অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एका कल्पक, आत्मनिर्भर संस्थेची बांधणी

एका कल्पक, आत्मनिर्भर संस्थेची बांधणी

नवनिर्मिती संस्थेला अनेकजण गैरसरकारी संस्था म्हणजे एनजीओ म्हणतात. पण आम्ही आमच्या संस्थेची व्याख्या आत्मनिर्भर सामाजिक संस्था (A self reliant social enterprise) अशी करतो. एनजीओंचं काम बरेचदा बाहेरून मिळणाऱ्या पैशांवर चालतं. यामुळे कामावर बऱ्याच मर्यादा येतात. नवनिर्मिती गटातील संस्था त्यांच्या गरजांसाठी लागणारा पैसा मुख्यतः स्वतःच्या कामातूनच कमावतात अर्थात त्यासाठी काही शैक्षणिक साधनांचे उत्पादन व वितरण करतात, कार्यशाळा घेतात, शैक्षणिक कार्यक्रम राबवतात आणि सल्लागार म्हणून काम करतात (consultancy) आणि बाजाराच्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करतात.  परंतु त्या भांडवली संस्था नाहीत. मग त्या काय आहेत ?.

संस्था स्थापन करायची असे ठरवून नवनिर्मिती तयार झालेली नाही.सामाजिक बांधिलकी मानणारे काही समविचारी लोक रोजगारनिर्मितीसाठी एकत्र आले आणि त्यानंतर कामे आणि संस्था दोन्हीही विकसित होत गेले.

त्यामध्ये आज नवनिर्मिती ट्रस्ट, (१९९८), नवनिर्मिती एज्युक्वालिटी, मुंबई, आणि नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन, पुणे, या २०१३ मध्ये स्थापन झालेल्या दोन स्वतंत्र कंपन्यांचा (section 25 A) अंतर्भाव आहे. तीनही संस्था पूर्णपणे स्व-आश्रयी आहेत. त्या स्वाश्रयी कशा होत गेल्या, त्यातली महत्त्वाची उदाहरणे मी पुढे देतो आहे, मात्र इथे काही निवडक व्यक्तींचा  आणि प्रकल्पांचा उल्लेख करता आला आहे, याशिवाय कितीतरी नावे जागेअभावी देता आली नाहीत, मात्र त्यांचा सहभागही तितकाच मोलाचा आहे.

१९८० मध्ये भारतात खग्रास सूर्यग्रहण दिसणार होते. ते पाहण्यासाठी लोकविज्ञान संघटनेचेअरुण देशपांडे यांनी एक स्वस्त सूर्यचष्मा तयार केला होता.दोन कॉम्प्युटर कार्ड्स मध्ये मायलर फिल्म बसवून तो बनवलेला होता. मुंबईच्या लोकविज्ञान संघटनेने असे हजारो चष्मे विकून त्यातूनच विज्ञान जत्रेसाठी ३३,०००रू. उभे केले होते.

१९९५ साली असेच एक सूर्यग्रहण भारतात दिसणार होते. त्याचवेळी ठाण्यातल्या CITU युनियनच्या सभासद असलेल्या २० महिला एका औषध कंपनीबरोबर कारखाना बंदी विरोधात संघर्ष करीत होत्या. तसंघर्षकाळात  त्यांना रोजगार मिळावा म्हणून  आम्ही सूर्यचष्मे बनवायचे ठरवले. पण मायलर फिल्म मिळेना.लोकविज्ञानच्या  पुरुषोत्तम त्रिपाठींनाचॉकलेटच्या रॅपरसाठी वापरली जाणारी फिल्म सापडली. ती कुठे बनते ते आम्ही शोधले.  तळोज्यातल्या एका कंपनीत जाऊन  शेकडो रोल प्रत्यक्ष तपासल्यावर त्यातला एक रोल योग्य वाटला   सूर्यकिरणांची तीव्रता कमी करण्याचे त्याचे गुणधर्म TIFR मधल्या डॉ. ब्रिज अरोरांच्या टीमने स्पेक्ट्रोफोटोमीटरवर तपासून दिले. योग्य ती फिल्म सापडल्यावर लाखो सूर्यचष्मे बनवण्याचे काम भांडुपच्या वस्तीतल्या अनेक महिलांनी केले. जनवादी महिला संघटनेच्या सुगंधी फ्रान्सिस यांनी या कामासाठी महिलांना संघटित केले. कॉमेट मीडिया फाउंडेशनने आकर्षक जाहिरात पत्रके छापून दिली. त्यावेळी एकूण साडेपाच लाख चष्मे  एप्सन च्या शाखांनी देशभर विकले.

या तीन महिन्यात पन्नासेक महिलांना चांगला रोजगार मिळाला. पश्चिम बंगाल विज्ञान मंचला  फिल्म पाठवली आणि त्यांनीही अडीच लाख चष्मे बनवले  हे सगळे चष्मे ऑल इंडिया पिपल्स सायंस नेटवर्क एआयपीएसएन (एआयपीएसएन)च्या शाखांनी देशभर विकले. यासाठीची माहितीपत्रके कॉमेट मिडिया फाउंडेशनने तयार करून दिली. सूर्यग्रहण पाहण्याचे व्यापक कार्यक्रम देशभर झाले. एआयपीएसएनला देखील या निमित्ताने लाखो रुपये उभे करता आले.

यातून उभे राहिलेले साडेतीन लाख रुपये वापरून एक ट्रस्ट स्थापन करावा असे आम्ही ठरवले. ट्रस्टने विज्ञानाधारित सामग्री बनवावी, वितरित करावी, यंत्रांऐवजी हातांना काम द्यावे, गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम उत्पादन प्रक्रिया वापराव्यात आणि त्यातून शाश्वत आणि चांगले उत्पन्न देणारा रोजगार निर्माण व्हावा, अशी दृष्टी यामागे होती. ‘आपण हे काहीतरी नवेच करत आहोत म्हणून या ट्रस्टला नवनिर्मिती म्हणूया’ असे संस्थापक गटातील विमल भोर यांनी सुचवले. सूर्यचष्म्यांच्या कामात सहभागी असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी हेच नवनिर्मितीचे सुरुवातीचे विश्वस्त झाले.

पण सूर्यग्रहण काही दरवर्षी  होत नाही.. मग पुढे काय करायचं?

सूर्यचष्मे बनवताना बरेच काही साधले होते. एक वैज्ञानिक कल्पना, रॅपिंगची फिल्म वापरण्याची कल्पकता,  ती प्रत्यक्षात आणण्यासाठीची शोधाशोध, TIFR सारख्या संस्थेतील वैज्ञानिकांनी दिलेला जागतिक दर्जाचा तांत्रिक सहभागअसंघटित क्षेत्रात असलेले कुशल हस्तकामगार, लघुउद्योगातील तंत्रकौशल्य, स्वतःच्या टीमचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्य, महिलांचे संघटन, देशभरातील विज्ञान संघटनांची ताकद या सगळ्याचा मेळ घालून आत्मनिर्भरतेचं एक ठळक उदाहरण या निमित्ताने घातले गेले.

पुढच्याच वर्षी जोडो प्रकल्प करताना पुन्हा एकदा या सगळ्याचा एकात्मिक उपयोग आम्ही केला. जे बीजभांडवल घातले होते, त्यातून संशोधनाचा आणि पगाराचा खर्च झाला. त्यानंतर तयार झाले ते जोडो किट.

अरविंद गुप्तांच्या व्हाल्व ट्युब-काडेपेटीच्या  मेकॅनोपासून सुरूवात करून पुढे आम्ही अनेक संशोधन-प्रयोग केले. निरनिराळ्या त्रिमित आकृत्या बनवण्यासाठी उपयुक्त असे अनेक पायांचे लवचिक सांधे (कनेक्टर) आम्ही या प्रयोगातून विकसित केले. दिसायला अतिशय साधा, वापरायला सोपा आणि बहुपयोगी असा हा कनेक्टर आहे. हा कदाचित जगातला सर्वोत्कृष्ट कनेक्टर असावा. . त्यासाठी ज्योती फ्रान्सिसनी जोगिंदर सिंगकडून यंत्रे तयार करून घेतली. या यंत्रांवर आमच्या टीममधल्या महिलांनी अगदी अचूक बसणारे सांधे बनवले. या बहुपयोगी जोडो किटचे उत्पादन आता नवनिर्मिती एज्युक्वालिटी करते. पहिल्यापासून आतापर्यंत संस्थेच्या आर्थिक स्वावलंबनामध्ये जोडो किटचा वाटा राहिलेला आहे.

स्वावलंबनासाठीचा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे २००० मध्ये सुरू झालेला सक्रिय जनगणित (UAM – Universal Active Math)हा कार्यक्रम. जनगणित कार्यक्रमामुळे युनिसेफ, सर्व शिक्षा अभियान, टाटा ट्रस्ट्स यासारख्या संस्थांमार्फत नवनिर्मितीची गणित शिकविण्याची पद्धत आणि साधने राज्याराज्यात पोचली.सक्रिय जनगणित हा कार्यक्रम नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन इतर अनेक समविचारी संस्था आणि व्यक्तींच्या सहभागाने राबवते.

सक्रिय जनगणित कार्यक्रमामुळे आणिइतर गणित कार्यशाळांमुळे देशभरात गणित शिकविण्याच्या दर्जेदार साधनांची मागणी खूप वाढली. सूर्यचष्मे आणि जोडो किटप्रमाणेच असंघटित क्षेत्रातील कामगारांची कौशल्ये वापरत मोठ्या प्रमाणावर  किट बनविण्याची क्षमता नवनिर्मितीत  तयार झाली.

असंघटित पण कुशल मनुष्यबळ जास्तीत जास्त वापरून सर्वांना परवडू शकेल आणि तरीही दर्जेदार असे शैक्षणिक साहित्य लघुउद्योगात मोठ्या प्रमाणात तयार करणे ही आता नवनिर्मितीची खासियत बनली आहे.

साधनांचे उत्पादन आता नवनिर्मिती एज्युक्वालिटी करते. नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन आणि इतर अनेक संस्थांच्या सहकार्याने त्यांचे वितरण होते.

२००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सूर्यग्रहणासाठी नेल्सन मंडेला विद्यापीठातले आमचे मित्र प्रा. पॉल वेब यांनी आमच्याकडे सूर्यचष्म्यांची मागणी केली. मात्र आमच्या चष्म्यालाअसलेली स्टेपलरची पिन त्यांना नको होते. आम्ही एक स्टायलिश डिझाईन बनवले आणि २ लाख चष्म्यांची ऑर्डर मिळाली. पण प्रत्यक्ष उत्पादन करताना लक्षात आले की या डिझाइनचे चष्मे हाताने बनवणे अशक्य आहे. मी म्हणालो ऑर्डर नकोच आपल्याला... पण डॉ. नंदकुमार जाधव आणि गीता लाडी यांनी स्थानिक प्रिंटींग व लामिनेशन मशीनवर बनवता येईल अशी पद्धत शोधली, आणि ऑर्डर वेळेत पूर्ण केली. एकही तक्रार आली नाही. एवढेच नव्हे, तर त्या वर्षी तिथे उपलब्ध असलेले हे सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट चष्मे होते असे प्रा. वेब यांनी कळवले. या कामातून उभ्या राहिलेल्यापैशातून ट्रस्टला मुंबईत मोक्याच्या जागी, आयआयटीजवळ जागा खरेदी करता आली.

अगदी सुरवातीपासूनच गुणवत्ता हा आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. NCF 2005 आणि RTE 2009 च्या आधीपासूनचगुणवत्तापूर्ण गणित आणि विज्ञान शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण कसेकरता येईल हा विषय आमच्या अजेंड्यावर होता. NCF 2005 ने दर्जेदार शिक्षणाची व्याख्या मांडल्यावर आमच्या त्या म्हणण्याला बळ आले. सुरवातीपासून आम्ही “Quality for equality”– ‘समतेसाठी गुणवत्ता असे ब्रीदवाक्य घेऊन काम करीत आलो होतो. ‘गुणवत्ता ही काही  निवडक लोकांची मक्तेदारी असू शकते आणि quality आणि quantity ह्या एकत्र न जाणाऱ्या संकल्पना आहेत’ही मनोवृत्ती बदलण्याचाच प्रयत्न आम्ही करत आलोआहोत. वर्षा खानविलकरांच्या मदतीने जेव्हा चांगल्या शैक्षणिक साहित्याचे केंद्र पुण्यात सुरू केले तेव्हाही त्याचे नाव “सर्वांसाठी, समतेसाठी गुणवत्ता” असे ठेवले.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याकल्पना साधारणपणे कॉंप्युटरच्या जगात वापरल्या जातात. त्या आम्हीपण वापरतो. शिकणाऱ्यांना जे साहित्य वापरायला द्यायचे आहे, ते हार्डवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजे हे साहित्य वापरून गणिताच्या संकल्पना कशा शिकवायच्या, ती पद्धती. गोट्या, बिया, सागरगोटे, जमिनीवर आखलेल्या चौकटी, काडेपेटीच्या काड्या इ. गोष्टी हे झाले हार्डवेअर. यातले पुष्कळसे साहित्य आजूबाजूला सहजच उपलब्ध असते. UAM गटातले लोक नवनिर्मितीच्या स्थापनेच्या आधीपासूनच गणित आणि विज्ञानातील सर्व पातळ्यांवरील संकल्पना कशा शिकवायच्या याचा विचार करीत आलेले आहेत. त्यांनी परिसरातले साहित्य, वाट्या, दगड, मणी, पुठ्ठ्याचे आकार, बाटल्या, तराजू, वजने-मापे, पट्ट्या-टेप असे बरेच साहित्य वापरलेले होते. त्याचबरोबर शिक्षणपद्धतीच्या गरजेनुसार नवनव्या शैक्षणिक साधनांच्या कल्पनांचीही भर त्यात पडत होती. त्यातले काही साहित्य आता आम्ही बनवतो, काही साहित्य बाजारातून आणतो.

आमच्या गटातले सगळे - सहकारी आणि शिक्षक सतत सॉफ्टवेअर विकसित करत असतात – आजूबाजूला दिसणाऱ्या साध्यासाध्या गोष्टींचा नाविन्यपूर्ण, प्रभावी वापर गणितातल्या गुंतागुंतीच्या संकल्पना शिकण्यासाठी कसा करता येईल ते शोधत राहतात. अगदी KG ते PG साठी. नवनिर्मितीने ‘स्वतः करून बघा आणि शिका’ हे तत्त्व नेहमीच पायाभूत मानलेले आहे, त्यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे स्वतंत्र कप्पे पडत नाहीत. दोन्ही एकमेकांनापूरक ठरतात, केवळ शिकणे सोपे करण्यासाठी नाही, तर स्वावलंबनासाठीही! हार्डवेअर सॉफ्टवेअरच्या एकाभिमुखतेचे जोडो हे चांगले उदाहरण आहे.

जोडो बनवल्यानंतर नवनिर्मिती ट्रस्टला या संचांच्या वितरणासाठी धोरण आखावे लागले. तेव्हा आम्ही गणित कार्यशाळांची मालिका तयार केली. काही कार्यशाळा होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात घेतल्या. आर्य विद्या मंदिर संस्थेच्या वत्सला शर्मा एका कार्यशाळेत सहभागी होत्या. पुढे त्यांनी त्यांच्या शाळेत आम्हालाबोलावले. पुढची पाच वर्षे या शाळेतल्या शिक्षकांसह काम करून मी आणि गीता महाशब्देनी प्राथमिक शाळांसाठीचा गणिताचा कृती-आधारित सर्वंकष कार्यक्रम – सक्रिय जनगणित - UAM तयार केला.

पुढे आम्ही हा कार्यक्रम महाराष्ट्र, गोवा आणि त्रिपुरा इथल्या शाळांमध्ये व्यापक स्तरावर राबवला. यातील प्रत्येक कार्यक्रम आत्मनिर्भर होता, त्यातून पगारासाठीची रक्कम तर उभी राहिलीच, शिवाय इतर प्रकल्पांना अर्थसाहाय्य देता आले आणि संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळाले.

आता हे बहुपयोगी मॅथकिट अनेक प्रांतात लाखो शाळांमध्ये वापरले जाते.  होमी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरच्या पदार्थ-विज्ञान प्रयोगशाळेनेदेखील आमच्याकडून ५००० जोडो सांधे घेतले होते. अर्थातच या प्रत्येक ठिकाणी सॉफ्टवेअर मात्र वेगळे आहे.

गेल्या वीस वर्षात नवनिर्मिती टीमने डझनावारी नवनवीन कल्पकशैक्षणिक खेळणी, साहित्य निर्माण केले आहे. महाराष्ट्र, गोवा आणि इतर राज्यांसाठी गणित-शिक्षणाचे व्यापक कार्यक्रम राबवताना प्रभावी सॉफ्टवेअर पॅकेजदेखील बनवले आहे. त्यात शिक्षक-हस्तपुस्तिका, मुलांसाठी वर्कबुक्स, प्रशिक्षण-क्रम आणि मूल्यमापन पद्धती यांचा समावेश आहे. हे सॉफ्टवेअर जगातील सर्वोत्तम साहित्यापैकी एक आहे आणि मुख्य म्हणजे ते वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करता येते. अर्थातच ते इतर कोणाला नफ्यासाठी वापरता येत नाही.

आम्हाला बाजाराच्या चौकटीत काम करावे लागत असल्यामुळे आम्हाला आमच्या संशोधनाबांबत दुहेरी धोरणे आखावी लागतात. १९९८पासून केलेल्या कामासंदर्भात काही पेटंट, कॉपीराईट, डिझाईन कॉपीराईट आणि ट्रेडमार्क नवनिर्मिती ट्रस्टने घेतलेली आहेत. भांडवली अर्थव्यवस्थेत आमच्याच संशोधनांचे  उत्पादन आणि वितरण करण्यात आम्हाला अडचणी निर्माण करू नयेत म्हणून. मात्र व्यापारी उद्देश नसेल त्यांच्यासाठी हे सर्व साहित्य आम्ही नवनर्मिती लर्निंग फाउंडेशनच्या वेबसाईटवर कॉपीलेफ्ट लायसन्सखाली विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहे. या साहित्याचा व्यापारासाठी उपयोग केलेला आढळला तर मात्र आम्ही आमचा हक्क व्यवस्थित वकिली सेवा वापरून बजावतो. जी रॉयल्टी मिळते ती ट्रस्टफंडात जमा होते.

संस्था आत्मनिर्भर असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे नियम स्वतः ठरवू शकता. अंतर्गत कारभारासाठी आणि मित्र संस्थांबरोबरच्या एकत्रित कामासाठीही. उत्तम काम करणारी माणसे पैसा हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून काम करत नाहीत. नवनिर्मितीच्या विज्ञान आणि गणिताच्या कार्यक्रमांना अनेक सहकाऱ्यांकडून उत्तम शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय इनपुट मिळत आलेला आहे. काही पूर्ण वेळ काम करणारे पगारी कार्यकर्ते आहेत, काही साधनव्यक्तींना वेळानुसार पैसे दिले जातात, (अर्थात व्यावसायिक दराने नाही), तर अनेकजण पूर्णपणे स्वयंसेवी कार्यकर्ते आहेत, ते त्यांचा वेळ, ज्ञान, कौशल्य आणि कष्ट या कामासाठी खर्ची करतात.हीमाणसे हीच संस्थेची खरी पुंजी आहे. यावरच संस्था उभ्या राहतात. या सर्वांना देण्याचा मोबदला बाजाराच्या नियमांनी ठरत नाही, तर पूर्ण विवेकाधारित, लोकशाही आणि पारदर्शी पद्धतीने सर्वांच्या सहभागाने ठरवलाजातो. संस्था आत्मनिर्भर करण्यातकार्यशाळांमधून जमा होणाऱ्या निधीचा मोठा वाटा आहे. उत्पादनांची विक्री हा त्याचा दुसरा भाग.

नवनिर्मितीने महाराष्ट्रात तयार केलेले आत्मनिर्भरतेचे प्रारूप वापरून आपल्या देशात इतर अनेक आत्मनिर्भर संस्था उभ्या राहू शकतात असे आमचा अनुभव सांगतो. आत्मनिर्भरसंस्थेचीमहत्त्वाची पूंजी म्हणजे तिथला पैसा नसून तिथे काम करणारी माणसे हीआहे. अधिकाधिक नफा हा येथे उद्देश नसून अधिकाधिक चांगले, परिणामकारक आणि व्यापक काम करणे हे ध्येय असते. आधी कामाच्या परिणामाचा ताळेबंद घ्यायचा आणि नंतर पैशांचा. पैसाहे साध्य नव्हे, तर आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठीची कामे आणि त्यासाठीचेमनुष्यबळ यावर कराव्या लागणाऱ्या खर्चासाठीचेते साधन आहे.

नवनिर्मिती संस्था स्थापन झाल्यावर काहीच दिवसात दिल्लीच्या अशाच एका समविचारी गटाला आम्ही एक लाखाची मदत दिली होती. आज ती संस्था ‘जोडो ग्यान’ म्हणून ओळखली जातो. त्यांनीही त्यांचा स्वतःचा गणित-विज्ञानाचा पाठ्यक्रम, कृती-साहित्य तयार केले आहे, दिल्ली, पंजाबच्या शाळांमध्ये व्यापक प्रमाणावर तेही काम करत आहेत. एक लाखाचे निर्व्याज कर्ज त्यांनी केव्हाच परत केले आहे. आज जोडो किटचे तेही एक मोठे वितरक आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या रंगोमेट्री किटचे आम्ही वितरण करतो. दोन्ही संस्थाप्रतिस्पर्ध्यासारखे न वागता सहकारी तत्त्वाने काम करतात. आमचे ध्येय सारखेच आहे आणि आम्ही मिळून तयार केलेले नियम काटेकोरपणे पाळले जातात. अशा पद्धतीने गंभीरपणे शिक्षणक्षेत्रात व्यापक काम करणाऱ्या इतरही काही आत्मनिर्भर संस्था आज आहेत.

भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करताना शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रात शासन करत असलेल्या अनेक अवैज्ञानिक गोष्टींवर टीका करावीच लागते. उदाहरणार्थ, गुजराथमधील पाठ्यपुस्तकात दिनानाथ बात्रांनी केलेल्या प्राचीन भारतातातीलविज्ञानाचे दावे, किंवा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी मुंबईच्या डॉक्टर लोकांसमोर केलेल्या गणपती आणि प्लास्टिक सर्जरीबद्दलचेविधान. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कायम दक्ष राहणे आणि सतत प्रश्न विचारत राहणे. जेव्हा शिक्षण-क्षेत्रात राजकारण शिरते, तेव्हा वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही राजकीय भूमिका घेणे आवश्यक ठरते. गेल्या वर्षापर्यंत नवनिर्मितीच्या अनेकसाधनव्यक्ती  महाराष्ट्र शासनासाठी शिक्षणविभागासोबत गणित शिक्षणासाठी सक्रिय काम करीत होत्या.  यातील एकदोन व्यक्तींनी पंतप्रधानांच्या काही धोरणांवर उघडपणे टीका करायला मागे पुढे न पाहिल्यामुळे असेल, पण सर्व समित्यांवरून नवनिर्मितीच्या व्यक्तींना त्वरित दूर केले गेले.

जेव्हा सत्तेमधल्या लोकांना समाजाच्या प्रश्नांना उत्तरं देता येत नाहीत, तेव्हा ते प्रश्न विचारणाऱ्यांनाच काही करून गप्प करतात. त्यांना मिळणाऱ्या निधीवर बंधने आणतात, त्यांनी केलेल्या कामांचे पैसे थकवतात. पण शासकीय निधीवर किंवा इतर कोणत्याही एकाच संस्थेवर आमचे काम अवलंबूनच नसल्यामुळे आमच्या कामावर अशा गोष्टींचा काहीही परिणाम झाला नाही.

हीच आत्मनिर्भरतेची ताकद आहे !

 

डॉ. विवेक मॉंटेरो, मुंबई (ईमेल: vivekmonteiro@yahoo.कॉम)

एक अव्वल द्रष्टा लोकवैज्ञानिक. भौतिकशास्त्रात पी. एच. डी. करून त्यानंतर कामगारक्षेत्रात पूर्णवेळ काम करताना श्रम आणि ज्ञान याचा मिलाप करत शाश्वत रोजगारनिर्मितीसाठी नवनिर्मिती संस्था सुरू केली. गणित व विज्ञानाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रमाचे नेतृत्त्व करतात.

‘नवनिर्मिती ट्रस्ट,मुंबई’चे विश्वस्तमंडळ :

आमोद कारखानीस, सुगंधी फ्रान्सिस, विमल भोर, डॉ.छन्दिता बानर्जी,डॉ.रागिणी सेन, पुरुषोत्तम त्रिपाठी, डॉ. जयशंकर

संपर्क:info@navnirmiti.org

‘नवनिर्मिती एज्युक्वालिटी, मुंबई’चेसंस्थापक-संचालक मंडळ:

ज्योती फ्रान्सिस, पुरुषोत्तम त्रिपाठी,

संपर्क:091-22-25773215, 091-22-25786520,

http://www.navnirmitieduquality.org

navnirmitieduquality@gmail.com

‘नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन, पुणे’चेसंस्थापक-संचालक मंडळ:

वत्सला शर्मा, फुन्दिलालमाळी, वर्षा खानवेलकर, गीता महाशब्दे, प्रियंवदा बारभाई

संपर्क:091-20-24471040, 98503-03396

http://www.navnirmitieduquality.orgnavnirmitilearning@gmail.com

‘सॉयर मेमोरियल पुणे’चेविश्वस्तमंडळ:

डॉ. रामानुजम,डॉ. विवेकमॉंटेरो, डॉ. चैतन्य गुत्तीकर, जोसेफपिंटो, किरण फाटक, ललिता देशपांडे, गीता महाशब्दे

संपर्क:091-20-24471040

http://www.wwsawyer.org/

लेखक: डॉ. विवेक मॉंटेरो

माहिती स्रोत: पालकनीती

अंतिम सुधारित : 3/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate