অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

''पेणचे गणपती'' आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड

''पेणचे गणपती'' आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड

पेण हे गणेशमुर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं शहर. शाडूच्या मातीच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर माहीत नाही असे महाराष्ट्रातील एकही गाव नाही. पेण शहर आणि तालुक्यात आजमितीस एक हजाराहून अधिक गणपतीच्या मुर्तींचे कारखाने आहेत. तब्ब्ल एक लाखाहून अधिक व्यक्ती या व्यवसायात या ना त्या स्वरुपात जोडला गेला आहे. साहजिकच इतकी मोठी रोजगार क्षमता या व्यवसायानं निर्माण केली आहे.

महाराष्ट्रातल्या गावागावात आणि घराघरात गणपतीच्या आगमनाची लगबग सुरु होते. तेव्हा पेण शहरातून गणपती बाप्पा रवाना झालेले असतात. वर्षभर इथले लोक हाच व्यवसाय करतात. वर्षभरातले ११ महिने मूर्तीकाम आणि शेवटच्या महिन्यात विक्री. असे या व्यवसायाचे स्वरुप. थोडक्यात, अकरा महिने आर्थिक गुंतवणूक, श्रम गुंतवणूक आणि शेवटच्या महिन्यात उलाढाल. असं गेली अनेक वर्ष सुरु आहे.

पेणमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याचं काम कसं सुरु झालं? या विषयी सांगताना श्री गणेश मुर्तीकार आणि व्यावसायिक मंडळांचे अध्यक्ष श्रीकांत वामन देवधर म्हणाले की, पूर्वी धर्मशास्त्रानुसार अंगणातील मातीची मूर्ती घडवून घरगुती गणेशाची स्थापना केली जायची. साधारणत: १८६० पासून पेणमध्ये भिकाजीपंत देवघर आणि बाबूराव देवधर तसेच बांदिवडेकर, सेष्टे आदी मंडळींनी मूर्ती बनविण्याच्या कामास सुरुवात केली. या मूर्त्या आकर्षक असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण तेंव्हा व्यावसायिक स्वरुप प्राप्त झालेले नव्हते. ज्याला आपण 'बार्टर सिस्टिम' म्हणतो त्या पद्धतीने हे व्यवहार होत होते. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिल्यानंतर मूर्ती कामाच्या या व्यवसायाला चांगले दिवस आले.

कोकणातून मुंबईत आणि काही प्रमाणात पुण्यात स्थिरावलेल्या भक्तांसाठी पेणच्या मुर्ती उपलब्ध असत. तसे महाराष्ट्रात अन्यत्रही गणेश मुर्तीकार होते आणि आहेत. परंतु पेण प्रसिद्ध होण्याचं हे एक कारण की, पेण हे मुंबई आणि पुणे या दोनही शहरांपासून सारख्या अंतरावर आहे. त्यामुळे इथे हा व्यवसाय खऱ्या अर्थाने रुजला. १९२० नंतर देवधरांची पुढची पिढी राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांनी या घरगुती व्यवसायाला कारखानदारीचे स्वरुप दिले. मग मजूरी, कारागिरी, इतर संलग्न कामे जसे रंगकाम, वाहतूक इ.साठी कामगारांची गरज भासू लागली. त्यातून स्थानिकांना जवळपास वर्षभर रोजगार मिळू लागला.

गणपतीची एक मुर्ती ही तब्बल २५ कारागिरांच्या हातातून जाते. १९८० नंतर याच शिकलेल्या कारागिरांनी स्वतःचे कारखाने सुरु केले. आज त्यातले अनेक प्रसिद्ध झाले आहेत. आपण ज्याला शाडू माती म्हणून ओळखतो, ही शाडू माती पेणच्या परिसरात उपलब्ध नाही. ती येते थेट गुजरात मधल्या भावनगर येते. सध्या बदलत्या काळानुसार या व्यवसायात अनेक बदल झाले आहेत. १९८० नंतर शाडू मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मुर्ती तयार होऊ लागल्या. कारण तुलनेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती या टिकावू असतात. त्यामुळे मुर्ती दूरवर पाठवणे शक्य होऊ लागले आहे. नंतर मोठ्या शहरात कच्च्या मुर्ती नेऊन तेथे त्यांच्यावर अखेरचा हात फिरवून त्या विकण्याची वेगळी बाजारपेठ तयार झाली. त्यामुळे पेण तालुक्यात कच्च्या मुर्ती तयार करणारे कारखानेही उभे राहिले. हमरापूर, जोहे याठिकाणी असे कारखाने आहेत मूळ मूर्ती जी मातीत बनवली जाते अशी मूर्ति तयार करणारे मात्र प्रत्यक्षात खूपच कमी लोक आहेत. याच मुर्तींवरुन नंतर त्याचा मोल्ड तयार करुन मुर्ती तयार केल्या जातात. त्यासाठी फक्त जुजबी कौशल्य आवश्यक असते. गणेश मूर्ती कलेत मुर्तीचे डोळे रंगवणे हे मोठे कसब आहे. ते कामही सरावलेले कलाकारच करतात. बाकी कामे मात्र कुणीही थोड्याश्या प्रशिक्षणानंतर करु शकतो.

गणेश मुर्तीचा हा व्यवसाय आता विदेशातही जावून पोहोचलाय. विदेशात स्थिरावलेली मराठी कुटूंब आवर्जून पेणला मागणी नोंदवून मुर्ती नेतात. श्री. देवधर हे स्वतः हा अनेक देशात जाऊन तेथे मूर्ती कलेच्या कार्यशाळा घेतात. मूर्तीकारांच्या पेणमधल्या या व्यवसायाला दीडशे वर्षाहून अधिक इतिहास आहे. बदलत्या काळात अनेक नवी आव्हाने या व्यवसायासमोर उभी राहतायेत. शाडू मातीच्या वापराला मर्यादा आहेत तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापराला आक्षेप आहे. अशाही परिस्थितीत व्यवसाय विस्तारत असताना हा व्यवसाय करणारी मंडळी सुखी आहेत, असे श्री.देवधर म्हणाले. कारण लोकांची गणपती बाप्पावरची वाढती आस्था.

आज गणेश मूर्ती कलेमुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात 'पेण' ची आणि पर्यायाने महाराष्ट्राचीही ओळख निर्माण झाली आहे. पेणचे गणपती हा एक स्वतंत्र ब्रॅण्ड झालाय.

लेखक: मिलिंद मधुकर दुसाने

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate