगिक तत्वावर गुळाचाही समावेश करण्यातआलाआहे.

• बाजार समित्यांकडे स्वमालकीचे गोदाम उपलब्ध नसल्यास, बाजार समित्यांना कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांचे गोदाम भाड्याने घेऊन तारण कर्ज योजना राबविण्याची आणि केंद्रीय अथवा राज्य वखार महामंडळाच्या गोदामातील शेतमालाच्या वखार पावतीवर शेतकऱ्यांस तारण कर्ज उपलब्ध करून, तसेच नजिकच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल तारणात ठेऊन त्यावर तारण कर्ज देण्यास मान्यता.

शेतमालतारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक व्यवस्थापनाची सुवर्णसंधी आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने केले आहे.

- जयंत कर्पे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate