অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वसुंधरा वाचवू या !

वसुंधरा वाचवू या !

प्रस्तावना

विश्वातील समस्त जड-चेतन सृष्टीरचनेत कोणतीही वस्तू उद्येशहीन किंवा निरर्थक असत नाही. सूक्ष्मातिसूक्ष्म जीव-जंतुंपासून अजस्त्र श्वापदांपर्यंत, वाळुच्या सूक्ष्म कणांपासून प्रचंड पर्वतांपर्यंत, शेवाळवर्गीय वनस्पतींपासून ते अतिविशाल वटवृक्षांपर्यंत प्रत्येकाचे काही ना काही प्रयोजन असते. माणूस सोडला तर प्रत्येकजण प्रकृतीच्या नियमानुसार आपापले स्वभावगत वैश्विक कार्य करित असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या खार्‍या पाण्यापासून गोडया पाण्याचे मेघ तयार होतात. धरती माता आनंदीत हो‌ऊन मेघांकडून जल मिळविते. मेघांचे अमृत धरती मातेला सुपीक बनवते. तिच्या सृजन शक्तीने पृथ्वीवरील सजीवांचे पोषण होते.

वसुंधरा

ही वसुंधरा आपणांसारख्या प्राण्यांना, वनस्पतींना, मोठमोठया पर्वतांना, नद्या सागरांना धारण करते. धराच आपले संरक्षण करते, पालन-पोषण करते व प्रसंगी विनाशही करते. मोठमोठे पर्वत धैर्यशीलतेची शिकवण देतात. नद्या गतिशिलता व निर्मलता शिकवतात. वनस्पती आपल्याला धनधान्य, औषधी व प्राणवायू दे‌ऊन परोपकाराची आठवण करुन देतात. धरती सहनशीलतेचे मुर्तीमंत उदाहरण आहे. सृष्टीचा सर्वश्रेष्ठ प्राणी मणुष्य. सृष्टीचे सर्व वरदान त्याच्याचसाठी. परंतु, त्याचीही काही जबाबदारी आहेच ना. सृष्टीचे वरदान अभिशापामध्ये बदलू नये याची खबरदारी त्यानेच घेतली पाहीजे. वरदानांचा , सवलतींचा दुरुपयोग करण्याचा हक्क कोणालाही पोहचत नाही.

 

आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या ही आहे की भूमातेशी असलेले आपले भावनात्मक व संवेदनात्मक नातेच आपण विसरत चाललो आहोत. उपभोग घेण्या‌इतपतच आपला व तिचा संबंध आहे असे आपण वागत आहोत. सातत्याने जितका जास्त उपभोग घेता ये‌ईल तितका घेण्याकडेच आमचा हव्यास आहे. परंतु तिच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा विचारही आमच्या स्वार्थी मनास शिवत नाही, याला काय म्हणावे ? विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकास घडवता घडवता आपण वसुंधरेलाच भकास करीत आहोत याचे भानही आम्हाला राहत नाही. औद्योगिकरण व शहरीकरणाच्या झंझावातात टेकडयाच काय डोंगरही भू‌ईसपाट केले जात आहेत. वनस्पती जगताचे रक्षण संवर्धन करणे मानवाचे प्रथम कर्तव्य असताना त्यांची अक्षम्य उपेक्षा केली जात आहे. बेसुमार जंगल तोडीमुळे प्रचंड प्रमाणावर दरडी कोसळत आहेत. लागवडी योग्य जमिनीची धूप होत आहे. जलस्त्रोतांचा अंदाधुंद वापर, असमान वितरण, वाढते जलप्रदूषण गंभीर स्वरुप धारण करत आहे. प्राचीन कालखंडापासून निरंतर प्रवाहित नदीपात्रांचा संकोच केला जात आहे. अनैसर्गिकरित्या प्रवाह बदलले जात आहेत. म्हणूनच पावसाळ्यात महापूर तर उन्हाळ्यात कोरडीठाक नदीपात्रे पहावी लागत आहेत.

उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी आलेली महाविनाशकारी आपत्ती ही आपल्याच कर्माची फळे आहेत. भूमीगत व भूपृष्ठावरील पिण्यायोग्य पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जीवनासाठी अत्यंत आवश्यक तत्व असणार्‍या वायुचे प्रदूषणही भयावह पातळीवर पोहचले आहे. महानगरांमधून श्वास घेणे कठीण झाले आहे. सर्व नैसर्गिक संसाधनांची हिंसा करणारा सर्वात बुद्धीमान प्राणी मानव कोणत्या नशेत वावरतो आहे काही कळत नाही. भूमातेशी मानवीय, भावनात्मक, संवेदनशील संबंध दृढ करुनच वसुंधरा वाचवावी लागेल. हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असली पाहीजे.

 

सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर.
भ्रमणध्वनी: ९७६३६२१८५६

अंतिम सुधारित : 5/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate