प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात जोमाने तंत्रस्नेही शिक्षण व तंत्रस्नेही शिक्षक यांची चळवळ सुरु झाली. राज्यात आजपर्यंत सुमारे 1 लाख 60 हजार शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. तर 62,000 शाळा आज डिजिटल झाल्या आहेत. अनेक शिक्षकांनी उत्तम ई-शैक्षणिक साहित्य तयार केले असून हे ई-शैक्षणिक साहित्य एका ई-प्लॅटफॉर्मवर आणणे आवश्यक होते. यासाठीच शालेय शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत “मित्रा” (MITRA- Maharashtra In-Service Teacher Resource App) हे अॅप तयार केले आहे. विशेष म्हणजे या अॅपमधील बहुतांश ई-शैक्षणिक साहित्य हे शिक्षकांनी शिक्षकांसाठीच तयार केलेले आहे.
21 व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मुलांचे शिक्षण सुलभ आणि आनंददायी व्हावे यासाठी राज्य शासनाने मित्रा अॅप आणले असून अध्ययन अध्यापन शास्त्र, बालमानसशास्त्र आणि तंत्रज्ञानाचा एकत्रीत मिलाप म्हणजे मित्रा अॅप आहे, असे म्हणता येईल. गेल्या काही वर्षांपासून तंत्रस्नेही शिक्षक चळवळ सुरु आहे. या काळात अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी मुलांना उपयोगी पडणारे व्हिडिओ, पीपीटी, ऑनलाईन टेस्ट असे ई-साहित्य तयार केले होते. याच सर्व साहित्याला एक डिजिटल व्यासपीठ मित्राच्या स्वरुपात मिळवून देण्यात आले आहे.
प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करणे, शंभर टक्के शिक्षकांना तंत्रस्नेही बनवणे, शाळा प्रगत करणे अशी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यभरात तंत्रस्नेही कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त ई-साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 100% संकल्पनावर आधारीत ई-साहित्य निर्माण करणे, सर्व विषयातील व सर्व इयत्तांच्या संकल्पनासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे यासाठी मित्रा अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
खरेतर मित्रा अॅप हे दोन्ही प्रकारच्या शिक्षकांसाठी आहे. स्वनिर्मिती करणाऱ्या आणि ज्यांना स्वनिर्मिती करता येत नाही त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी, शिक्षकांचा व्यावसायिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यातील दुवा आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकसनासाठी मित्रा अॅप महत्वाचे ठरत आहे.
मित्रा अॅपच्या होणा-या फायद्यांमध्ये मुलांना स्व-अध्ययन करणे सोपे होणार आहे. आता मुले स्वाध्याय स्वत: स्मार्ट फोनवर सोडवू शकतात. तसेच पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीची माहिती या अॅपमुळे मिळण्यास मदत होणार आहे.
मित्रा अॅप मध्ये काय आहे :-
• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तयार केलेले वेगवेगळया विषयावरचे व्हिडिओ
• वेगवेगळया विषयावरच्या पीपीटी
• अॅनिमेशन
• कवितांचे ऑडिओ
मित्रा अॅपचे महत्व :-
• क्षमता विकसनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी.
• शासन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना जोडणारा दुवा.
• शिक्षकांची गुणवत्ता वाढ होण्यास मदत.
• शिक्षकांची डिजिटल साक्षरतेकडे वाटचाल.
मित्रा अॅपची वैशिष्ट्ये :-
• इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत पाठ निहाय ई-लर्निंग साहित्य उपलब्ध, लवकरच इ.१० वी पर्यंतचे सर्व विषयांचे ई-लर्निंग साहित्य उपलब्ध होत आहे.
• पाठ्यपुस्तकातील धडे ऑडिओ आणि व्हिडिओ सहित असल्याने मनोरंजनातून शिक्षण
• शालेय शिक्षण विभागाचे महत्वाचे निर्णय आणि परिपत्रके
• शिक्षणाशी संबंधित सर्व महत्वाच्या दैनिक घडामोडी
• प्रशिक्षण दिनदर्शिका
मित्रा अॅप कसे डाऊनलोड करता येईल :-
खाली दिलेल्या दुव्यावरून (लिंक वरून)
http://play.google.com/store/apps/details?id=net.maverickalabs.mitra
लेखिका: वर्षा फडके
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020