कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतीमध्ये घाम गाळून अन्नधान्य पिकविणाऱ्या बळीराजाची प्रगती हीच खऱ्या अर्थाने देशाच्या ग्रामीण भागाची प्रगती ठरणार आहे. शेतकरी राजाला सक्षम करण्यासाठी शासनस्तरावरुन जलसिंचनाच्या सोयी, अत्याधुनिक अवजारे पुरविणे, तांत्रिक सहाय्य पुरविणे अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षभरापासून कृषी विभागातर्फे शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. एम-किसान पोर्टलद्वारे मिळणाऱ्या या एसएमएसमुळे शेतकरीदेखील स्मार्ट होत आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये येणाऱ्या अडचणीबाबत थेट शास्त्रज्ञांचा सल्ला उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून खास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कृषी विभागाने याअंतर्गत या योजनेअंतर्गत 97 हजार 507 शेतकऱ्यांची नोंदणी केली असून त्यांना दररोज एसएमएसद्वारे शेती, फळ बागायतीविषयक तांत्रिक सल्ले देण्यात येतात.
शेतकऱ्यांना पीक संरक्षण, हवामान अंदाज, खते देणे, कीड नियंत्रण यासह शेतीमधील विविध अडचणीबाबत मार्गदर्शन केले जाते.
कृषी विभागाकडून देण्यात येणारे हे एसएमएस मराठी भाषेतून असल्याने केवळ लिहीता-वाचता येणाऱ्या मोबाईलधारक शेतकऱ्यांनाही या माहितीचा उपयोग होत असतो.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे कार्य राज्याच्या कृषी विभागाकडून केले जात असून शेतकऱ्यांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. कृषी विभागाची ही योजना खऱ्या अर्थाने आधुनिक शेतीच्या दिशेने पुढचे पाऊल ठरले आहे.
रत्नागिरी कृषी विभागाकडून जिल्हाभरातून शेतकऱ्यांची एम-किसानसाठी नोंदणी करुन घेतली आहे. उपलब्ध मनुष्यबळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विभागाने केला आहे. त्याचा परिणाम म्हणून दिलेल्या लक्ष्यांकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची एम-किसानअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.
-आरिफ शहा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी.
-विजय अ. कोळी
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020