महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतीमान व सुलभ होण्याकरिता आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने सर्व सामान्य नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सुवर्ण जयंती राजस्व अभियान सुरु केले. राज्याच्या सर्व जिल्ह्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान दि. 1 मे, 2011 पासून लागू करण्यात आले.
सर्व सामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागाच्या कार्यालयाशी नियमित संबंध येतो. त्याकरिता त्यांना तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय येथे वारंवार भेटी द्याव्या लागतात. ग्राम पातळीवरील नागरिकांच्या समस्या कमी वेळात दूर करण्याच्या दृष्टीने सुवर्ण जयंती राजस्व अभियान महत्त्वाचे ठरले आहे. विशेषत: नागरिकांना विविध कामांसाठी लागणारी कागदपत्रे संगणकीकृत स्वरुपात उपलब्ध होत असल्याने कामकाजाचा वेगही वाढला आहे.
महसूल विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या दाखल्यांची प्रक्रिया ऑनलाईन करणे, माहिती मिळण्यापासून तक्रार निवारणापर्यंतच्या कामकाजासाठी ई लोकशाही प्रणालीसारखी हेल्पलाईन उपलब्ध करुन देणे, ई-चावडी योजना राबवणे, शासकीय कामाकाजासाठी मोबाईल, इंटरनेट, व्हिडीओ कॉन्फरन्स, जीपीएस, सॅटेलाईट इमेज अशा अत्याधुनिक यंत्रणा आणि सुविधांचा उपयोग करुन जनतेची कामे तातडीने मार्गी लावणे प्रलंबित महसूल प्रकरणे व अपिलीय प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणे प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयात मदत आणि जनसंपर्क कक्ष स्थापन करणे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोदविण्याकरिता बायोमॅट्रिक यंत्रणा बसविणे, अशा अनेक निर्णयांची अंमलबजावणी सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून राज्यभर करण्यात आली आहे.
सुवर्ण जयंती राजस्व अभियान पुस्तिका पहाण्यासाठी येथे क्लिक करा
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 1/28/2020