शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक (राज्यस्तरीय) यांच्याकडून दिलेल्या आदेशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक (विभाग स्तरीय), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) (जिल्हा स्तरीय), गटशिक्षणाधिकारी (तालुका स्तरीय) यांच्यामार्फत सर्व योजनांची अंमलबजावणी केली जाते.
गट शिक्षण अधिकारी, माजलगाव यांनी त्यांच्या गटाच्या संबंधीत सर्व योजनांच्या अंमंलबजावणी बाबत तसेच एकूण शाळा आणि त्या संबंधीची सर्व सांख्यिकीय माहिती प्रसिद्ध करण्यासाठी एम सॉफ्टवेअर सोल्युशन औरंगाबाद यांच्या मदतीने एक संकेतस्थळ विकसित केले असून त्या संकेतस्थळाचा पत्ता http://www.brcmajalgaon.org/index.php असा आहे.
या संकेतस्थळाची प्रामुख्याने, मुखपृष्ठ, परिपत्रके, कर्मचारी, उपक्रम, फोटो गॅलरी, नोटीस बोर्ड आणि संपर्क अशा सात भागात विभागणी केली आहे. मुखपृष्ठावरच गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रास्ताविकात माजलगाव गटाची ओळख आणि या संकेतस्थळाची संकल्पना विषद केली आहे. त्याचबरोबर एकूण शाळांची संख्या आणि विद्यार्थी संख्येसोबत तेथील कर्मचारी यांची पदनिहाय संख्या प्रदर्शित केलेली आहे. 'गट साधन केंद्र माजलगाव' या भागात या गट साधन केंद्राअंतर्गत कार्यरत चार प्रमुख विभागातील केंद्र प्रमुख आणि त्या अंतर्गत असणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांची दूरध्वनी क्रमांकासहीत माहिती देण्यात आलेली आहे. 'नोटीस बोर्ड' या शीर्षकाखाली वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांची प्रसिद्धी केली जाते. बालकांना मोफत शिक्षण मिळण्याचा हक्क अधिनियम 2009 बद्दलची महिती 'Right to Education' या शीर्षकावर क्लीक करून पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहे. तसेच 'महत्वाची संकेत स्थळे' या शीर्षकाखाली या विषयासंदर्भातील महत्वाच्या संकेतस्थळांची लिंक देण्यात आलेली आहे.
'परिपत्रके' या भागात शासनाने शिक्षण विभागासाठी वेळोवेळी पारीत केलेली विविध परीपत्रके पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत. 'कर्मचारी' या भागात गट साधन केंद्र, पंचायत समिती, माजलगाव येथे कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती देण्यात आलेली आहे. 'उपक्रम' या भागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांच्या माहितीसोबत या उपक्रमाबाबतीत झालेल्या महत्वाच्या पत्रव्यवहारच्या प्रती पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.
माजलगावसारख्या ग्रामीण भागात अद्ययावत माहितीयुक्त संकेतस्थळामार्फत आजपर्यंत दर महिन्याला जवळपास एक हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचारी यांनी भेट दिल्याची नोंद झालेली आहे.
लेखक -सुनिल पोटेकर
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/2/2020
राष्ट्रीय ई-शासन योजना (NeGP-National eGovernance ...
पंचायती राज संस्थांच्या मालकीच्या तसेच अधिपत्याखाल...
पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्...
महाराष्ट्र सरकारची - आपल्या तक्रारी आमची जबाबदारी ...