অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जळगाव जिल्हा परिषदेचे मोबाईल ॲप

जळगाव जिल्हा परिषदेचे मोबाईल ॲप

जिल्हा परिषदेच्या विविध विभाग व विकास कामांविषयी माहिती देणाऱ्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी नोंदवून त्याचा पाठपुरावा करता येईल अशा मोबाईल ॲण्ड्राईड ॲपची निर्मिती जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये हे ॲप माय झेडपी जळगाव नावाने उपलब्ध आहे. अशा प्रकारे मोबाईल ॲप तयार करणारी जळगाव जिल्हा परिषद ही देशातली पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.जळगाव जिल्हा परिषदेचा ई-लर्निंग प्रोग्राम व प्राथमिक शिक्षकांच्या हजेरीचा स्टॉर्म व्हॉट्स ॲप प्रोग्राम या पाठोपाठ मोबाईल ॲपची निर्मिती करुन श्री. पाण्डेय यांनी डिजिटल झेडपीत खूप पुढचे पाऊल टाकले आहे.

जळगाव जिल्हा परिषदेने तयार केलेल्या या ॲपचे औपचारिक लोकार्पण नाशिक विभागाचे महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते झाले. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत हा कार्यक्रम झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व श्री. पाण्डेय उपस्थित होते.

या मोबाईल ॲपमध्ये दोन ऑप्शन आहेत. पहिले ऑप्शन स्टॅटेस्टिक्सचे असून दुसरे ऑप्शन डायनॅमिक आहे. स्टॅटेस्टिकमध्ये जिल्हा परिषदेच्या १३ विभागांची माहिती दिली आहे. त्यात विभाग, योजना, कामकाज, प्रशासनिक रचना, समित्या, ई-प्रशासन, माहितीचा अधिकार ही माहिती आहे. याशिवाय, टाईमलाईन ऑप्शनमध्ये चालू घडामोडी, गॅलरी, तालुका पंचायत समित्या यांची माहिती आहे.

डायनॅमिक प्रकारात नागरिकांना कोणत्याही विभागाविषयी तक्रार करण्याची सोय आहे. या तक्रारींचा निपटारा करण्याविषयी संबंधित विभागांना तसा ॲक्सेस देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या वेबवरील नागरी सेवेनुसार याची रचना आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल थेट विभाग प्रमुख घेणार असून त्यांच्याकडून पुर्ततेबाबत संबंधिताना संदेश येणार आहे. तक्रारीशी संबंधित फोटोही पाठवण्याची त्यात व्यवस्था आहे.

हे ॲण्ड्राईड ॲप श्री. पाण्डे यांच्या संकल्पनेनुसार जळगावच्याच एका संस्थेने तयार केले आहे. पहिल्या दिवशी ते जवळपास २०० मोबाईल वापरकर्त्यांनी डाऊनलोड केले.

डिजिटल इंडियासाठी प्रयत्न


जिल्हा परिषदेसाठी मोबाईल ॲण्ड्राईड ॲप तयार करण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेनुसार डिजिटल इंडिया योजनेत पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे. आता तयार केलेले ॲप प्राथमिक स्थितीत आहे. ते भविष्यात आणखी उपयुक्त व प्रभावी केले जाईल.

असे ॲप तयार करणारी जळगाव जिल्हा परिषद ही भारतातील पहिली जिल्हा परिषद आहे. इंटरनेटवर जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली सर्व माहिती आता या ॲपवर उपलब्ध आहे. यातून प्रशासनाचा चेहरा हा पारदर्शी व गुणवत्तापूर्ण, तत्पर कार्य करणारा असा तयार होईल. मानवी श्रमांचे गुणात्मक मूल्यांकन यातून शक्य होणार आहे.

लेखक - दिलीप तिवारी

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/11/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate