केंद्र व राज्य शासनामार्फत आर्थिक व सामाजिक दृष्टया, दुर्बल घटकातील लोकासांठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आदी योजना निराधारांसाठी राबविल्या जातात. या योजनेतील लाभार्थी आर्थिकदृष्टया कमकुवत गटातील असून बहुतांश लाभार्थी निरक्षर असतात. या सर्व लाभार्थ्यांना शासनाने दिलेले आर्थिक अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा संदेश त्यांना मिळावा यासाठी तहसिलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे अनुदान बँक खात्यात जमा झाल्याची माहिती देणा-या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नुकताच उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनाच्यावतीने विविध योजनेचा लाभ यापूर्वी मनीऑर्डरने दिला जात होता, परंतु यामध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे अनेकदा लाभार्थी अनुदानापासुन वंचित राहत असत. या कार्यवाहीतील अडथळे दूर होण्याच्या दृष्टीने पोस्टामध्ये खाते उघडण्यात आले व थेट त्यामध्ये अनुदान जमा करणे सुरु करण्यात आले. परंतु यामध्ये देखील चेकव्दारे पैसे जमा होण्याची प्रक्रिया जटील बनली होती. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत होता.
हे सर्व टाळण्यासाठी लाभार्थ्यांचे खाते ऑनलाईन झालेल्या बँकांमध्ये उघडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांची यादी बँकेमध्ये पाठविली जाते. तसेच हे अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यात जमा होते. परंतु, बरेचदा काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उशीरा अनुदान प्राप्त होते. अनुदान बँक खात्यात जमा झाल्याची माहिती निराधारांना एसएमएसद्वारे तलाठी किंवा ग्रामसेवक यांना मिळते. निराधार, वृद्ध लाभार्थ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांना ही माहिती तलाठी किंवा ग्रामसेवक गावात दवंडीद्वारे, ग्रामपंचायत कार्यालयात सूचना लावून किंवा थेट लाभार्थ्यांच्या घरी जाउन देतात. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांची पैसे आल्याच्या चौकशीसाठी बँकेत होणारी पायपीट थांबली आहे आणि त्यांचा त्रास कमी झाला आहे.
उमरखेड तालुका हा भौगोलिक दृष्टया खूप विस्तारलेला असून विदर्भ - मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात आहे. विविध योजनांचे लाभार्थी हे अतिदुर्गम भागातील असल्यामुळे त्यांना तालुक्याच्या ठिकाणी येणदेखील शक्य होत नाही. त्यामुळे हा एसएमएस उपक्रम त्यांच्यासाठी दिलासा देणारा ठरत आहे. याकरीता एसएमएस सुविधा देणाऱ्या Way2sms.com या वेबसाईटचा वापर केला जात आहे. उपरोक्त वेबसाईटवर संजय गांधी निराधार योजना विभागाचे नायब तहसिलदारांनी मोबाईल क्रमांक संकलित करुन घेतले आहे. यानंतर या वेबसाईटवर उमरखेड तालुक्यातील 126 गावांमधील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांचे ग्रुप वाईज मोबाईल क्रमांक संकलित केले आहेत.
त्यामुळे आता लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा झाल्याबरोबर तशा आशयाचा 'एस.एम एस.' प्रत्येक गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांचे मोबाईलवर जातो आणि लाभार्थ्यांना अनुदान जमा झाल्याची माहिती गावातच मिळते. तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे 1784 तर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेच्या 4089 लाभार्थ्यांना या एसएमएस उपक्रमाचा लाभ देण्यात येत आहे. हा उपक्रम संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार के. आर. महामुने यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे.
लेखक : अशोक खडस
स्त्रोत : महान्यूज