অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘नीश’ : अर्थात, ‘या सम हा!’

‘नीश’ : अर्थात, ‘या सम हा!’

‘पर्यावरणशास्त्र’ हे एक असे शास्त्र आहे, ज्यात विविध अधिवासांतील चल आणि अचल प्रजातींच्या वर्तनाची प्रत्यक्ष निरीक्षणे घेऊन, त्यावर आधारित नोंदी टिपून निष्कर्ष काढले जातात, आणि अशा अनेक निरीक्षणांतून विविध मनोरंजक तथ्ये समोर येतात. बऱ्याच वेळा असेही आढळून आले आहे की, ही निरीक्षणे जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी घेतली गेली तेव्हा त्यांच्यात कधी अपेक्षित असे साम्य आढळून आले, तर कधी पराकोटीची विसंगतीही आढळून आली; पण तरीही ती निरीक्षणे सत्य असल्याने निष्कर्षांत भिन्नता असली, तरी त्या सर्व निष्कर्षांना पर्यावरणशास्त्रात मान्यताही मिळाली! आणि म्हणूनच पर्यावरणशास्त्र हे कोणत्याही शास्त्रीय नियमात, सूत्रात अथवा सरळसोट गणिती प्रमेयात बंदिस्त करता येण्याजोगे शास्त्र नाही; तर ते इतर विज्ञानशाखांच्या एक पाऊल पुढे असलेले निसर्गाच्या जिवंतपणाचे प्रतीक असलेले शास्त्र आहे. आणि जिथे जिवंतपणा आहे, तिथे लहरीपणाही आलाच! बऱ्याच जंगल निरीक्षकांनी निसर्गाच्या स्वैर आणि स्वच्छंदीपणाचे असे पुरेपूर अनुभव घेतलेले आहेत. आणि म्हणूनच पर्यावरणशास्त्रात अंदाज बांधण्याला मनाई नाही, परंतु तुमचे अंदाज प्रत्येक वेळी तंतोतंत खरे ठरतीलच याची खात्री नाही! कदाचित म्हणूनच पर्यावरणशास्त्रातील निरीक्षणांचे वर्णन करताना ‘बहुतेक वेळा असे आढळून येते की’ या वाक्याचा मुबलक वापर केलेला दिसतो. ह्या विधानाला पुष्टी देणारी अनेक मजेदार उदाहरणे तुम्हांला जिम कार्बेटच्या ‘जंगल लोअर्’ ह्या पुस्तकात वाचायला मिळतील.

पर्यावरणशास्त्रातील असेच एक रंजक निरीक्षण म्हणजे ‘नीश’! कोणत्याही सजीवाचा स्वतःचा असा एक विशिष्ट पर्यावरणीय कोनाडा, म्हणजेच त्या सजीवाचा ‘नीश’; अशी साधारणपणे ‘नीश’ ची व्याख्या केली जाते. विविध पर्यावरणशास्त्रज्ञांनी ‘नीश’चे आपआपल्या निरीक्षणांनुसार तपशीलवार वर्णन केले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक सजीव हा त्याच्या अधिवासात स्वतःची अशी एक जागा म्हणजेच ‘नीश’ निर्माण करतो, ज्यात तो स्वतःला जास्तीत जास्त जुळवून घेऊ शकेल, आणि त्याचे आजूबाजूच्या परिस्थितीशी अधिकाधिक अनुकूलन घडून येईल.

काही शास्त्रज्ञांच्या मते एखाद्या सजीवाची एखाद्या ठिकाणी जीवन व्यतीत करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत असते, ज्यात आजूबाजूच्या घटनांना सजीवाने त्याच्या शारीरिक क्षमतेनुसार व बौद्धिक आकलनशक्तीनुसार दिलेला प्रतिसाद, तसेच इतर सजीवांसोबतच्या अन्योन्यक्रिया व परस्परसंबंध, त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयी अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

सजीवाची नैसर्गिक शारीरिक ठेवण तसेच त्याची नैसर्गिक आहार-विहार प्रवृत्ती, त्याच्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती, अशा अनेक गोष्टी सजीवाला त्याचा ‘नीश’ निश्चित करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आढळून येतात. निसर्ग नियमानुसार ह्या सर्व लकबी, सवयी आणि प्रवृत्ती अनुवांशिकतेने तसेच माता-पित्यांनी अपत्यांना दिलेल्या प्रशिक्षणाद्वारे पुढच्या पिढीत प्रसारित होत राहतात, म्हणूनच विशिष्ट प्रजातीच्या सजीवांच्या ‘नीश’ मध्ये साधर्म्य आढळून येते हे ओघानेच आले. अशा प्रकारे सजीवाचे त्याच्या अधिवासात स्वतःचे असे स्थान निर्माण होते, आणि सजीव त्या स्थानानुरूप भूमिका वठवू लागतो.

‘नीश’चे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, ‘नीश’ एका प्रजातीला दुसऱ्या प्रजातीपासून वेगळे सिद्ध करतो म्हणजेच प्रत्येक प्रजातीचे अद्वैत जपतो. जसे, विविध प्रजातीच्या पक्ष्यांची घरटी बांधण्याची स्वतःची अशी एक वेगळी पद्धत असते, किंवा धोक्याच्या परिस्थितीची जाणीव होताच विविध प्रजातींकडून तिला दिला जाणारा प्रतिसाद वेगवेगळा असतो, जसे, साळींदर अंगावरील काटे परजून युद्धाला सिद्ध होते, तर ससा धोक्याच्या परिस्थितीतून चपळाईने निसटून जाणेच पसंत करतो, तर जलीय अधिवासातील माशांची एक प्रजात विशिष्ट ध्वनिलहरी सोडून समूहातील इतर माशांनाही धोक्याची जाणीव करून देते.

सामान्यतः निसर्गात सजीवाला उपजीविकेकरिता अन्न शोधणे तसेच नैसर्गिक शत्रूंपासून बचाव करण्याकरिता सुरक्षित आसरा शोधणे ह्या प्रमुख गरजांना प्राधान्य द्यावे लागते. त्यादृष्टीने निसर्गातील जैविक आणि अजैविक घटकांसोबतच्या सजीवाच्या परस्परक्रियांचा समावेश त्याच्या ‘नीश’ मध्ये होत असतो. अशा प्रकारच्या ‘नीश’ची प्रजातींची व्याप्ती त्यांच्यासाठी एका दृष्टीने फायदेशीरच ठरते, कारण त्यामुळे उपलब्ध संसाधनांसाठी विविध प्रजातींत होणारा संघर्ष आणि स्पर्धा काही प्रमाणात कमी करणे शक्य होते. म्हणजेच एका दृष्टीने ‘स्वयंशिस्तीचा पाठ’ अशीही ‘नीश’ची ओळख सांगता येईल. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की मधमाशा, खारी आणि सरडे यांचा अधिवास एखादा डेरेदार वृक्ष आहे. त्यांपैकी, खारी स्वतःसाठी फळे, बिया, दाणे आणि इतर टिकाऊ खाद्य जमवून झाडाच्या ढोलीत साठवून ठेवतील, मधमाशा पुष्परस गोळा करून त्याचे मधात रुपांतर करून पोळ्यात साठवून ठेवतील, तर सरडे झाडाच्या फांद्यांवरील कीटकांना आपले भक्ष्य बनवतील; यांपैकी खारी मध बनवणार नाहीत, सरडे खाद्य जमवणार नाहीत, किंवा मधमाशा इतर कीटकांची शिकार करणार नाहीत, कारण तो त्यांचा ‘नीश’ नाही.

काही तज्ज्ञांच्या मते, विविध पर्यावरणीय परिस्थितींतील प्रजातींचे समायोजन म्हणजे त्या प्रजातींचा ‘नीश’. याचा अर्थ असा की आजूबाजूची परिस्थिती अनुकूल असेल, म्हणजेच जेथे संसाधनांची विपुलता आहे आणि तुलनेने नैसर्गिक स्पर्धकांची किंवा शत्रूंची फारशी धास्ती नाही, अशा परिस्थितीत प्रजातींना कदाचित फारसा संघर्ष करावा लागणार नाही; परंतु याच्या पूर्णपणे विरुद्ध परिस्थितीत म्हणजेच जेथे संसाधनांची कमतरता आहे, आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या स्पर्धकांचा सुळसुळाट आहे, अशा परिस्थितीत प्रजातींना करावा लागणारा संघर्ष हा थेट त्यांच्या अस्तित्वासाठीचाच लढा असेल; आणि अशा विभिन्न स्थितींना प्रतिसाद देताना आणि जुळवून घेताना सजीवाचे असणारे वर्तन हाच त्याचा ‘नीश’.

वरील सर्व मतांचा गोषवारा काढल्यास, थोडक्यात असे म्हणता येईल की, सजीवाचे पर्यावरणातील विशिष्ट कार्य आणि भूमिका यांना अनुसरून असलेले एकमेव स्थान म्हणजे त्या सजीवाचा ‘नीश’; आणि ‘नीश’ मध्ये समाविष्ट असणारे प्रमुख घटक म्हणजे, सजीवाचा अधिवास, सजीवाची विशिष्ट कार्यपद्धती आणि त्या कार्यपद्धतीद्वारे अधिवासातून सजीव स्वतःसाठी प्राप्त करीत असलेली संसाधने. या सर्व वर्णनांतून आपल्या लक्षात येईल की, ‘नीश’चा अभ्यास, निसर्गातील प्रत्येक सजीवाचे स्वतंत्र अस्तित्त्व मान्य करणारा, त्याला केंद्रस्थानी किंवा नायकाच्या भूमिकेत ठेवणारा आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा असा अभ्यास आहे.

विविध शालेय पर्यावरणीय प्रकल्पांसाठी ‘नीश’चा अभ्यास नक्कीच एक सर्जनशील अनुभूती देणारा ठरू शकेल. अशा अभ्यासासाठी तुम्हांला प्रत्यक्ष जंगलात जाण्याची काहीही आवश्यकता नाही. तुमच्या शाळेच्या किंवा बिल्डिंगच्या आवारातील एखादे झाड, किंवा तुमच्या परिसरातील एखादे उद्यान तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी निवडू शकता. त्या आवारातील किंवा उद्यानातील झाडाचे बारकाईने निरीक्षण केल्यास विविध प्रजाती आपआपल्या ‘नीश’ला अनुसरून कार्यरत असलेल्या तुम्हांला आढळून येतील.

‘अन्नसाखळी’ हे ‘नीश’ च्या अभ्यासाकरिता एक सोपे निरीक्षण ठरते. उदाहरणार्थ, झाडे त्यांच्या ‘नीश’नुसार सूर्यप्रकाशापासून अन्ननिर्मिती करत असतात, त्या झाडांची पाने अळ्या खातात, परंतु, मोठे कोळी किंवा नाकतोडे अळ्यांना खाऊन झाडांचे संरक्षण करतात. अशा प्रकारच्या अनेक अन्नसाखळ्या निसर्गात अस्तित्वात आहेत. नैसर्गिक अन्नसाखळीत समाविष्ट असलेला प्रत्येक घटक स्वतःच्या उपजीविकेबरोबरच पर्यावरण संतुलनाचीही महत्त्वाची भूमिका बजावताना आढळून येतो. जरी ‘जीवो जीवस्य जीवनम् |’ हे अन्नसाखळीचे तत्त्व असले, तरी परस्परांना सहकार्य करत जगण्याची उपजत प्रवृत्ती केवळ निसर्गातच आढळून येते.

तुम्ही कधी चरायला जाणाऱ्या किंवा तलावावर जाणाऱ्या गाई-म्हशींच्या कळपांचे नीट निरीक्षण केलेत, तर कळपातील काही जनावरांच्या पाठीवरून काही बगळे निर्धास्तपणे प्रवास करताना दिसतील. कळपाच्या गवतातून चालण्यामुळे भयभीत झालेले आणि गवताचा आसरा सोडून सैरावैरा उडू लागलेले कीटक हे बगळे अलगदपणे टिपतील. त्यांच्या ह्या कृतीने ते केवळ स्वतःची भूक भागवणार नाहीत, तर कळपातील जनावरांनाही त्या कीटकांचा दंश होण्यापासून वाचवतील. हे सहकार्यात्मक ‘नीश’चे आणखी एक सर्वसामान्य उदाहरण.

आता तुमच्या मनात एक प्रश्न उभा राहिला असेल, तो म्हणजे “मानवाचा सुद्धा ‘नीश’ असतो का?” आपण पाहिले की निसर्गातील सर्व सजीवांचा स्वतःचा ‘नीश’ असतो, म्हणजेच आपण मानवही याला अपवाद नाही. तसे असेल, तर मानवाचा ‘नीश’ काय असेल बरे?

थोड्या खोलात जाऊन विचार केला तर असे लक्षात येईल, की विविध प्रजाती करीत असलेला निसर्गाचा वापर म्हणजे जीवनचक्र चालू ठेवण्यासाठी ‘नीश’च्या माध्यमातून निसर्गाने त्यांच्यावर सोपवलेली एक नैतिक जबाबदारीच आहे. आणि ही नैतिक जबाबदारी मानवाव्यतिरिक्त निसर्गातील प्रत्येक सजीव त्याच्या संपूर्ण कुवतीनुसार पार पाडतो आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या मते, अगदी एक छोटीशी मधमाशी पृथ्वीवरून विलुप्त झाली, तर संपूर्ण पृथ्वीवरील जीवन अवघ्या चार वर्षांत संपुष्टात येईल. कारण मधमाशी नाही, म्हणजे परागण नाही, त्यामुळे नवीन वनस्पतींची निर्मिती नाही, त्यामुळे प्राणी नाहीत, आणि मानवही नाही.

वास्तविक मानवाला लाभलेली बौद्धिक संपन्नतेची देणगी मानवाला पृथ्वीवरील इतर सर्व प्रजातींपेक्षा वरचढ ठरवते. आणि म्हणूनच इतर कोणत्याही प्रजातीच्या तुलनेत निसर्गाच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी मानवावरच अधिक आहे. परंतु, आधुनिक मानवाला त्याच्या पर्यावरणीय ‘नीश’चा अर्थ समजून घेऊन, आपली वर्तणूक आपल्या अस्तित्वाच्या उद्देशाशी पूर्णपणे सुसंगत आहे का याचे सखोल आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी बिकट व चिंताजनक परिस्थिती आज निर्माण झाली आहे; हे सत्य नाकारता येणार नाही. अर्थात, ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा ‘नीश’नेच मानवाला दाखवलेला एक आशेचा किरण म्हणजे, ‘शाश्वत विकास’.

स्वयंमूल्यमापन, आत्मशिस्त आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या जोरावर शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्याचे व्यक्तिगत आणि राजकीय स्तरावरील सर्व प्रामाणिक प्रयत्न पृथ्वीवरील पर्यावरणाचा ढासळलेला तोल सावरायला मदत करतील यात शंका नाही.

 

-    प्राजक्ता जाधव

************

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate