महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागातर्फे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अंतर्गत तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ अंतर्गत ग्रामीण वित्त, कृषी, पणन, औद्योगिक सहकार, बाजार नियमन आणि पैसे कर्जाऊ देण्यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात प्रशासन आणि संनियंत्रणासाठी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग कार्यरत असतो. राज्यातील सर्व कृषी पतसंस्था, बिगर कृषी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, सहकारी बॅंका, पणन संस्था, सहकारी साखर कारखाने इत्यादींवर संनियंत्रण ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या या विभागाने महा ऑनलाईन या संस्थेच्या मदतीने सर्वंकष असे संकेतस्थळ विकसित केली असून त्या संकेतस्थळाचा पत्ता https://mahasahakar.maharashtra.gov.in असा आहे.
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचा इतिहास, व्हीजन डॉक्युमेन्ट-२०१५, शासन निर्णय, सर्व सहकारी संस्था, साखर संस्था आणि पणन संस्थांची माहिती, नेहमीची प्रश्नोत्तरे, छायाचित्रे, चल चित्रे आणि प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या, महत्वाच्या व्यक्तींची माहिती या प्रत्येक संकेतस्थळावर दिसणाऱ्या नेहमीच्या सदरांच्या व्यतिरिक्त इतर अठरा विशेष विभाग या संकेतस्थळावर आहेत. सोसायटी नावनोंदणी, सांख्यिकी माहिती, पणन सुधारणा, लेखापरीक्षकांची सूची, लेखापरीक्षकांची इमप्यानेलमेंट, जिल्हा निहाय संख्या, सोसायटी प्रमाणीकरण, वेळापत्रक श्रवण, आसन व्यवस्था, नावनोंदणी अहवाल, नकाशे आणि ठिकाणे, लेखापरीक्षक लॉगइन, संबंधित दुवे, डाऊनलोड, अनिवार्य रिटर्न्स, लेखापरीक्षक अहवाल, ई-सहकार आणि नागरिकांची सनद या शीर्षकाखाली अत्यंत उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे.
'सोसायटी नावनोंदणी' या विभागात नवीन सोसायटीच्या नाव नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाची सुविधा देण्यात आलेली आहे. नवीन सोसायटी नाव नोंदणी करण्यासाठी प्रथम या प्रणालीत नवीन वापरकर्ता (यूजर) तयार करावा लागतो. त्या वापरकर्त्याच्या नावाने लॉगईन केल्यानंतर या संकेतस्थळावर सोसायटी नोंदणीसाठीचा अर्ज आणि त्यासाठी लागणारी जोडपत्रे स्कॅन फॉरमॅटमध्ये जोडण्याची व्यवस्था आहे. एकदा नाव नोंदणी पूर्ण झाली की 'नावनोंदणी अहवाल' या भागात विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका व गावनिहाय यादी उपलब्ध होते.
'सांख्यिकीय माहिती' या भागात विविध शीर्षक, घटक आणि वर्ष निवडून जसा पाहिजे तसा अहवाल आलेखाच्या स्वरूपात तयार करण्याची सुविधा आहे. राज्याचा आढावा, महत्वाची भौगोलिक माहिती, पीक उत्पन्न, सहकारी चळवळीतील प्रगती बाबत, बॅंका बाबत, प्राथमिक कृषी पत संस्थेची माहिती, मत्स्यव्यवसाय संस्थांची माहिती, कापूस उत्पादक विपणन महासंघ, तेल-बियाणे उत्पादक महासंघ, सहकारी ग्राहकसंघ, इतर तेरा केंद्रीय आणि प्राथमिक संस्था असे एकूण ५३ प्रकारच्या विविध पर्यायांपैकी एकाची निवड करून दिलेल्या घटकांच्या मर्यादेत जशी पाहिजे तशी सांख्यिकीय माहिती आलेखासह पहाता येते.
या प्रणालीत लेखापरीक्षक प्रक्रियेबाबतची माहिती भरण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. 'लेखापरीक्षक लॉगइन' या शीर्षकाखाली लेखापरीक्षकांना वापरकर्ता म्हणून नोंदणी करता येते.
प्रणालीतील नोंदणी सत्यापित करून या प्रणालीचा अधिकृत वापरकर्ता झाल्यानंतर प्रत्येक लेखापरीक्षक स्वतंत्रपणे त्यांनी लेखापरीक्षण करावयाच्या संस्थांची माहिती आणि त्याचे वेळापत्रक तसेच लेखापरीक्षण अहवाल अपलोड करतात. 'लेखापरीक्षकांची सूची' या भागात सनदी लेखापालाची फर्म, सनदी लेखापाल, लेखापरीक्षक श्रेणी-२ (सहकारी संस्था), विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, उपलेखापरीक्षक (सहकारी संस्था), सहनिबंधक, सहकारी संस्था, प्रमाणित लेखापरीक्षकाचे नाव ही सर्व माहिती विभाग, जिल्हा, उपविभाग, वर्ग, उपवर्ग व पॅनेलनिहाय माहिती पाहता येते. 'लेखा परीक्षकांची इमप्यानेलमेंट' या स्वतंत्र भागात लेखा परीक्षकांच्या नेमणुकीसंबंधी जाहीर सूचना, नेमणुकीबाबत नियम, त्याबाबत शासनाची परीपत्रके आणि रिजर्व बॅंकेच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. 'लेखा परीक्षण अहवाल' या शीर्षकाखाली जिल्हा आणि तालुका निवडल्यास लेखापरीक्षक निहाय व सोसायटीनिहाय लेखा परीक्षण अहवाल उपलब्ध आहे.
'डाउनलोड' या भागात विविध प्रारूपे, सोसायटी प्रमाणीकरण संदर्भ दस्तऐवज, सोसायटी नावनोंदणी संदर्भ दस्तऐवज, सोसायटी नोंदणी वापरकर्ता मॅन्युअल, संदर्भासाठी शासन निर्णयाची प्रारूप, महत्त्वाची धोरणे आणि महाराष्ट्र राज्य ई-प्रशासन परिचय पुस्तिका यासोबतच 'मराठी कट्टा' या शीर्षकाखाली विंडोज 7 आणि एमएस वर्ड साठी आयएसएम मार्गदर्शक आणि एक्सेल परिवर्तक, सकल मराठी फॉन्ट, लोहित मराठी फॉन्ट, मराठी आयएमई रचना व ऑनलाईन स्वयं-प्रशिक्षण प्रशिक्षक या प्रणाली तर 'महत्त्वाची सॉफ्टवेअर्स' या शीर्षकाखाली फायर फॉक्स, प्रायमो पीडीएफ, विन झिप 8.1, ओपन ऑफिस 3.2, लिबर ऑफिस 4.0.0, अक्रोबॅट रिडर व इंटरनेट एक्सप्लोअरर 9 ह्या प्रणाली डाउनलोड करण्यास उपलब्ध आहेत.
'संबंधीत दुवे' या भागात महाराष्ट्र शासन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, यशदा, माहितीचा अधिकार, सी.ओ.ई. आणि भारत सरकार या संकेतस्थळाच्या लिंक दिलेल्या आहेत. अनिवार्य रिटर्न्स टेम्पलेट मसुदा 'अनिवार्य रिटर्न्स' या शीर्षकाखाली तर विभागनिहाय आणि जिल्हानिहाय एकून नोंदणी केलेल्या सोसायटी संख्या 'जिल्हानिहाय संख्या' या शीर्षकाखाली देण्यात आली आहे. मा.मंत्री महोदयांकडे होणाऱ्या सुनावण्याची माहिती 'वेळापत्रक श्रवण' या शीर्षकाखाली देण्यात आलेली आहे. तसेच 'आसन व्यवस्था' या शीर्षकाखाली आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या बसण्याच्या जागेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
एप्रिल २०१३ पासून कार्यान्वित झालेल्या या संकेतस्थळावर आजपर्यंत सुमारे १३८००० अभ्यागतांनी भेट दिली असून राज्यातील २०९४६३ नोंदणीकृत संस्थांपैकी १७५८९२ संस्थांनी या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे. ७५०० लेखापरीक्षकांच्या माध्यमातून २०९६ संस्थांचा ऑडीट तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लेखक : - सुनिल पोटेकर
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची ...
हे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकार...
महा ऑनलाईन संस्थेमार्फत आपल्या विभागाची संपूर्ण मा...