आधुनिक तंत्रज्ञानाने समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे हे बदल स्तिमित करणारे आहेत. आजचे तंत्रज्ञान उद्या बदलत असते तर उद्याचे तांत्रिक बदल परवा गैरलागू ठरावे इतका त्याच्या बदलाचा झपाटा आहे. तंत्रज्ञानातील हे बदल माध्यम क्षेत्रालाही लागू आहेत. या बदलांचा स्वीकार करीत माध्यम क्षेत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.
शासन आणि जनता यांच्यातील संवाद दृढ करणारे आणि तळागाळापर्यंत पोहोचलेले 'लोकराज्य' हे प्रभावी माध्यम आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून लोकराज्यचा गौरव केला जातो. काळाच्या ओघात सर्व बदलांचा अंगिकार करीत लोकराज्यची यशस्वी वाटचाल सुरु आहे. मुद्रित माध्यमामध्ये आपला ठसा उमटवीत असतानाच लोकराज्यने ई-विश्वात देखील आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सुरुवातीस लोकराज्य ऑनलाईन स्वरुपात वाचकांच्या भेटीस अवतरला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर लोकराज्यचे अंक वाचता येऊ लागले. विशेष म्हणजे 1947 सालापासूनचे लोकराज्यचे अंक ऑनलाइन पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यापैकी हवा तो अंक वाचक वाचू शकतो, त्याची प्रिंट काढू शकतो किंवा आपल्या संगणकावर कायमस्वरुपी जतन करुन ठेवू शकतो.
असे असले तरी सध्याची तरुण पिढी ही अधिकच तंत्रज्ञान प्रेमी आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपली वाचनाची गरजही ते मोबाईलवरूनच भागवितात. इंटरनेट सेवा मोबाईलवर उपलब्ध झाल्याने ज्ञानभंडार आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. तरुणाईचा हा वाढता कल लक्षात घेऊन लोकराज्यने देखील या क्षेत्रात प्रवेश केला आणि लोकराज्यचे 'मोबाईल ॲप' साकार झाले. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप मोफत स्वरुपात उपलब्ध आहे. एकदा हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर दर महिन्याचा लोकराज्य अंक आपण मोबाईलवर वाचू शकतो. एवढेच नाही तर आपल्याला हवा तो अंक आपण कायमस्वरुपी मोबाईलमध्ये जतन करुन ठेवू शकतो. सोबतच 1947 सालापासूनचा हवा तो अंक आपण या ॲपच्या माध्यमातून वाचू शकतो. हवा तो अंक वर्षनिहाय, महिन्यांनुसार शोधण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने या ॲपची निर्मिती केली आहे. अतिशय सुलभ, सुटसुटीत अन् हाताळायला सोपे असे ते ॲप आहे. मराठी लोकराज्य सोबतच 'महाराष्ट्र अहेड' ही लोकराज्यची इंग्रजी आवृत्ती पण आपल्याला इथे वाचता येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. दर महिन्याला आता लोकराज्यचा अंक बोटाच्या एका टचद्वारे आपल्याला उपलब्ध होऊ शकतो, तोही अगदी मोफत !
लेखक - किरण केंद्रे
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/21/2020