आजच्या 'मोबाईल' युगात 'एसएमएस' हा परवलीचा शब्द झाला आहे. भ्रमणध्वनी शेताच्या बांधापर्यंत पोहोचला आहे. भ्रमणध्वनी फक्त बोलण्यासाठीच असतो ही संकल्पना मागे पडली आहे. आता फक्त एक एसएमएस...आणि हवी ती माहिती...ही केवळ कल्पना नाही तर 9623137575 क्रमांकावर संदेश पाठवा आणि गुहागर तालुका प्रशासनाची माहिती दहा सेकंतदात तुमच्या हातात...
...प्रशासनात ई-सेवेला महत्व प्राप्त झाले आहे. प्रशासनातील गतिमानता आणि पारदर्शकतेसाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र अशा सेवेसाठी नागरिकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे असते. ग्रामपंचायत स्तरावर ती उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही होत आहे. मात्र प्रशासन खऱ्या अर्थाने त्याच्या घरात पोहोचविण्याचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तहसील कार्यालयाने केला आहे. या कार्यालयाने भ्रमणध्वनीच्या साहाय्याने उपयोगात येणारी एम-प्रतिसाद सेवा सुरू केली आहे.
तहसील कार्यालयात विविध प्रकारचे दाखले घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. नागरिकांना काहीवेळा अशा दाखल्यांसाठी वारंवार कार्यालयात यावे लागते. त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून तहसीलदार जीवन कांबळे यांनी आयव्हीआरएस ही दूरध्वनी आधारीत सेवा सुरू करण्याचा निश्चय केला. मात्र या सेवेसाठी नागरिकांना दूरध्वनीजवळ जास्त वेळ बसावे लागेल आणि तेवढा वेळ देणे त्यांना शक्य होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी भ्रमणध्वनीच्या साहाय्याने सेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी जीपीआर इंडीया आयटी इनोव्हेशन या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले. प्रायोगिक तत्वावर दाखल्यासंबंधी केलेला प्रयोग यशस्वी झाल्यावर इतरही माहिती या प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. तहसील कार्यालयातील सुहास थोरात आणि संजय गमरे यांनी या प्रणालीच्या क्रियान्वयनात महत्वाची भूमीका अदा केली. जिल्हाधिकारी राजीव जाधव, अपर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी एस.आर.बर्गे यांनी तहसील कार्यालयाला यासाठी सहकार्य उपलब्ध करून देताना प्रोत्साहीतही केले.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन Info टाईप करावे लागते. त्यानंतर अवघ्या दहा सेंकंदात तहसील कार्यालयाकडून संदेश येतो. या संदेशात विविध प्रकारच्या माहितीसाठी क्रमांक दिलेले असतात. आपल्या संदेश बॉक्समध्ये Info टाईप करून त्यानंतर स्पेस देत आवश्यक माहितीसाठी दिलेला कोड क्र. टाईप करून संदेश पाठविल्यावर दहा सेकंदात आवश्यक माहिती मिळते. या प्रक्रीयेला पर्याय म्हणून Info नंतर स्पेस देऊन आवश्यक विषय टाईप केल्यास (उदा.Info स्पेस देऊन nationality) त्या विषयाची माहिती त्वरीत उपलब्ध होते.
आतापर्यंत विविध 50 प्रकारची माहिती या सेवेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. 15 दिवसात 800 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला असून त्यातील काहींनी राज्याबाहेरून संदेश पाठविले आहेत हे विशेष. क्लाऊडबेस सर्व्हर वापरल्याने ही सुविधा ती 24 तास उपलब्ध आहे आणि एक लाख लोकांपर्यंत एकाचवेळी संदेश पाठविणे शक्य आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि कार्यालयापर्यंत येण्याचा खर्च वाचणार आहे. सेवेचा विस्तार करण्यात येत असून त्यात पर्यटन, विविध शासकीय योजना आदी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात नागरिकांना त्यांनी दिलेल्या पत्रावरील कार्यवाहीची स्थितीदेखील या सेवेच्या माध्यमातून कळू शकेल.
प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी हा प्रयोग उपयुक्त ठरणार आहे. मोबाईलचा वाढता उपयोग पाहता या सेवेच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक वेगाने होणार आहे. साहाजिकच प्रशासनाची विश्वासार्हता वाढीस लागेल आणि त्यातून चांगली प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाच्या बदलांचा कल्पकतेने वापर केल्यास अनुकुल बदल कसा घडविता येतो हेच तहसीदार कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांनी दाखवून दिले आहे.
लेखक : - डॉ.किरण मोघे
स्त्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 6/29/2020
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे य...
रत्नागिरी म्हटले की हापूस आंबा, काजू, फणस, सुपारी ...
कोकणात साहिवाल गोवंशाचे संवर्धन करण्याबरोबरच तूपनि...