অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'दिवाळी अंक' महाराष्‍ट्राचे सांस्कृतिक वैभव

'दिवाळी अंक' महाराष्‍ट्राचे सांस्कृतिक वैभव

'दिवा प्रतिष्‍ठान' ही दिवाळी अंकांच्‍या संपादकांची संघटना. या संघटनेचे 14 वे अधिवेशन शनिवार, दिनांक 16 सप्‍टेंबर रोजी पुण्‍यात महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेत संपन्‍न झाले. विविध विषयावरील परिसंवाद, चर्चासत्रे आणि दिवाळी अंक वाचक स्‍पर्धांचे पुरस्‍कार वितरण असा भरगच्‍च कार्यक्रम घेण्‍यात आला. या अधिवेशनास दिवाळी अंकांच्‍या संपादकांसह रसिकही मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

अधिवेशनाचे उद्घाटन उद्योजक भारत देसडला यांच्‍या हस्‍ते तर ज्‍येष्‍ठ साहित्यिक ल.म. कडू यांच्‍या उपस्थितीत झाले. ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे अध्‍यक्षस्‍थानी होते. दिवाळी अंक हे महाराष्‍ट्राचे वैभव आहे. दिवाळी अंक वाचणे संस्‍कृतीचे लक्षण होते. आजच्‍या काळात लोकांना मोबाईल घडवत आहे. जेव्‍हा आपण पुस्‍तक वाचतो तेव्‍हा आपल्‍यात आणि पुस्‍तकामध्‍ये कोणी नसतो. प्रत्‍येक पान आपल्‍यावर संस्‍कार करत असते. वाचनसंस्‍कृतीमुळे निर्णय घेण्‍याची क्षमता येते, अशा शब्‍दात ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. दिवाळी अंक हे महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचे भूषण आहे. दिवाळी अंकांमुळे अनेक साहित्यिक प्रकाशात आले. अनेकांना जीवन जगण्‍याची उमेद प्राप्‍त झाली, असे नमूद करुन त्‍यांनी आपल्‍या साहित्यिक वाटचालीतील अनुभव सांगितले.

महाराष्‍ट्राला व्‍यंगचित्रकारांची मोठी परंपरा असून वयाच्‍या 80 व्‍या वर्षीही प्रभाकर झळके यांच्‍यासारखे व्‍यंगचित्रकार उत्‍साहाने आपले योगदान देत असल्‍याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. 'दिवा प्रतिष्‍ठान' संपादकांच्‍या प्रश्‍नांवर काम करत असतानाच वाचकांसाठीच्‍या स्‍पर्धेचे आयोजन करुन पुरस्‍कार वितरण करते, याबद्दलही त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. ज्‍येष्‍ठ साहित्यिक ल.म. कडू यांनी दिवाळी अंकांचे महत्‍त्व कमी होणार नाही, असे नमूद करत नवनवीन विषयांवर दिवाळी अंक निघत असून त्‍यांचा खपही चांगला असल्‍याचे लक्षात आणून दिले. दिवाळी अंकांच्‍या संपादकांनी सांस्‍कृतिक गरजा आणि चौकटी विस्‍तारीत करण्‍याबद्दल विचार करावा, असे आवाहन केले. भाषा आणि चित्राची रेषा एकाच ताकदीने पावलावर पाऊल ठेवून चालल्‍या तर ते साहित्‍य दर्जेदार होते. संपादकांनी दिवाळी अंकातून चांगले लेखक, चित्रकार, वाचक निर्माण होण्‍यासाठी प्रयत्‍न करावे, असेही ते म्‍हणाले.

उद्घाटक भारत देसडला यांनी दिवाळी अंकांचे संपादक आणि शेतकरी यांची जातकुळी एकच असल्‍याचे सांगितले. शेतकरी निसर्गाने कितीही अन्‍याय केला तरी शेती करत असतो, हे या बळीराजाचे समाजावर एक प्रकारचे उपकारच आहेत. दिवाळी अंकांचे संपादकही वाचनसंस्‍कृती जपण्‍यासाठी तन-मन-धनाने प्रयत्‍न करीत असतात.

चंद्रकांत शेवाळे यांनी प्रास्‍ताविकामध्‍ये अधिवेशनाच्‍या आयोजनामागचा हेतू विशद केला. राज्यात बाराशेच्‍या आसपास दिवाळी अंक निघत असले तरी व्‍यावसायिक स्‍तरावर सुमारे तीनशे अंक निघतात. 1998 च्‍या सुमारास 'दिवा प्रतिष्‍ठान'ची स्‍थापना झाली. अंक किती छापावे, वितरण कसे करावे या प्रश्‍नांसोबतच वितरक, संपादक, प्रकाशक, लेखक आणि वाचक यांच्‍यामध्‍ये सुसंवाद निर्माण होण्‍यासाठी हे अधिवेशन नियमितपणे भरवण्‍यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

याच कार्यक्रमात दिवाळी अंक वाचक स्‍पर्धेच्‍या सन 2016 व 2015च्‍या पुरस्‍कारांचे वितरण करण्‍यात आले. सन 2016 चा सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा पुरस्‍कार राजेंद्र सरग यांना ज्‍येष्‍ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. सर्वोत्‍कृष्‍ट वाचकाचा प्रथम पुरस्‍कार रागिनी पुंडलिक (पुणे), द्वितीय पुरस्‍कार कल्‍पना चिंतामणराव मार्कंडेय (औरंगाबाद) आणि तृतीय पुरस्‍कार सौरभ साबळे (मलकापूर कराड) यांना वितरीत करण्‍यात आला. सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी दिवाळी अंकाचा पुरस्‍कार 'हास्‍यधमाल' या अंकाचे संपादक महेंद्र देशपांडे यांनी स्‍वीकारला. सर्वोत्‍कृष्‍ट लेखक पुरस्‍कार अमोल सांडे, सर्वोत्‍कृष्‍ट लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी लेखिका रेखा खानपुरे, सर्वोत्‍कृष्‍ट कवी पुररस्‍कार विलास कऱ्हाडे, सर्वोत्‍कृष्‍ट ज्‍योतिषविषयक दिवाळी अंक पुरस्कार (ज्‍योतिष ओनामा) पंडित विजय जकातदार, वाचकांनी निवडलेला सर्वोत्‍कृष्‍ट वैशिष्‍ट्यपूर्ण दिवाळी अंक पुरस्‍कार डॉ. सतीश देसाई संपादित 'पुण्‍यभूषण' या दिवाळी अंकास प्राप्‍त झाला.

सन 2015 चा सर्वोत्‍कृष्‍ट व्‍यंगचित्रकाराचा पुरस्‍कार प्रशांत कुलकर्णी, सर्वोत्‍कृष्‍ट वाचकाचा प्रथम पुरस्‍कार अलका संजय कुलकर्णी (नाशिक), द्वितीय पुरस्‍कार वैशाली सांडभोर (ठाणे) आणि तृतीय पुरस्‍कार जयश्री शंकरन (पुणे), सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी दिवाळी अंकाचा पुरस्‍कार अहमदनगरच्‍या 'धमालधमाका' या अंकाचे संपादक नसीर शेख यांनी स्‍वीकारला. सर्वोत्‍कृष्‍ट लेखक पुरस्‍कार प्रवीण दवणे, सर्वोत्‍कृष्‍ट लेखिका शुभा नाईक, सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी लेखक भा. ल. महाबळ, सर्वोत्‍कृष्‍ट कवयित्री पुररस्‍कार उषा मेहता, सर्वोत्‍कृष्‍ट ज्‍योतिषविषयक दिवाळी अंक पुरस्कार (भाग्‍यश्री संकेत) दत्‍तप्रसाद वेंगुर्लेकर यांना वितरित करण्‍यात आला.

प्रमुख पाहुण्‍यांचे स्‍वागत प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष विजय पाध्‍ये, कार्यवाह शिवाजी धुरी, चंद्रकांत शेवाळे आणि अरुण जाखडे यांनी केले. यावेळी 'दिवा प्रतिष्‍ठान'च्‍या आजीवन सदस्‍यत्‍व प्रमाणपत्राचे वितरण भारतभूषण पाटकर, महेंद्र देशपांडे, ह.ल. निपुणगे, ज्ञानेश्‍वर जराड, विनोद कुलकर्णी, सुनील गायकवाड, स्‍नेहसुधा कुलकर्णी, डॉ. अंजली पोतदार, नसीर शेख, डॉ. अरविंद संगमनेरकर यांना करण्‍यात आले. 'ग्रहांकित' या दिवाळी अंकांच्‍या चौथ्‍या आवृततीचे प्रकाशन करण्‍यात आले. यावेळी डॉ. सतीश देसाई, मसापचे कार्याध्‍यक्ष प्रा. मिलींद जोशी, मकरंद टिल्‍लू, श्‍याम भुर्के, ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार प्रभाकर झळके, विश्‍वास सूर्यवंशी यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सन्‍ना मोरे आणि सुनील गायकवाड यांनी केले.

दुपारच्‍या सत्रात 'दिवाळी अंक आणि विनोदी साहित्‍य' या विषयावर मसापचे कार्याध्‍यक्ष प्रा. मिलींद जोशी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली परिसंवाद झाला. यामध्‍ये 'आवाज'चे संपादक भारतभूषण पाटकर,ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार प्रभाकर झळके, विनोदी लेखक सुभाष खुटवड यांनी भाग घेतला. भारतभूषण पाटकर म्‍हणाले, 'आवाज'साठी एकेकाळी बाळासाहेब ठाकरे, त्‍यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी व्‍यंगचित्रे रेखाटली. व्‍हॉटस्अपसारख्‍या साधनांमुळे वाचनसंस्‍कृती लोप पावत चालली आहे, त्‍यामुळे इ-बुक सारख्‍या नव्‍या माध्‍यमांचाही वापर करावा लागत आहे. 'आवाज'साठी उत्‍कृष्‍ट साहित्‍य निवडीसाठी परीक्षण समिती असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी व्‍यंगचित्रांबाबत वाचक साक्षर झाले पाहिजे, असे मत व्‍यक्‍त केले. समाजात वावरत असतांना कान-डोळे उघडे ठेवायचे, वाचन करायचे. असे केले की आजू-बाजूच्‍या व्‍यक्‍तींच्‍या वागण्‍या-बोलण्‍यातून होणारा विनोद सहज लक्षात येतो, यामध्‍येच व्‍यंगचित्रांच्‍या कल्‍पना मिळतात. व्‍यंगचित्रात 'चित्र'ही असते आणि 'साहित्‍य'ही असते. भविष्‍यात व्‍यंगचित्रकार, विनोदी लेखक आणि वात्रटिकाकार यांचे एकत्रित संमेलन व्‍हावे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. व्‍यंगचित्र, विनोदी लेख, वात्रटिका हे निखळ हास्‍य निर्माण करतात, ते नैसर्गिक हास्‍य असते. कृत्रिम हास्‍यापेक्षा विनोदांतून निर्माण होणा-या हास्‍याचा आनंद वाचकांनी घ्‍यायला हवा, असे ते म्‍हणाले.

प्रा. मिलींद जोशी यांनी जीवनातील विनोदाचे महत्‍त्व सांगितले. जीवनात हास्‍य असलेच पाहिजे, जीवनाचे हसे झाले नाही पाहिजे, असे नमूद करुन आजही विनोदाला मागणी असून विनोदी लेखकांनी विनोदाकडे गंभीरपणे पहावे, असे आवाहन केले. विनोद कमी होणे, हास्‍य लोप पावणे हे सांस्‍कृतिक अधोगतीचे लक्षण असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

'दिवाळी अंक आणि कविता' या विषयावरील परिसंवादामध्‍ये डॉ. स्‍नेहसुधा कुलकर्णी, संतोष शेणई, मंगेश काळे, उध्‍दव कानडे, डॉ. मनोहर जाधव यांनी सहभाग घेतला. डॉ. स्‍नेहसुधा कुलकर्णी म्‍हणाल्‍या, कविता या वाङमय प्रकारास महत्‍त्वाचे स्‍थान असते. हा एक सर्वश्रेष्‍ठ वाङमय प्रकार आहे. कमी शब्‍दात गहन आशय सामावलेला असतो. कवितांमुळे दिवाळी अंकांचे सौंदर्य वाढते. संपादकांनी चोखंदळपणे कवितांची निवड करुन आपापल्‍या अंकांत स्‍थान द्यावे, संख्‍यात्‍मक विचार करण्‍यापेक्षा गुणात्‍मक विचार व्‍हावा, असेही आवाहनही त्‍यांनी केले.

'वाचकांच्‍या नजरेतून दिवाळी अंक' या विषयावरील चर्चासत्रात कल्‍पना बांदल, रागिनी पुंडलिक, प्रसाद सोवोनी, डॉ. अंजली पोतदार यांनी सहभाग घेतला. प्रकाश पायगुडे यांच्‍या अध्‍यक्षतेखालील संपादकांच्‍या चर्चासत्रात सुनिताराजे पवार, रुपाली अवचरे, ज्ञानेश्‍वर जराड, नसीर शेख, महेंद्र देशपांडे, ह.ल.निपुणगे यांनी भाग घेतला. प्रकाश पायगुडे म्‍हणाले, दिवाळी अंक काढणे म्‍हणजे 'शिवधनुष्‍य' उचलण्‍यासारखेच आहे. संपादकीय जबाबदारी आणि आर्थिक व्‍यवहार हे दोन्‍ही सांभाळणे तारेवरची कसरत असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. नवनवीन माध्‍यमांचे आक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत वाचनसंस्‍कृती टिकवून ठेवण्‍याचे काम दिवाळी अंक करीत आहे. दिवाळी अंक महाराष्‍ट्राचे सांस्‍कृतिक वैभव आहे. दिवाळी अंकांना ऐतिहासिक परंपरा असून तिचे जतन करण्‍याची जबाबदारी मराठी माणसावरच आहे.

लेखक: राजेंद्र सरग

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate