অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महावितरणचे वीजबिल आता अधिक सुटसुटीत!

खर्च झाल्याचे दु:ख नसते पण हिशोब जुळला नाही तर मनस्ताप होतो. वीजबिलाचेही तसेच आहे. ग्राहक त्याच्या गरजेनुसार वीज वापरत असतो. मात्र मीटरची रिडींग जुळली तरी वीजबिलावरील आकडे तो पडताळून पाहतो. अनेकांना त्यातील तांत्रिक बाबी समजत नाहीत. म्हणूनच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी संपूर्ण वीजबिल मराठी भाषेत तसेच अधिक सुस्पष्ट व सुटसुटीत केले आहे. शिवाय प्रत्येक ग्राहकाने मोबाईल ॲपचा वापर करावा यासाठी वीजबिलावर नव्याने क्यूआर (QR) कोड छापला असून हा कोड मोबाईलमधून स्कॅन केल्यास तो थेट प्ले स्टोअरवरच नेतो हे विशेष.

दर महिन्याला येणारे वीजबिल उत्सुकतेचा विषय असतो. प्रत्येकाच्या घरी वीजबिलाची स्वतंत्र फाईलच असते. ग्राहकाला त्याचे वीजबिल समजून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आलेले बील मागच्या बिलाशी जुळले तर वीजबिलाचा भरणा विनाविलंब होतो. त्यासाठीच जानेवारी २०१७ पासून वीजग्राहकांना गुलाबी रंगाचे पाठपोट व मराठी भाषेत छापलेले वीजबिल महावितरणकडून पाठवले जात आहे. 

वीजबिलावरील नोंदीविषयी माहिती समजून घेऊ…


नाव, पत्ता, देय रक्कम - नवीन वीजबिलावर कंपनीच्या नावाखाली मधोमध बिलाचा महिना व वर्ष नमूद केले आहे. तर महावितरण लोगोच्या खाली १२ अंकी ग्राहक क्रमांक ठळकपणे छापला आहे. त्याखाली ग्राहकाचे नाव, पत्ता इंग्रजी व मराठी भाषेत छापला जातो. संगणकीय भाषांतरामुळे मराठीच्या नावात व्याकरणातील चुका होऊ शकतात. अशावेळी ग्राहकांनी त्यांचे नाव इंग्रजी भाषेतील स्पेलिंगनुसार पडताळून पहावे. उजव्या बाजूला देयक दिनांक म्हणजे बिल तयार झाल्याची तारीख असते. तर त्याखाली देय रक्कम, देय दिनांक व अंतिम तारखेनंतर भरावयाची रक्कम ठळकपणे छापलेली असते. 

बिलींग युनिट

ग्राहकाच्या मोबाईल नंबर व ई-मेलखाली बिलिंग युनिट छापलेला असतो. बिलिंग युनिट म्हणजे ज्या कार्यालयाने आपले वीजबिल तयार केले त्या कार्यालयाचा चार अंकी कोड होय. यास बिलींग कोड म्हणूनही ओळखले जाते. वीजबिल ऑनलाईन भरताना तसेच मोबाईल ॲप नोंदणी करताना त्याची गरज पडते. इथे गल्लत होऊ शकते कारण काही जण त्यास वापरलेले युनिट समजतात.

पीसी, चक्र

पीसी, चक्र, मार्ग-क्रम, डीटीसी अशाही नोंदी वीजबिलावर असतात. रीडिंग घेताना, बिले वाटप करताना व भरणा केंद्रावर एकाच वेळी गोंधळ उडू नये म्हणून प्रत्येक विभागात शून्य ते आठ अशा नऊ पीसी म्हणजेच प्रोसेसिंग सायकल केलेल्या असतात. डीटीसी म्हणजे वितरण रोहित्र. त्याचा क्रमांकही बिलावर असतो. 

मंजूर भार, रीडिंगच्या तारखा

मंजूर भार म्हणजे आपल्या घरात, दुकानात किती उपकरणे आहेत, त्याची क्षमता किती? यावरून तो ठरत असतो. कंपनीला विजेच्या नियोजनासाठी त्याची मदत होते. तर सहा गोलाकार वर्तुळांमध्ये चालू रीडिंग, मागील रीडिंग, गुणक अवयव, युनीट, समायोजित युनीट व एकूण वीज वापर दर्शवला जातो. रीडिंगच्या तारखा वर्तुळाच्या डोक्यावर ठळकपणे नमूद केल्या जातात. त्यामुळे देयक किती दिवसाचे आहे, हे समजते. फोटोवर मीटर क्रमांक नमूद केलेला असतो. 

मीटरचा फोटो

बिलावर छापलेला मीटर रीडिंगचा फोटो मोबाईल रीडिंग ॲपमधून घेतला जातो. नवीन तंत्रज्ञानामुळे ज्यावेळी मीटर रीडर फोटो काढतो, त्यावेळी मोबाईलचे स्थान/लोकेशन अक्षांश, रेखांशासह सर्व्हरला नोंदवले जाते. त्यामुळे मीटर रीडरवर वचक निर्माण झाला आहे. रीडिंगच्या चुका कमी होऊन वीजबिल अधिक अचूक बनले आहे. माहितीसाठी मागील वर्षभराच्या वीज वापराचा तक्ता बिलावर उपल्बध असतो. 

क्यूआर कोड अन् मोबाईल ॲप

नवीन वर्षापासून वीजबिलावर क्यूआर कोड ठळकपणे छापला जात आहे. जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला मोबाईल अॅप सहज उपलब्ध होईल. आठ महिन्यांत ॲपचे १० लाखांहून अधिक वापरकर्ते झाले आहेत. बिलावरील क्यूआर कोडमुळे त्यात लक्षणीय वाढ होणार आहे. 

टोल फ्री

विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र २४ तास कार्यरत असते. १८००-२००-३४३५, १८००-२३३-३४३५ व १९१२ या तीन टोल फ्री क्रमांकावरुन ही सेवा उपलब्ध होते. हे क्रमांक बिलावर क्यूआर कोडच्या खाली ठळकपणे नमूद केले आहेत. 

तक्रार निवारण मंच

ज्या तक्रारींची सोडवणूक वेळेत झालेली नाही किंवा अन्य कारणामुळे प्रलंबित असतील तर ग्राहकाला विद्युत कायद्याने मंडळ पातळीवर अंतर्गत तक्रार निवारण कक्ष व परिमंडल पातळीवर ग्राहक तक्रार निवारण मंच उपलब्ध करून दिले आहेत. या ठिकाणी दाद मागण्यासाठी वकील देण्याची व फी भरण्याची आवश्यकता नाही. दोन्ही ठिकाणचे पत्ते फोन क्रमांकांसह बिलावर छापले जातात. 

विशेष संदेश

प्रत्येक महिन्यात बिलावर विशेष संदेश छापला जातो. बिल किती दिवसाचे आहे, सुरक्षा ठेव थकित आहे का? तसेच कंपनीच्या योजनांचा त्यात अंतर्भाव असतो.

विवरण

यापूर्वी पहिल्या पानावर छापले जाणारे विवरण आता पाठीमागे छापले जात आहे. यामध्ये विविध आकारांचा समावेश असतो. 

१. स्थिर आकार

नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक वर्गवारीसाठी ठराविक स्थिर आकार घेतला जातो. एखाद्या महिन्यात वीज वापर जरी शून्य असला तरी स्थिर आकार भरावा लागतो. घरगुती जोडणीसाठी प्रतिमाह ५५ रुपये स्थिर आकार आहे.

२. वीज आकार

वापरानुसार तो ठरत असतो. जेवढे युनिट वीज वापरली जाते, त्या युनिटची त्या-त्या टप्प्यानुसार वीज आकारणी केली जाते. उदा. घरगुती वीज वापर १०२ युनिट असेल तर चालू दरानुसार पहिल्या शंभर युनिटचे २.९८ रु. प्रमाणे २९८ रुपये व पुढील दोन युनिटचे ६.७३ रु. प्रमाणे १३.४६ रुपये असे मिळून ३११.४६ रुपये (२९८+१३.४६ ) इतका वीज आकार होतो. 

३. वहन आकार

ही नवीन संकल्पना असून नियामक आयोगाने अस्थिर आकारांची (वीज आकार, इंधन समायोजन आकार इ.) विभागणी करून व्होल्टेजवर आधारित वहन आकार ठरवले आहेत. पूर्वी ते एकत्र होते, आता फक्त त्याची विभागणी झाली आहे. लघुदाबासाठी प्रतियुनिट १.१८ रुपये इतका वहन आकार असून १०२ युनिट वापरास तो १२०.३६ रुपये होतो.

४. वीज शुल्क

स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांच्या एकत्रित रकमेवर ठराविक वीज शुल्क आकारले जाते. घरगुतीसाठी त्याचे प्रमाण १६ टक्के, वाणिज्यिकला २१ टक्के तर औद्योगिकला ९.३० टक्के आहे. कृषीपंपाला वीज शुल्क आकारले जात नाही. 

तत्पर देयक भरणा सूट

साधारणपणे देयक तयार झाल्यापासून दहा दिवसांत वीजबिल भरल्यास जवळपास १ टक्के इतकी सूट दिली जाते. महसूल वेळेत मिळावा तसेच वेळेत बिले भरणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे. 

सुरक्षा ठेव

आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल महिन्यांत अनेकांना सुरक्षा ठेवीची स्वतंत्र बिले दिली जातात. मागील तिमाहीच्या सरासरी एक महिन्याचे बिल सुरक्षा ठेव म्हणून महावितरणकडे असणे गरजे असते. सरासरी वाढली असेल तरच सुरक्षा ठेवीचे बिल दिले जाते. 

इतर सूचना

चेक लिहण्यासाठीची सूचना इतर अटी आदींची माहिती बिलाच्या पाठीमागे असते. देय तारखेनंतर बिल भरल्यास पुढील बिलात मागील बिलाची रक्कम थकबाकीत दिसते. अशावेळी देयक भरताना मागील बिल व पावती रोखपालास दाखवल्यास फक्त चालू बिल भरता येते. 

लेखक - ज्ञानेश्वर आर्दड
जनसंपर्क अधिकारी, 
महावितरण, बारामती परिमंडल.
संकलन- उप माहिती कार्यालय, बारामती.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate