অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सायबर गुन्हे - भाग १

सायबर गुन्हे - भाग १

नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्हेगारीकडे पहावे लागेल. आधुनिक काळात ही एक जागतिक समस्याच बनली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा गुन्ह्यांत महिला मोठ्या संख्येने बळी ठरलेल्या दिसतात. त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेलाच यामुळे धोका आहे. मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आयटी ॲक्ट 2000 (माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000) हा कायदा आपल्याकडे करण्यात आला आहे. हॅकिंग, इंटरनेटवर अश्लिल गोष्टी किंवा मजकूराचे प्रकाशन इत्यादी गोष्टी कायद्याने गुन्हा मानण्यात आल्या आहेत. मात्र एकूणच महिलांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता हा कायदा परिपूर्ण नाही, असेच म्हणावे लागेल. लहान मुलांना यापासून वाचविण्यासाठी सेफ्टीवेब (सुरक्षित इंटरनेट जाळे) हे पालकांना सहाय्यकारी ठरत असते. आपण सायबर गुन्ह्याविषयी दोन भागात माहिती जाणून घेऊया…

महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे

एकूण सायबर गुन्ह्यांपैकी मोठ्या संख्येने गुन्हे हे केवळ महिलांच्याच बाबतीत घडत असतात. ते पुढीलप्रमाणे :
  • ई-मेलद्वारे होणारा छळ
  • सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)
  • सायबर पॉर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)
  • सायबर डीफमेशन (बदनामी)
  • मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)
  • ई-मेल स्फुफींग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)

ई-मेलद्वारे होणारा छळ

पत्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या त्रासाची ही पुढची पायरी म्हणावी लागेल. ब्लॅकमेल करणे, धमकावणे, दंडेली करणे किंवा फसवणूक करणे इत्यादी प्रकारांचा या पद्धतीच्या छळवणुकीत समावेश होतो. पत्रांद्वारे एखाद्याचा छळ करण्याप्रमाणेच हे आहे. मात्र बहुतेकवेळा बनावट खात्यांवरुनच असे ईमेल पाठविले जात असल्याने ते अधिक त्रासदायक असते.

सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)

आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो. एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस पाठविणे, ईमेल्स पाठविणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाते. यापैकी काही मेसेज धमकीचेही असतात. महिलांना पुरुषांकडून तर लहान मुलांना लैंगिक अत्याचाराची प्रवृत्ती असलेल्यांकडून अशा प्रकारच्या स्टॉकिंगला सामोरे जावे लागते. बहुतेकदा इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना याचा सामना करावा लागतो.
बहुतेक प्रकरणात महिला, मुले किंवा भावनिकदृष्ट्या कमजोर गुन्हेगारांचे बळी ठरतात. पण त्यातही 75 टक्क्यांपेक्षा जास्त महिलाच बळी ठरत असल्याचे मानले जाते. हे गुन्हे करण्यामागे चार प्रकारची कारणे किंवा मानसिकता असल्याचे दिसून येते. ज्यामध्ये लैंगिक छळ करण्याचा उद्देश, प्रेमात पछाडलेले असणे, बदल्याची किंवा द्वेषाची भावना आणि इगो यांचा समावेश आहे.वेबसाईटस, चॅट रुम्स, इंटरनेटवर असलेली चर्चा घडविणारी व्यासपीठे, ब्लॉग इत्यादी प्रकार आणि ईमेल या माध्यमांद्वारे गुन्हेगार आपल्या बळींना लक्ष्य करतात. मोफत उपलब्ध असलेले ई मेल्स तसेच चॅट रुम्स किंवा इतर व्यासपीठांवर उपलब्ध असलेले अनामिकत्व (जेथे तुम्ही तुमची खरी ओळख लपवून ठेवू शकता) यामुळे या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसते.

आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटना

  • राजधानी दिल्लीतील एका प्रकरणात मनीष कथुरिया नावाची व्यक्ती रितू कोहली या स्त्रिचा सायबर विश्वातून छळ करत होती. एमआयआरसी या वेबसाईटद्वारे तिचे नाव वापरत कथुरिया बेकायदेशीरपणे चॅट करत असे. त्यावेळी तो अतिशय अश्लिल आणि घाणेरडी भाषा वापरत असे. सर्वात भयानक प्रकार म्हणजे त्याने या माध्यमातून रितूच्या घरचा टेलिफोन क्रमांक सगळीकडे पसरविला आणि तिच्याशी गप्पा मारण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले. ज्यामुळे रितूला अश्लिल भाषा वापरणाऱ्या अनेकांचे फोन येऊ लागले. या गोष्टीचा धक्का बसलेल्या रितूने तातडीने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तातडीने त्याची दखल घेत आरोपीचा तपास केला आणि भादंवि 509 खाली आरोपीला अटक केली.
  • आणखी एका प्रकरणात एका अभियंत्याला, ज्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप होता. दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्ह्यासाठीच अटक केली. आपल्या पत्नीच्या नावे अनेकांना अश्लिल ईमेल्स पाठविल्याचा त्याच्यावर आरोप होता.
  • जून 2000 मध्ये दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. हा इसम आपल्या पूर्वीच्या मालकाच्या पत्नीचे नाव चॅट चॅनेलमध्ये वापरत तर होताच. पण इतरांनाही तिच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रोत्साहन देत होता. रात्री-अपरात्री अशा प्रकारच्या अश्लिल कॉल्सने त्रस्त झालेल्या त्या स्त्रीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यावेळी आरोपी ऑनलाईन सापडला आणि टेलिफोन क्रमांकाच्या माध्यमातून पोलिसांनी त्याला पकडले.

सायबर पोर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)

महिला नेटीझन्ससाठी ही आणखी एक महत्वाची समस्या आहे. यामध्ये पोर्नोग्राफिक वेबसाईटस्, संगणकाचा वापर करत निर्मिलेली पोर्नोग्राफिक (मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी किंवा छापण्यासाठी) आणि इंटरनेट (पोर्नोग्राफिक (अश्लिल) चित्र, छायाचित्र किंवा मजकूर डाऊनलोड किंवा ट्रान्स्मिट करण्यासाठी) यांचा समावेश आहे.पोर्नोग्राफीसारखे गुन्हे इंटरनेटच्या माध्यमातून करणे अत्यंत सुलभ बनले आहे. सायबर पोर्न या नावाने ओळखला जाणारा हा गुन्हा सगळीकडेच मोठ्या प्रमाणात घडताना दिसतो. सुमारे 50 टक्के वेबसाईटसवर पोर्नोग्राफीक मजकूर रिप्रोड्युस (पुर्निमिती) करणे सहज शक्य आहे.
तसेच नवीन तंत्रज्ञानामुळे केवळ मजकूर, चित्रे किंवा छायाचित्रांपुरतेच हे मर्यादीत नसून व्हिडीयो क्लिप्स आणि संपूर्ण लांबीचे सिनेमेही आता सहज उपलब्ध आहेत. सहजपणे असलेली उपलब्धता आणि विशेषत: लहान मुलांना सहज झालेली उपलब्धतता हा याचा सर्वात मोठा तोटा म्हणावा लागेल. कारण घरात बसून कोणालाही न समजता वेबसाईटच्या माध्यमातून पोर्न सहजपणे बघता येऊ शकते. यासाठी त्यांना प्रत्यक्षपणे कोठे जाण्याची गरज उरलेली नाही. त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुलांना संबंधित पोर्नोग्राफी जी जागतिक पातळीवर अयोग्य मानली जाते, अशा प्रकारची पोर्नोग्राफी पसरविणे किंवा लपवून ठेवणे हे इंटरनेटमुळे गुन्हेगारांना अगदीच सोपे झाले आहे.
सायबर पोर्नोग्राफीबद्दल देशात नुकतेच गाजलेले प्रकरण म्हणजे एअर फोर्स बालभारती शाळेचे प्रकरण, एअर फोर्स बालभारती शाळेतील एका विद्यार्थ्याची चेहऱ्यावरील डागांमुळे सतत थट्टा होत होती. या क्रूर थट्टेला कंटाळलेल्या या विद्यार्थ्याने थट्टेखोरांचा बदला घेण्याचे ठरविले. त्याने त्याचे वर्गमित्र आणि शिक्षकांचे फोटो स्कॅन केले आणि त्यावर नग्न फोटोंना मॉर्फ केले (संगणकाच्या माध्यमातून छायाचित्रांमध्ये केलेल्या फेरफारास मार्फ करणे असे म्हणतात.) आणि वेबसाईटवर टाकले. त्याच्याच वर्गातील एका मुलीच्या वडिलांनी याबाबत आक्षेप नोंदवत तक्रार दाखल केल्यानंतर या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली.तर दुसरे एक प्रकरण मुंबईतील आहे. स्वित्झर्लंडचे एक जोडपे झोपडपट्टीतील लहान मुलांवर अश्लिल छायाचित्रे देण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांसाठी असलेल्या खास वेबसाईटवर ही छायाचित्रे पोस्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफीच्या गुन्ह्याखाली या जोडप्याला अटक केली.

सायबर डीफमेशन (बदनामी)

अब्रुनुकसानी किंवा बदनामी करणे हा महिलांविरुद्ध घडणारा आणखी एक सायबर गुन्हा आहे. संगणकाच्या मदतीने किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बदनामी केल्यास तो सायबर गुन्हा ठरतो. उदाहरणार्थ वेबसाईटवरुन एखाद्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणे किंवा एखाद्याबाबत बदनामी करणारी माहिती ईमेलच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या मित्रांना पाठविणे, इत्यादी.

मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)

मॉर्फिंग म्हणजे मूळ चित्रामध्ये बेकायदेशीरपणे केलेले बदल, बनावट खातेधारक महिलांची चित्रे डाऊनलोड करुन त्यामध्ये बदल करुन ती दुसऱ्या वेबसाईटवर पुन्हा पोस्ट करतात. असे करणे हा आयटी ॲक्ट् 2000 अंतर्गत गुन्हा आहे. भादंवि खालीही गुन्हेगाराला अटक होऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार दिल्लीतील एका ब्युटीशियने अशाच एका प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली होती. एका पोर्नो पोर्टवर तिचे छायाचित्र आणि तिचा मोबाईल क्रमांक प्रसिद्ध केल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.

ई-मेल स्फुफिंग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)

स्फुफ्ड ईमेल म्हणजे अशा ईमेल ज्यांद्वारे मूळ गोष्टीचे चुकीच्या पद्धतीने विडंबन केले जाते.

लेखिका - नेहा पूरव
ज्येष्ठ पत्रकार.
स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 1/28/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate