অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘एनी टाइम सातबारा ': प्रगतीचे ‘डिजीटल’ पाऊल

‘एनी टाइम सातबारा ': प्रगतीचे ‘डिजीटल’ पाऊल

लहानपणी प्रत्येकजण बाळाला ‘नजर’ आली की नाही, हे पहात असतो. त्यासाठी चुटकी वाजवणे, खेळणे वाजवणे वा आवाज करणे असे काही तरी केले जाते. बाळाने आवाजाचा वेध घेत प्रतिसाद दिला की, ‘छान नजर आली गं आता’, असे प्रेमळ प्रशस्तीपत्रही दिले जाते. एकंदरीत काय तर नुसते डोळे असून चालत नाही तर ‘नजर’ वा ‘दृष्टी’ असावी लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक दृष्टी म्हणजेच व्हिजन असलेला मुख्यमंत्री लाभला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दूरदृष्टीचा लाभ प्रशासनालाही मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक उत्तमोत्तम निर्णय घेतले. डिजीटल महाराष्ट्र हा त्यातीलच एक निर्णय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या नागपूरलगतच्या फेटरी येथे देशातील पहिल्या ‘एनी टाइम सातबारा' (एटीएस ) मशीनचा शुभारंभ करण्यात आला. डिजीटल महाराष्ट्र या अभियानाचे हे एक सशक्त पाऊल आहे. या एटीएसचे लोकार्पण येत्या २६ जानेवारीला करण्यात येणार असून त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात एटीएस सुरू करण्यात येणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या नेतृत्वात अनेक कल्पक उपक्रम सुरू आहेत. हा त्यातीलच एक उपक्रम आहे. उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी यांचाही यात सहभाग आहे.

शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजे सातबारा काढणे आहे. तलाठी आणि तहसील कार्यालयात येणाऱ्या अडचणींमुळे बळीराजाला मनस्ताप सहन करावा लागतो. यापासून मुक्ती मिळण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी ‘एनी टाईम सातबारा' (एटीएस ) ही संकल्पना मांडून त्या दिशेने प्रयत्न सुरु केले. पुण्यातील फोर्स इन्फोसिसने तयार केलेल्या सॉफ्टवेअरद्वारे निर्मित मशीनचे प्रात्यक्षिक कुर्वे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान महसूल विभागातील आपल्या वरिष्ठांना दाखविले.

मुख्यमंत्र्यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या फेटरी येथे १९ डिसेंबर २०१६ ला एनी टाइम सातबाराचा शुभारंभ झाला. या मशीनमध्ये संबंधित जमिनीचा खसरा क्रमांक टाकला की स्क्रीनवर आपला सातबारा दिसतो. तो बरोबर असेल तर मग २० रुपये मशीनमध्येच भरावे लागतात. यासाठी २० रुपयांची एक किंवा १० रुपयांच्या दोन नोटा अथवा ५ रुपयांच्या चार वा १० रुपयांची दोन नाणी भरू शकता. अवघ्या एक मिनिटात पावती आणि सातबारा आपल्याला मिळतो. यावर एटीएम पावतीप्रमाणेच स्थळ, तारीख व वेळ तसेच जारी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याचे पूर्ण नाव पदनामासह नमुद आहे. त्यावर स्वाक्षरी वैध असे लिहून असल्याने हे दस्तावेज सरकारी व्यवहारात वापरता येते. मशीनची भाषा मराठी असल्याने त्यावरील सूचना शेतकऱ्यांना सहज समजू शकतात. लवकरच अशाचप्रकारे आठ-अ, अधिकार अभिलेख इत्यादी महसुली दस्तावेज मिळू शकतील.

फेटरी येथे झालेल्या या शुभारंभप्रसंगी उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी यांनी मशीनविषयी उपस्थितांना माहिती दिली. गावातील विजय पवार हे एटीएसमधून सातबारा काढणारे पहिले शेतकरी ठरले. यावेळी एनआयसीच्या क्षमा बोरोले, अजय खोब्रागडे, तलाठी नरेंद्र तभाने, ग्रामपंचायत सदस्य मुकेश ढोमणे, प्रकाश लंगडे, माजी सरपंच भीमराव राऊत, पद्म कुरळकर आदी उपस्थित होते. गावात तलाठी वा कोतवाल नसला तरी यापुढे शेतकऱ्यांचे काम अडणार नाही. जिल्ह्यातील सर्व तालुका सेतू केंद्राच्या ठिकाणी हे एटीएस सुरू करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यासह ‘आठ-अ’ सह महसूल विभागाशी संबंधित सर्वच दस्तावेज क्रमाक्रमाने या एटीएसमधून काढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भूमीअभिलेख खात्याशी संबंधित कागदपत्रेही यातूनच काढता येतील. महसूल विभागाशी संबंधित सर्व सेवांचे संगणकीकरण सुरू आहे. ते पूर्ण झाले की, ते दस्तावेज स्कॅन करून या एटीएसमध्ये टाकण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात न जाता कोणतेही दस्तावेज सहज एका क्लिकवर काढता येईल. नागपूरने अनेक चांगल्या गोष्टी देशाला दिल्या. सांडपाण्याचा पुनर्वापर करून ते वीज निर्मिती करण्यासाठी वापरण्याचा प्रयोग देशात सर्वप्रथम नागपूर महापालिकेने केला. हे नागपूर मॉडेल आता देश पातळीवर स्वीकारण्यात आले.

पाठोपाठ कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रयोगही नागपुरात करण्यात येत आहे. या प्रकल्पाला नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूरी दिली. आता देशातील पहिले एनीटाईम सातबारा केंद्र म्हणजेच एटीएस सुरू करण्याचा मानही नागपूर जिल्ह्याने मिळवला. मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव असलेल्या फेटरी येथे हे केंद्र सुरू करण्यात आले. हाही प्रयोग नक्कीच देशपातळीवर स्वीकारला जाईल, यात तीळमात्र शंका नाही.

लेखक - अतुल पेठकर,
नागपूर.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate