অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पत्रकारिता. . .पत्रकार अन् आजचं जग...

पत्रकारिता. . .पत्रकार अन् आजचं जग...

माध्यमांचं काम माहिती देणं, प्रशिक्षण, शिक्षण करणं, मनोरंजन करणं, प्रबोधन करणं असतं असं सांगितलं जातं. लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, त्यांच्या संवर्धनासाठी निर्भेळ वातावरण असण्याची गरज आहे. पत्रकारिता हा काही प्रामुख्यानं पैसा कमावण्याचा, नफा कमावण्याचा धंदा नसतो, असंही सांगितलं जातं. माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे, माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा म्हणून स्वीकारावं, असंही सांगितलं जातं.

पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, असंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वृत्तपत्राचं नावं ‘मूकनायक’ ठेवलं होतं. पत्रकारांनी लोकांना नवी दृष्टी द्यावी, लोकांना डोळस करावं. पत्रकारांनी लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा तटस्थपणानं करावी. त्यामुळे पत्रकार समाजातील काही घटकांच्या हितसंबंधांना धक्के देताना दिसतात. पण असे धक्के स्वीकारण्याची ज्या समाजाची मानसिकता नसते, तो समाज विकसित होऊ शकत नाही. माध्यमाने निरपेक्ष, पूर्वग्रहदुषितपणे विषय मांडू नयेत, अशीही अपेक्षा असते. त्यातून पत्रकार खरच आपलं कर्तव्य समर्थपणे जेव्हा पूर्ण करत असतो तेव्हा व्यवस्था त्यांच्या बाजुने उभी राहील, असे नाही. अनेक घटकांना सुखावताना काही घटकांची नाराजीही पत्रकारांना ओढवून घ्यावी लागते.

लोकशाहीवादी राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशातील पत्रकारांचे जीवन सुरक्षित राहिलं नाही. युद्ध, दहशतवादी संघटनांच्या कारवायांबरोबरच हितसंबंधांच्या आड येणाऱ्या पत्रकारांना मोठ्या प्रमाणात जीव गमवावा लागतो आहे. महाराष्ट्र सरकारनं देशात पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी कायदा मंजूर केला आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबतचा हा कायदा सध्या राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकारांना सुरक्षेचं कवच प्राप्त होईल. कम‍िटी टु प्रोटेक्ट जर्नालिस्ट (C P J) या जागतिक पातळीवरच्या संघटनेच्या 1992 पासून 2016 पर्यंत अहवालात जगभरात 1236 पत्रकारांच्या हत्त्या करण्यात आल्या आहेत. जगभरातील कारागृहात 259 पत्रकारांना डांबण्यात आलयं . त्यांचा आवाज बंद करण्यात आलाय. सिरिया, इराक, आफगाणिस्तान आणि लिबिया या देशातील अंतर्गत असंतोषाला पत्रकारांना बळी पडावं लागत आहे. यात मेक्सिमो, फिलिपाईन्स, रशिया या देशातील परिस्थिती फारशी चांगली नाही. संबंध जग सध्या अस्वस्थतेच्या, भितीच्या सावटाखाली आहे. शिवाय असं वाटावं अशी परिस्थिती असताना 6 जानेवारी या दर्पण दिनांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी पत्रकार दिनाच्या दिवशी आपण सर्वांनी सिंहावलोकन करुन पुढची वाटचाल करण्याची दिशा ठरवावी लागेल. पत्रकार बांधवांना पत्रकार दिनांच्या हार्दिक शुभेच्छा…

- यशवंत भंडारे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate