অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची गरुड भरारी

रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची गरुड भरारी

सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि गुणात्मक करण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेमध्ये संगणकीकरण आणि बायोमेट्रिक प्रणालीचा प्रयोग यशस्वीपणे राबविल्यामुळे कोल्हापूरचा पुरवठा विभाग राज्यात रोल मॉडेल ठरला असून बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये कोल्हापूर पॅटर्नने संपूर्ण राज्यात गरुड भरारी घेतली आहे.

गेल्या सहा महिन्यापासून कोल्हापूरचे जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली रेशनिंग प्रणालीमध्ये बायोमेट्रीकचा अवलंब करुन राज्यात एक लौकीक निर्माण केला आहे. गेल्या सहा महिन्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दरमहा सुमारे 5 लाख रेशनिंग कार्डावर 1 कोटी किलोहून अधिक धान्याचे बायोमेट्रिक पद्धतीने वितरण करीत कोल्हापूर जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने राज्यात ई-रेशनिंगच्या अंमलबजावणीत प्रचंड अशी आघाडी घेतली आहे. राज्यात इतर जिल्ह्यामध्ये ई-रेशनिंगबाबत फारशी गती नसतांना कोल्हापूरात मात्र हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. कोल्हापूरच्या या यशस्वी प्रयोगाची माहिती घेण्यासाठी राज्याच्या अन्य जिल्ह्यातूनही पुरवठा विभागाची पथके कोल्हापूरला भेट देऊन बायोमेट्रिक प्रणाली जाणून घेत आहेत, ही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या बाबतीत अभिमानाची बाब मानावी लागेल.

रेशनिंगमध्ये बायोमेट्रीक प्रणालीचा अवलंब ही बाब प्रत्यक्षपणे राबवितांना आलेल्या अडचणींचे शांत, संयमाने मात्र प्रशासकीय नियमांना धरुन तसेच या व्यवस्थेतील सर्व संबंधित घटकांचा सहभाग घेऊन निरसन करण्याचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मनापासून केले आहे. या प्रणालीच्या वापरामुळे रेशनिंग यंत्रणेविषयी समाजात विश्वास निर्माण होण्याबरोबरच शासनाच्या कोट्यावधी रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे ही प्रणाली रेशन दुकानदारांसाठी एक आव्हान असून ते आव्हान स्वीकारण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानदारांचे वैचारिक प्रबोधन करण्यावर प्रशासनाने अधिक भर दिला. रेशन दुकानदारांच्या सक्रीय सहभागाशिवाय रेशनिंगमध्ये बायोमेट्रीक प्रणाली राबविणे अशक्य असल्याने प्रथम रेशनदुकानदारांना विश्वासात घेऊन त्यांना मशिन हाताळण्याच्या प्रणालीचे त्याबाबतच्या प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षणही दिले, या सर्व सकारात्मक बाबीमुळेच ही प्रणाली राबविण्यात श्री.आगवणे यांना यश येऊन कोल्हापूर पुरवठा विभागाच्या शिरपेचात लौकिकाचा तुरा रोवला गेला. या प्रणालीच्या अंमलबजावणीत सर्वच घटकांना विश्वासात घेऊन ही प्रणाली प्रत्यक्षपणे राबविली गेल्याने हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी होण्यास मदत झाली. खऱ्या अर्थाने ही महत्वाची बाब मानावी लागेल.

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शी करण्याच्या मुख्य उद्देशाने रेशनिंगमध्ये बायोमेट्रीक प्रणाली राबविण्यात आली. या नव्या प्रणालीमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील काळाबाजार थोपविण्यासाठी स्वस्त धान्य दुकाने सर्व रेशन कार्डावरील तपशीलाच्या डेटा एन्ट्रीसह प्रथम ऑनलाईन करण्यात पुढाकार घेतला गेला. संगणकीकृत यंत्रणेद्वारे रेशनकार्ड धारकांची तसेच दररोज धान्य उचलल्याची माहितीही अपलोड होत गेली. याशिवाय थम्ब इम्प्रेशन द्वारा बायोमेट्रीक पद्धतीचा वापर अनिवार्य केल्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळतच नसल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता वाढली. याबरोबरच या नव्या उपक्रमामुळे पात्र आणि गरजू कुटुंबालाच स्वस्त धान्य मिळू लागले, यामुळे शासनाची कोट्यावधी रुपयांची बचत होत आहे.

याबरोबरच संपूर्ण कोल्हापूर शहर केरोसिनमुक्त झाले असून जिल्ह्यातही 65 टक्के केरोसिन बंद झाले आहे. नजिकच्या काळात संपूर्ण जिल्हा केरोसिनमुक्त बनविण्याचा निर्धारही पुरवठा विभागाने केला आहे.

जिल्ह्यात रेशनिंगमध्ये बायोमेट्रीक प्रणालीचा अवलंब केल्याने रेशनकार्ड धारकांचा तर फार मोठा फायदा झाला असून रेशनदुकानदारांवर पूर्वापार पडलेला काळाबाजाराचा शिक्का पूर्णत: पुसून टाकण्यास मदत झाली आहे. अर्थातच नव्या व्यवस्थेमध्ये बायोमेट्रिक पद्धतीबरोबरच रेशन दुकानदारांच्या हिताचा देखील शासनाने गांभिर्याने विचार केला असून त्यांच्या कमिशनमध्ये 70 रुपयांवरुन 150 रुपये इतकी भरघोस अशी वाढ केली आहे. रेशन दुकानदारांना बँक करस्पॉन्डटस असा जणू मिनी बँकेचा दर्जा प्राप्त करुन दिला जात आहे. तसेच रेशन दुकानातून बी-बीयाणे व 5 किलो मर्यादेत गॅस सिलिंडर्स विक्रीची परवानगी देण्यासारखे अत्यंत महत्वपूर्ण आणि क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतल्यामुळे संपूर्ण राज्यभर बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीच्या अंमलबजावणीत गती घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्र राज्य हे एक मॉडेल स्टेट म्हणून व कोल्हापूर जिल्हा हा एक मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून लवकरच नावारुपाला येईल. याबायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीच्या उपक्रमामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांची बचत झाली असून पुरवठा यंत्रणा अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि गतीमान झाल्याचे चित्र आज कोल्हापूरात दिसत आहे.

- एस.आर.माने

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 10/28/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate