प्रवासादरम्यान असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो, कधीतरी अतिशय आपत्कालीन परिस्थिती ओढावते. अपघात होतात, अशावेळी मदतीसाठी कोणाला बोलवावे ? मदत कुणाला मागावी ? कुणाला मदत मागितली तर आपली समस्या दूर होईल ? संकटातून आपण बाहेर कसे पडू ? अशा असंख्य प्रश्नांचा काहूर मनात असतो. ऐनवेळी मदत न मिळाल्याने मोठे नुकसानही सहन करावे लागते. मात्र, आता प्रवासादरम्यानच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सरसावले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व त्यांना प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन विभागाने मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपचे नाव आहे... आरटीओ महाराष्ट्र ॲप.... याविषयी.
या ॲपमुळे अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत मदत मागणे अधिक सोईस्कर झाले आहे. परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून आरटीओ महाराष्ट्र ॲप (RTO MAHARASHTRA) हे ॲप सुरू झाले आहे. प्रवास सुखकर व्हावा, यासाठी विविध उपक्रम परिवहन विभागातर्फे राबविले जातात. लांबच्या प्रवासादरम्यान समस्या उद्भवल्यास चिंता अधिक वाटते. त्यातच कधी मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, अपघात झाल्यास गोंधळ उडतो.
हे टाळण्यासाठी प्रवासादरम्यानच्या अशा परिस्थितीत तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी परिवहन विभागाने आधुनिक तंत्रज्ञाचा उत्तम प्रकारे वापर करून घेतला आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तक्रारी, समस्या, प्रवासादरम्यान तुम्ही कुठे आहात यासंदर्भातील माहिती तत्काळ एका क्लिकवर प्रशासनाकडे पोहोचवू शकणार आहात. अगदी काही सेकंदात तुम्ही तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीवरून लागलीच प्रशासन तुमची समस्या सोडविण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी कार्यवाही करेल.
आरटीओ महाराष्ट्र (RTO MAHARASHTRA) हे ॲप्लीकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्या. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर नवीन खाते तयार करा. अगदी शेवटी नवीन खाते म्हणून ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे नाव व खाली आडनाव टाका, त्यानंतर तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर टाका. पासवर्ड बनवून सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठीच्या क्रमांकाची विचारणा होईल. तेव्हा तिथे आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येईल, असा क्रमांक द्या. तुम्ही नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ओटीपी व तुम्ही नोंदणी केल्याचा संदेश येईल. ओटीपी टाकल्यानंतर सबमीट बटणवर क्लिक करा, तुमची नोंदणी पूर्ण होईल.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परिवहन विभागाची माहिती, तक्रारी व मदत (एसओएस) असे ऑप्शन्स मिळतील. त्यावर तुम्ही तक्रार ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी व आधार कार्ड नंबर मागितला जाईल. याव्यतिरिक्त तुम्ही मदत (एसओएस) वर क्लिक केल्यास चार सेकंदात तुमच्या आपत्कालीन नंबरवर तत्काळ संदेश जाईल की तुम्हाला मदतीची गरज आहे का? त्यानंतर तुम्हाला पोलीस, ॲम्ब्युलन्स, ट्रॅक मी आणि मला मदतीची गरज नाही असे चार ऑप्शन्स उपलब्ध होतील. तुम्ही तुम्हाला हवी असलेली मदत यातून मागवू शकतात. ॲप डाऊनलोड केल्यानंतर व एकदा नाव नोंदणी केल्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही ॲप उघडू शकता. इंटरनेट सुरू असेल तरच हे ॲप वापरता येते.
एखाद्या माणसाच्या आयुष्यात एखादी आपत्ती येते व त्यात त्याला वेळेत मदत उपलब्ध न होऊ शकल्याने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते किंवा त्याचा मृत्युही होऊ शकतो. त्यामुळेच अपघातासारख्या संकटाच्या वेळी मदत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाचे हे ॲप अत्यंत महत्त्वाचे आहे. हे ॲप प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असल्यास प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या ॲपचा वापर नक्कीच होईल. जीवघेण्या आपत्तीच्या वेळी मात्र हे अॅप आपल्याला तातडीची मदत मिळवून देण्यास उपयोगी पडू शकते व आपले प्राण वाचवू शकते. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवर हे ॲप अत्यावश्यक आहे.
आनंद सुरवाडे, मुंबई.
स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 10/7/2020
ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा...
रेल्वे तिकीट काढताना भल्या मोठ्या रांगेत उभे राहण्...
पंढरीची वारी ‘अॅप’ विषयी माहिती.
फक्त नोकरी एके नोकरी, असा विचार न करता व्यापक विच...