অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय भाषांचे ई-संकुल

भारतीय भाषांचे ई-संकुल

भारतीय भाषांचे ई-संकुल

भारतीय संस्कृतीचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे भाषांची विविधता. 2001 च्या जनगणनेतील अधिकृत आकड्यांचा आधार घेऊन बोलायचं तर भारतात एकूण 234 नोंदल्या गेलेल्या मातृभाषा आहेत. ‘नोंदल्या गेलेल्या’ याचा अर्थ त्या भाषा मातृभाषा म्हणून बोलणारे किमान 10,000 लोक देशात आढळले आहेत. आपल्या मराठीचा क्रमांक चौथा असून भारतात सुमारे 7 कोटी 20 लाख लोक मराठी भाषिक असल्याची नोंद 2001 च्या जनगणनेने घेतली आहे. 2011 चे आकडे अजून बाहेर यायचे आहेत. ज्या देशात 234 मातृभाषा बोलल्या जातात तिथे भाषा-व्यवहाराला किती महत्त्व असेल हे वेगळं सांगायला नको. कदाचित याच महत्त्वामुळे Central Institute of Indian Languages ही स्वायत्त संस्था केंद्र सरकारने स्थापन केली आहे. ती CIIL म्हणूनही ओळखली जाते. ह्या संस्थेचं अधिकृत संकेतस्थळ म्हणजे www.ciil.org. सी.आय.आय.एल. चं मुख्य कार्यालय आहे म्हैसूर मध्ये. भारतातल्या विविध राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारला भारतीय भाषेशी संबंधित मुद्यांवर सल्ला देण्याचं महत्त्वाचं काम CIIL करते. देशातल्या छोट्या छोट्या व अल्पसंख्यांकांच्या भाषांचा विकास आणि जतन ही जबाबदारीही ही संस्था सांभाळते. देशातल्या एकूण 15 मोठ्या भाषा जनतेला शिकविण्याचे उद्दिष्टही संस्थेच्या डोळ्यासमोर आहे.

सी.आय.आय.एल.  चं मुख्य संकेतस्थळ www.ciil.org वर दिलं असलं तरी त्या व्यतिरिक्त आणखी 13 संकेतस्थळे सी.आय.आय.एल. च्या कार्यक्षेत्राशी थेट संबंधित आहेत. ती खालील प्रमाणेः
ONGOING PROJECTS:
www.ntm.org.in
www.ldcil.org
www.ciil-ntsindia.net
PAST PROJECTS:
www.ciil-miles.net
www.anukriti.ne
OTHER
www.ciillibrary.org
www.lisindia.net
www.ciil-learnkannada.net
www.ciil-spokencorpus.net
www.ciil-grammars.org
Naga Primers ( http://www.ciil.org/Nagaland/Home.html )
www.ciil-ebooks.net
www.ciilcorpora.net
कोणालाही सहज प्रश्न पडेल की संस्था एक आणि त्यांची संकेतस्थळे/विभाग चक्क 14? अशा वेगवेगळ्या संकेतस्थळांचं नेमकं काय प्रयोजन आहे? तर, वाचकहो, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी आपण ती संकेतस्थळे इंटरनेटवर स्वतःच पहायला हवीत. एक साधं उदाहरण घेऊ म्हणजे ह्या प्रश्नाच्या उत्तराजवळ पोहोचता येईल आणि सी.आय.आय.एल. च्या कामाचा आवाकाही आपल्या लक्षात येईल. आपण वरील यादीतील Naga Primers चं उदाहरण घेऊ. नागालँड हे आपल्या देशातील सर्वांत छोट्या राज्यांपैकी एक राज्य. त्यांची लोकसंख्या आहे जेमतेम 20 लाख. आपली मुंबई नागालँडच्या सहापट मोठी म्हणजे सुमारे सव्वा कोटी लोकसंख्येने भरलेली आहे. नागालँड राज्यात सात जिल्हे आहेत, आणि त्या सात जिल्ह्यात एकूण 12 वेगवेगळ्या नागा भाषा बोलल्या जातात. खरं तर त्या भाषा जिल्हावार नसून तिथल्या वेगवेगळ्या जमातींच्या आहेत. मुद्दा हा की Naga Primers ह्या स्वतंत्र संकेतस्थळ विभागात तुम्हाला त्या 12 नागा भाषांची प्राथमिक ओळख करून दिलेली दिसेल.
असंच एक स्वतंत्र संकेतस्थळ - http://www.ciil-learnkannada.net/ . इथे तुम्हाला कानडी भाषा शिकता येईल. बंगाली भाषा शिकण्यासाठी http://www.bangla-online.info/home.htm हे संकेतस्थळ आहे. दोन्ही संकेतस्थळांवर भाषा विनामूल्य शिकण्याची संधी आहे. ह्या टप्प्यावर कोणी विचारेल की मग मराठी भाषा शिकण्याची काही व्यवस्था आहे की नाही? तर, हो त्याचीही व्यवस्था आहे http://www.ciil-ebooks.net/ ह्या संकेतस्थळावर. तेथे ‘other Ebooks’ ( http://www.ciil-books.net/html/home/eb.html ) ह्या विभागात जा. तिथे गेल्यावर Indian Languages ह्या विभागावर क्लीक करा. त्या नंतर तुमच्या समोर येतील एकूण पाच भारतीय भाषा विनामूल्य शिकण्यासाठीची एक छान व्यवस्था. असामी, बंगाली, गुजराती, मराठी आणि ओरिया ह्या पाच भाषा शिकण्यासाठीचे धडे तिथे आहेत. समजा तुम्ही मराठी भाषा निवडलीत तर त्यात एकूण 24 धडे दिलेले आहेत. अर्थात ते ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांचेसाठी आहेत. सुमारे 350 पानांचे ते एक संपूर्ण ई-पुस्तकच (पीडीएफ फाईल्स) आहे. अशाच प्रकारे तुम्ही गुजराती, बंगाली, असामी, व ओरिया भाषा शिकू शकाल. ह्या सर्व भाषांचे प्रत्येकी 24 धडे आहेत. त्यात हिंदी माध्यमातून ती ती भाषा शिकण्याची सोय आहे. एक मिनी शब्दकोशही त्यात सोबत दिला आहे. सुमारे 370 पानांची ती वेगवेगळी ई-पुस्तके आहेत. डाऊनलोडींगची सोय आहे. म्हणजे जिथे इंटरनेट नसेल तिथेही आपण ह्या भाषा शिकू शकतो. भाषा शिकण्याच्या ह्या मालिकेला CIIL ने नाव दिले आहे ‘भारतीय भाषा ज्योती’.
ciil.org आणि त्यांच्या इतर संकेतस्थळांचा हा गुच्छ म्हणजे भारतीय भाषांचं एक ई-संकुलच आहे.
लेखक : - माधव शिरवळकर (ms@pujasoft.net)

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate