ता.जि.अमरावती
अहो, आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात संगणक आला आणि ग्रामपंचायतीचा कारभाराच बदलला की, आता दाखले असोत की नमुने आम्हाला गावातच मिळत्यात अन् गावाच्या विकास कामांची माहिती बी कॉम्प्युटरवर पहाता येते. . . इतके आम्ही "ऑनलाईन" झालोत. . . हे कौतूकाचे बोल आहेत ता. जि.अमरावतीच्या यावली (शहिद) गावच्या लोकांचे.
ही किमया साधलीय संग्राम अर्थात संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतून. जागतिकीकरण, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव यापासून गावंही आता दूर राहिली नाहीत. गावातही इंटरनेटचे वारे वाहू लागल्याने त्यापासून मिळणारे लाभ आणि कामकाजाचे बदललेलं रुप याचं गावकऱ्यांनाही विशेष कौतूक आहे. यावली (शहिद ) गाव ही त्याला अपवाद नाही. ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज संगणकावर असून सर्व फंडांचे हिशेब ऑनलाईन आहेत.
ग्रामपंचायतीची संगणकाच्या माध्यमातून जोडणी करतांना ग्रामपंचायतीचे ग्राम सेवा केंद्रात रुपांतर,, लेख्यांमध्ये समानता, ऑनलाईन ट्रान्सफर, अपेक्षित कर वसुलीद्वारे आर्थिक सक्षमता, ई- टेंडरिंग, यासारखे कालसुसंगत बदल करीत महाराष्ट्रातील ग्रामपंचायती अंतर्बाहृय बदलत आहेत. त्यांचे काम अधिक गतिमान, अधिक पारदर्शक आणि अधिक लोकाभिमूख झाले आहे. जग हे एक वैश्विक खेडं झालं असतांना महाराष्ट्रातील गावं संग्रामची यशस्वी अंमलबजावणी करून जगाशी जोडली जात आहेत. त्यामुळेच लोकांकडूनही त्याचे स्वागत होतांना दिसत आहे.
यावली शहिद गावाची आणखी एक वेगळी ओळख आहे. ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे जन्मगाव. ज्या गावात राष्ट्रसंत जन्मले, ज्यांनी अख्ख्या जगाला आदर्श आणि सुंदर गावांच्या निर्मितीचे रहस्य अगदी साध्या सोप्या शब्दांमधून आणि उदाहरणांमधून सांगितले त्या गावातील लोक ग्रामसुधारणांपासून दूर कसे राहणार ? गावाने ग्रामसुधारणेच्या प्रत्येक कामात धडाडीने सहभाग घेतला आणि पुरस्कारही मिळवले.
गावाला राष्ट्रसंतांच्या सदाचाराची, सद् विचारांची प्रेरणा आहे. मुलगा आणि मुलगी समान माननाऱ्या राष्ट्रसंतांचा विचार ग्रामपंचायतीने पुढे नेला. गावात मुलगी जन्माला आली की "कन्यारत्न जन्मानंद भेट" योजनेअंतर्गत मुलीच्या नावे 500 रुपये अनुदान आणि प्रमाणपत्र देऊन मातेचा गौरव करण्याचा सुदंर पायंडा गावाने घालून दिला.
गावकरी आहेत तर गाव आहे. हे गावकरी ही कसे हवेत? तर ते आरोग्यसंपन्न, सुदृढ, आनंदी आणि कार्यमग्नं हवेत, ते ग्रामविकासाचा आणि राष्ट्रहिताचा सर्वांगीण विचार करणारे हवेत... त्यांच्यात व्यसनाधिनता नसावी. ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी याचे खुप चांगले मार्गदर्शन केले आहे. आपलं व्यसन सोडून जी माणसं सन्मार्गाने वागायला लागतील त्यांचा 500 रुपये रोख आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यास सुरुवात करून गावाने राष्ट्रसंतांची ही शिकवण पुढे नेली.
या संघटित आणि निकोप लोकशक्तीचा उपयोग गाव विकासासाठी करून घेतला.गावाने निर्मल ग्राम प्रमाणे तंटामुक्त ग्राम अभियानात भाग घेतला आणि गाव तंटामुक्त करून 7 लाख रुपयांचे बक्षीसही जिंकले.
गावात मागासवर्गीय वस्तीमध्ये दिवाबत्तीची, पिण्याच्यापाण्याची व्यवस्था आहे. महिला मेळाव्यांद्वारे गावात महिला आणि बालकांचे सक्षमीकरण करतांना 22 बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला प्राधान्य दिले आहे. गावात प्रत्येकाच्या घरी शौचालय आहे. स्वच्छता आणि चांगल्या आरोग्य सुविधांमुळे गावाचे आरोग्य उत्तम असून गाव राष्ट्रसंतानी दाखवून दिलेल्या वाटेवरून विकासात अग्रेसर झाले आहे.
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात स...
जळगाव जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज डिजीटल बरोबरच...
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर ऊर्जा पथ दिवे उभा...