অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओझेमुक्त आनंददायी शाळेसाठी...

ओझेमुक्त आनंददायी शाळेसाठी...


शाळा म्हटले की प्रत्येकाला शाळेतील आपले दिवस आठवतात. शाळेत आपण केलेली मौजमस्ती, सततचा गोंगाट आणि शिस्त आठवते. शाळा म्हटले की निस्वार्थ मैत्री आठवते. मित्रांबरोबर खेळलेले विविध खेळ आठवतात, शाळेत केलेल्या खोड्या, शिक्षकांचा ओरडा, सगळे सगळे आठवते. शाळा म्हटले की दप्तर, पुस्तके, वह्या, पाटी-पेन्सिल हेही येतेच. शाळा म्हणजे आपल्यासाठी अनेक अमूल्य अनुभवांचा ठेवा असतो. म्हणूनच आजही ‘आपली शाळा’ असे म्हटले की अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. आपण नकळत शाळेत जाऊन पोहोचतो.
शाळेतूनच आपल्या आयुष्याला वळण देण्याचे काम शिक्षक करत असतात. म्हणूनच प्रत्येकाच्या मनात शाळा घर करुन असते. "लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा" असे उगीच नाही म्हणत. शाळेतले ते आयुष्य म्हणजे खूप छान आणि गोड असते. जिथे स्वार्थ नसतो, खोटेपणा नसतो, फसवेगिरी नसते, अभिमान नसतो. बालपण म्हणजे आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ. ना काळजी, ना चिंता..! बालपण म्हणजे फक्त मज्जा असे समीकरण असते. पण आजकालच्या मुलांना बघून वाटते की, त्यांचे बालपण कुठेतरी हरवत चालले आहे. मी हे स्वत:च्या अनुभवावरुनच सांगते आहे.
मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करणे आवश्यक आहे, अशा आशयाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सतत वर्तमानपत्रात येत आहेत. हे ओझे कमी न केल्यास या कोवळ्या जीवांना पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास होऊ शकतो. आज भारतातील निम्मी लोकसंख्या ही तिशीच्या आतील आहे. आजची शाळेत जाणारी मुलं उद्याचा भारत घडविणार आहेत. त्यामुळे या मुलांना शाळा, अभ्यास यांचे दडपण न वाटता अभ्यासासाठी चांगले वातावरण मिळणे आवश्यक आहे. ही मुले सुदृढ आणि निरोगी हवीत. दप्तराच्या ओझ्यामुळे लहान वयातच जर या मुलांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास होत असेल तर ते गंभीर आहे. यासाठी या मुलांचे पाठीवरचे शाळेचे दप्तर हलके हवे.
याच भावनेतून गेल्या आठवड्यात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विलेपार्ले येथील काही शाळांमध्ये भेट देण्याचे ठरविले. शालेय शिक्षणमंत्र्यांनी व्यक्तीश: शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नेमके किती आहे हे पाहिले. दप्तराची वजन काट्यावर तपासणी करण्याची आतापर्यंतच्या शालेय शिक्षण मंत्र्यांची ही पहिलीच वेळ असावी. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या प्रसिद्धीची जबाबदारी माझ्याकडे असल्याने आदल्या दिवशी त्यांच्या कार्यालयातून मला या शाळा भेटीबाबत कल्पना देण्यात आली. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत त्यांचा हा दौरा होता. खरे तर मलाही उत्सुकता होती की, कसे बरे शालेय शिक्षण मंत्री मुलांच्या दप्तराचे ओझे तपासतील ? याच उत्सुकतेपोटी मी ठरल्याप्रमाणे विलेपार्ले येथे पोहोचले.
शालेय शिक्षण मंत्र्यांनी विलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले टिळक विद्यालयातील मराठी, इंग्रजी माध्यम आणि महानगरपालिकेच्या दीक्षित प्राथमिक मराठी शाळेला भेट देण्याचे ठरविले होते. आमची टीम नियोजनानुसार विलेपार्ले येथील दीक्षीत शाळेत पोहोचली. आम्ही पोहोचलो आणि शिक्षणमंत्री यांची वाट पाहत होतो. दरम्यान हा आगळावेगळा इव्हेंट कव्हर करण्यासाठी विविध वृत्तवाहिन्यांचे आणि वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तिथे हजर होते. साधारणत: सकाळी 10 च्या सुमारास शालेय शिक्षण मंत्री आले आणि त्यांनी शाळेत पोहोचताच पार्ले टिळक शाळेच्या मुख्याध्यापकांना पाचवी ते सातवीपर्यंतचे इंग्रजी आणि मराठी माध्यमांचे वर्ग दाखविण्यास सांगितले. काही वेळातच आम्ही सर्व वर्गांवर पोहोचलो. शिक्षण मंत्र्यांसह आम्ही सगळे प्रत्येक वर्गात जात होतो. प्रत्येक वर्गात गेल्यावर मुले उभी राहत. गुड मॉर्निग सर किंवा एक साथ नमस्ते असे म्हणत श्री. तावडे यांचे स्वागत करत होती. श्री. तावडे सुद्धा आपुलकीने त्या मुलांच्या स्वागताचा स्वीकार करीत होते.
मी विनोद तावडे... शालेय शिक्षण मंत्री. आज तुमच्या शाळेत आलो आहे, कशासाठी हे तुम्हाला माहीत आहे का, असा प्रश्न ते वर्गात विचारत होते. मात्र शिक्षणमंत्री आपल्या वर्गात कशाला आले आहेत याची विद्यार्थ्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे मुले निरुत्तर होत. मग स्वतः श्री. तावडे मुलांना सांगत की, तुम्ही शाळेत येताना पाठीवर जे दप्तर घेऊन येता, त्याचे ओझे नेमके किती आहे हे तपासण्यासाठी मी येथे आलो आहे. हे ऐकताच मुलांना आश्चर्य वाटत होते. ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
मुलांशी हा संवाद झाल्यानंतर दप्तराचे ओझे तपासण्यासाठी स्वतः शालेय शिक्षण मंत्री हातात वजनकाटा घेऊन वजन तपासत होते. सरासरी 4 ते 6 किलोपर्यंत दप्तराचे ओझे असल्याचे या पाहणीत त्यांच्या निदर्शनास आले.
वर्गावर्गात फिरत असताना श्री. तावडे अनेक मुलांशी बोलत होते, त्यांना विचारत होते की, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय करायला हवे? शाळेतील मुले सुद्धा आम्हाला आता टॅब द्या, आमची पुस्तके शाळेतच ठेवा, शाळेत आम्हाला लॉकर द्या, आमचे प्रोजेक्ट्स शाळेतच ठेवा, वेळापत्रकातील विषयानुसार तास कमी करा, अशा सूचनाही देत होते.
या मुलांशी संवाद साधताना मुलांचे दप्तर हातात घेताना श्री. तावडे सुद्धा शाळेच्या आठवणींमध्ये रमले. यावेळी त्यांनी वजनकाट्यावर मुलांचे दप्तरासह वजनही केले. वजन काट्यावर दप्तरासह उभे राहिलेल्या अनेक मुलांशी ते बोलत होते. ते सांगत होते की, तुम्ही आजकालची शाळेत जाणारी मुलेसुद्धा खूप बिझी असता. कारण तुम्हाला प्रचंड अभ्यास असतो. तुम्ही मुले खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करता. म्हणून आता शाळेत जाताना तुमचे दप्तर जड होते. पण शालेय शिक्षण मंत्री म्हणून मी तुमच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. श्री. तावडे मुलांना सांगत होते की, आमच्या वेळी आम्ही शाळेत नुसता दंगाच करायचो आणि खूप कमी वेळा अभ्यास करायचो. अनेकदा वर्गाच्या बाहेर उभे राहण्याची शिक्षा किंवा ओणवे उभे राहण्याची शिक्षा आपल्याला झाल्याचे त्यांनी सांगताच सगळी मुलं हसायची. श्री. तावडे त्या मुलांना म्हणाले की, मी नेहमी शाळेत जाणाऱ्या मुलांना न्याहाळतो. तेव्हा माझ्या लक्षात येते की, तुम्ही मुले काळाच्या अगोदरच मोठी आणि समजूतदार झाला आहात. यामध्ये तुमचे बालपण हरवते आहे. पण मी शालेय शिक्षण मंत्री म्हणून पुढील वर्षापासून म्हणजेच जून 2016 पासून तुमचे बालपण जपण्याची काळजी घेईन. श्री. तावडेंनी असे सांगताच मुलांनी खूप आनंदात टाळ्या वाजविल्या. सरासरी तुमच्या शाळेच्या दप्तराचे ओझे 4 ते 6 किलो आहे. हे कमी करण्यासाठी विषयांचे वेळापत्रक बदलता येईल का, सर्व भाषा एकत्र आणि गणित, विज्ञान अशी विभागणी करता येईल का, पुस्तकांचे चाचणीनिहाय विभाजन, सर्व विषयांची दर तिमाही अभ्यासक्रमानुसार परीक्षा, याबाबतही विचार करण्यात येईल, असेही शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले.
ज्या उद्देशासाठी शाळांचा दौरा होता, तो पूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी या शाळांचा फेरफटकाही मारला. मैदानावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही ते काही काळ रमले. मुलांना शाळेत येताना आनंद वाटला पाहिजे असे वातावरण तयार होणे आवश्यक असल्याचे सांगतानाच शालेय शिक्षणमंत्री म्हणून आपली ही जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले.

- वर्षा फडके

माहिती स्रोत: महान्यूज, बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५.© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate