অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सातबारा

सातबारा म्हणजे काय ?

जमिनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाहीत व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावातील महसूली माहिती ही गाव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकी हक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यात आला. 7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही.

उदाहरणार्थ एका शेतकऱ्याने त्यांच्या मालकीची 1 हेक्टर जमीन 5 मे 2000 रोजी दुसऱ्या शेतकऱ्यास रजिस्टर खरेदीखताने विकली. रजिस्टर दस्त 5 मे रोजीच नोंदविला. 6 मे 2000 रोजी या जमिनीचा मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरेदीदार गोविंद हाच मालक ठरतो. परंतु 6 तारखेला 7/12 वर गणपतचेच नाव असू शकते. बऱ्याचवेळा खरेदी विक्रीनंतर 3-4 महिन्यांनी 7/12 वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकी हक्क 3-4 महिन्यांनी निर्माण होतो असे नाही.

7/12 उतारा हा प्रत्येक शेतकऱ्याला वाचता आला पाहिजे. त्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, कब्जेदाराचे नाव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नाव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-7) लिहिलेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-12) मध्ये लिहिलेला असतो.

सर्वसाधारणपणे दर 10 वर्षांनी 7/12 पुस्तके नव्याने लिहिली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने 7/12 उतारे लिहिले जातात. 7/12 वरील मालकीहक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय 7/12 वर येऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, कोणत्याही शेतकऱ्याला जर अशी शंका आली की, पूर्वी अमुक नाव 7/12 वर कसलाही कायदेशीर आधार नसताना नोंदलेले आहे तर त्याने जुने 7/12 उतारे काढून, फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नाव कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.

दैनंदिन जीवनात आपणास रेशनचा फॉर्म, शाळेचा फॉर्म, टेलिफोनचा फॉर्म, पासपोर्टचा फॉर्म, ट्रॅक्टर नोंदणीचा फॉर्म, इलेक्ट्रीसिटीचा फॉर्म असे विविध फॉर्म भरावे लागतात. परंतु वर्षानुवर्षे हाताळला जात असलेला 7/12 चा नमुना मात्र अनेकांना अनाकलनीय का वाटतो ? जाणीवपूर्वक 7/12 उतारा शांतपणे समजून घेतला पाहिजे.

7/12 च्या संदर्भात महत्वाचे मुद्दे

• आपल्या नावावर असणाऱ्या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी एक 7/12 उतारा असतो.
• आपल्या नावावर असणाऱ्या सर्व गटांच्या 7/12 प्रमाणे 8अ वर एकत्रित नोंद असते, त्यामुळे सर्व गटांचे 7/12 व 8अ यांची तुलना करुन पहा.
• 7/12 वर इतर हक्कात कोणत्या नोंदी आहेत हे काळजीपूर्वक पहा. कर्ज, तगाई यांची रक्कम व कर्ज 
• देणाऱ्या संस्थेचे नाव बरोबर असल्याची खात्री करावी.
• शेतात असणाऱ्या विहिरींची किंवा बोअरवेलच्या नोंदी त्या-त्या 7/12 उताऱ्यावर "पाणी पुरवठ्याचे साधन" या रकान्याखाली करुन घ्या.
• सर्व फळझाडांच्या नोंदी नमुना बारा मध्ये "शेरा" रकान्यात करुन घ्या.
• कोणतीही फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर लगेचच 7/12 वर या नोंदीचा अंमल घेतला जातो.
• कायद्यानुसार प्रमाणित नोंद ही, त्याविरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत खरी असल्याचे मानले जाते.
• अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर फेरफार नोंद न घालता फक्त वर्दीवरुन अज्ञानाच्या पालकाचे नाव कमी करता येते.
• दर दहा वर्षांनी 7/12 पुन्हा लिहिला जातो. खोडून टाकलेल्या सर्व बाबी वगळून व शेवटची स्थिती दर्शविणाऱ्या चालू नोंदीची नक्कल करुन 7/12 लिहिला जातो.
• 7/12 वर केली जात असलेली पीक पहाणीची नोंद दरवर्षी केली जाते. दरवर्षीची पीक पहाणी ही कायद्यानुसार स्वतंत्र बाब आहे.
• महसूल कायद्यानुसार अपिलात किंवा फेरतपासणीमध्ये मूळ 7/12 अगर नोंदीमध्ये बदल करावयाचे आदेश दिले गेले तर तलाठ्यास निकालपत्राची प्रमाणीत प्रत मिळाल्यानंतर थेट फेरफार नोंद घालावी लागते. अशा नोंदीची नोटीस पक्षकारांना देण्याची आवश्यकता नाही.

 

लेखिका - मनीषा पिंगळे

जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate