অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लहान मुलांसाठी आधार कार्ड

लहान मुलांसाठी आधार कार्ड

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी अनिवार्य असे महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँक खाते, आर्थिक व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या व्यवहारासाठी व्यक्तीकडे आधारकार्ड असणे आवश्यक असते. हे आधारकार्ड आता लहानग्यासाठी अनिवार्य असणार आहे.

5 वर्षाखालील मुलांकडे आधारकार्ड असावे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बाल आधारकार्ड देण्यात येणार आहे. आधारकार्डसाठी बायोमेट्रीक माहिती आवश्यक असते. पण बाल आधारकार्डच्या बाबतीत त्याची आवश्यकता नसेल. पाच वर्षाखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल. पण मुल जेव्हा वयाची 5 वर्षे पूर्ण करेल तेव्हा सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रीक चाचणी करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्यांना घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात घेऊन जाऊ शकतात.

लहान मुलांसाठी बाल आधारकार्ड मिळणार असल्याची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) व्टिट करून दिली आहे. पाच वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचे आधारकार्ड बनवताना आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा आधार नंबर तसेच मुलाच्या जन्माचा दाखला आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता हा दस्तावेज महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संबंधित मुलाने वयाची पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याचे बायोमेट्रीक तपशील अपडेट करावे लागणार आहे. मूल सात वर्षाचे होईपर्यंत जर बायोमेट्रिक तपशील अपडेट न केल्यास निळ्या रंगाचे आधारकार्ड रद्द होईल.

युआयडीएआय (प्राधिकरण)भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक 12 अंकी अनियत क्रमांक देते ज्याला आधार क्रमांक म्हणतात. कोणतेही वय आणि लिंग असणारा भारताचा रहिवासी स्वेच्छेने आधार क्रमांक मिळवण्यासाठी नावनोंदणी करू शकतो. नावनोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीला नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान किमान जनसांख्यिक व जैवसांख्यिक माहिती द्यावी लागते जी पूर्णपणे मोफत आहे. एका व्यक्तीला आधारसाठी केवळ एकदाच नावनोंदणी करावी लागते व नक्कल हटविल्यानंतर केवळ एकच आधार तयार केला जातो, कारण जनसांख्यिक व जैवसांख्यिक नक्कल हटविण्याच्या प्रक्रियेनंतरच तो विशेष बनतो.

आधार क्रमांकाची ऑनलाईन पद्धतीने, कमीत कमी खर्चात पडताळणी करता येते. तो विशेष आहे व नक्कल व फसवी ओळख नष्ट करण्याइतका सशक्त आहे व तो विविध सरकारी योजना व कार्यक्रमांची अंमलबाजवणी करण्यासाठी आधार/महत्त्वाची खूण म्हणून वापरता येऊ शकतो. ज्यामुळे सेवा वितरण परिणामकारकपणे होऊन पारदर्शता व सुशासनाला चालना मिळेल. जगभरात अशाप्रकारचा हा एकमेव कार्यक्रम आहे, ज्यामध्ये अद्ययावत डिजिटल व ऑनलाईन ओळख क्रमांक एवढ्या व्यापक प्रमाणात लोकांना मोफत दिला जात आहे.

आधार क्रमांकामध्ये कोणत्याही गोपनीय माहितीचा समावेश होत नाही व त्यामध्ये लोकांची माहिती जात, धर्म, उत्पन्न, आरोग्य व भौगोलिक स्थिती याआधारे नोंदवली जात नाही. आधार क्रमांक ओळखीचा पुरावा आहे, मात्र तो आधार क्रमांकधारकाला कोणत्याही प्रकारे नागरिकत्व किंवा अधिवास देत नाही.

आधार सामाजिक व आर्थिक समावेश, सार्वजनिक क्षेत्रातील वितरणामध्ये सुधारणा, अर्थसंकल्पाचे व्यवस्थापन, सोय वाढवणारे व सहज-सोप्या व लोककेंद्रीत प्रशासनाला चालना देणारे महत्त्वाचे धोरणात्मक साधन आहे. आधार कायमस्वरुपी आर्थिक पत्ता म्हणून वापरता येऊ शकतो व त्यामुळे समाजातील उपेक्षित व दुर्बळ घटकांना मदत होते व म्हणूनच ते सर्वांना न्याय व समानता देणारे साधन आहे. आधार ओळख प्लॅटफॉर्म ‘डिजिटल भारताचा’ आधारस्तंभ आहे, ज्यामध्ये देशाच्या प्रत्येक रहिवाशाला विशेष ओळख दिली जाते. आधार कार्यक्रमाने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत व ती जगातील अशा प्रकारची सर्वात मोठी जैवसांख्यिकीवर आधारित ओळख प्रणाली आहे.

आधार ओळख प्लॅटफॉर्ममध्ये विशेषता, आर्थिक पत्ता व ई-केवायसी अशी अंतर्भूत वैशिष्ट्ये आहेत, यामुळे भारत सरकार विविध प्रकारचे अनुदान, लाभ व सेवा देताना केवळ रहिवाशाचा आधार क्रमांक वापरून थेट रहिवाशांपर्यंत पोहोचू शकते.

आधार हा नागरिकाला आयुष्यभरासाठी दिला जाणारा विशेष 12 अंकी क्रमांक आहे. आधार प्रमाणीकरण प्लॅटफॉर्मचा वापर करून कुठूनही ऑनलाईन पडताळणी करता येते. आधार योजनेचे मुख्य उद्दिष्ट सामाजिक सुरक्षा लाभ व अनुदान वितरण सुधारणे, त्यातील गळती व अपव्यय कमी करणे, नकली व खोटे लाभार्थी नष्ट करणे, पारदर्शकता व जबाबदारी वाढविणे हे आहे.

विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate