অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विकास संवादाचे मंथन…

विकास संवादाचे मंथन…

आजचे माध्यम व संज्ञापन या विषयाचे भान जागृत करण्यासाठी नागपूरच्या पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने अमरावती येथे कार्यशाळा घेण्यात आली. हॉटेल ग्रेस इन च्या सभागृहात ‘मीडिया कार्यशाला-वार्तालाप’ कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्वच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेगवेगळ्या विषयांवर ज्येष्ठ पत्रकारांकडून व्याख्यान व प्रश्नोत्तरांतून संवाद, असे कार्यशाळेचे स्वरुप होते त्याचा हा वृत्तांत…

या कार्यशाळेत एकूण सहा सत्रे होती व त्यानंतर प्रश्नोत्तरांची वेळ. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तथा दै. जनमाध्यमचे संपादक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून दै. तरुण भारतचे निवृत्त संपादक सुधीर पाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी उपस्थित होते. या ज्येष्ठ पत्रकारांसह जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रमुख अनिल अग्रवाल, श्रमिक पत्रकार संघाचे सचिव रवींद्र लाखोडे, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक संजय आर्वीकर, पुणे आकाशवाणीचे उपसंचालक नितीन केळकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसार माध्यम कार्यशाळा आयोजित केल्यामुळे पत्रकारांना केंद्र शासनाच्या एका अभिनव उपक्रमासंबंधी अवगत होण्याची संधी मिळाली आहे, असे मत उद्घाटनपर भाषणात प्रदीप देशपांडे यांनी व्यक्त केले. वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकार परिणामकारक संवाद कसा साधू शकतो यावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी प्रकाश टाकला. पत्रकारांनी अभिव्यक्तीच्या नवीन माध्यमातून विकासाचा संवाद जनतेपर्यंत पोहोचवावा. नकारात्मक बातम्या पुरतेच मर्यादित न राहता, विकासात्मक बातम्या करताना विकासाचे प्रकल्प कोणते व त्याचा जनसामान्यांच्या भवितव्यासाठी काय उपयोग होईल याची माहिती व मांडणी पत्रकारांनी करावी. बातमीचे लेखन कौशल्य व बातमीच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. 1990 नंतर वृत्तापत्रामध्ये नव्या तंत्रज्ञानाने कसा बदल झाला, याबाबत त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले.

पत्रकारांनी राजकारणाच्या बातम्यांवर भर देण्याऐवजी सामाजिक मुद्यांच्या बातम्यांचा आपल्या पत्रकारितेत अंतर्भाव करावा. शासन राबवित असलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा. विविध विकास प्रकल्पांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवावी आणि त्या माध्यमातून त्यांचे जीवनमान कसे सुधारेल याविषयी सुध्दा जनजागृती करावी, असे मत माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी मांडले.

‘पत्रकारांची भूमिका स्थानिक वृत्त - राष्ट्रीय दृष्टीकोन’ या विषयावर इंडियन एक्सप्रेस दैनिकाचे नागपूर येथील वरिष्ठ संपादक विवेक देशपांडे यांनी व्याख्यान दिले. कोणतीही घटना किंवा संकल्पना या संदर्भात वस्तुनिष्ठ पद्धतीने तथ्य संकलन करून लेखन केल्यास बातमी लोकांपर्यत पोहोचण्यास मदत होते आणि ही एका जाणत्या पत्रकाराची जबाबदारी आहे. बातम्या लिहीताना किंवा वृत्तांकन करताना त्या वस्तुनिष्ठ व तथ्यपूर्ण असणे आवश्यक आहे यासंबंधी त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले. पत्रकारांनी शेतकरी आत्महत्येची बातमी करताना आकडेवारीवर विसंबून न राहता नेमक्या कारणांचा शोध घेऊन तसे उपाय सुचविले पाहिजेत. पत्रकारितेचे स्वरुप केवळ प्रथमदर्शनी वार्तांकनापुरते मर्यादित न राहता संशोधनातून अधिकाधिक तथ्ये जाणून घेतली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

‘आपत्ती व्यवस्थापन वृत्तपत्रे आणि समाज माध्यमांची भूमिका’ या संदर्भात महाराष्ट्र टाईम्स नागपूरचे विशेष प्रतिनिधी मंगेश इंदापवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपत्तीचे प्रकार, माध्यमांची भूमिका, आपत्ती काळातील संवाद याबाबत त्यांनी उदाहरण देऊन विवेचन केले. पत्रकारांनी किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या प्रतिनिधींनी एकच-एक दृश्य नेहमी दाखवून घटनेचे गांभीर्य घालवू नये. मदत कार्य व सहाय्यता टीमद्वारे मदतीचे काम सुरू असल्याचे चित्रीकरण दाखविले पाहिजे. एकंदरीत आपत्तीच्या वेळी मानवी दृष्टीकोन व संवेदना बाळगून वृत्तांकन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्ती घडली तेव्हा मदत कार्य करणारी टीम व मीडिया सर्वात पहिले घटनास्थळी पोहोचतात. अशावेळी आपत्तीत सापडलेल्या व्यक्तींना प्रथम मदत करावी. बातमी देत असताना मदत कार्याला (Rescue Operation) प्रथम प्राधान्य द्यावे.

सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका रजिया सुलताना यांनी महिला विकास आणि पत्रकारिता या विषयावर स्त्री विषयक प्रश्ना संदर्भात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे व ती प्रभावी कशी ठरते यावर त्यांनी आपले मत अनुभव कथनातून मांडले. समाजात महिलांचा सन्मान व समान अधिकार या विषयी लिखाण करणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत हेही त्यांनी सोदाहरणासह स्पष्ट केले. प्रत्येक वृत्तापत्रातून प्रसिध्द होणाऱ्या महिलांच्या विशेष पुरवणीबाबत त्यांनी कौतूक केले. वृत्तपत्राच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहनही त्यांनी कार्यशाळेतून केली.

बातमीचे सकारात्मक व नकारात्मक संदर्भ आणि त्याचे रचनात्मक पैलू पत्रकारांनी यशकथांच्या निर्मितीसाठी समजून घेणे आवश्यक आहे. यशकथा ह्या व्यक्ती महात्म्य वाढविणाऱ्या नसाव्यात तर त्या लोकोपयोगी व विकाससाधणाऱ्या असाव्यात, असे मत पुणे आकाशवाणीचे उपसंचालक नितीन केळकर यांनी ‘कृषी संकटाच्यावेळी यशकथांची समर्पकता’ या विषयावर व्याख्यान देताना व्यक्त केले. समाजाच्या शेवटच्या घटकाला यशकथा समजावी त्या अनुषंगाने त्याचा लाभ घेता यावा याकरिता यशकथेची भाषा ही साधी व सोपी असावी. ‘भारतीय जनसंवाद संस्था आणि विकास संवाद’ याविषयी भारतीय जनसंवाद संस्था अमरावतीचे विभागीय केंद्राचे प्रमुख नदीम खान यांनी भारतीय जनसंवाद संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची व उपक्रमांची माहिती दिली.

कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात अतिशय महत्त्वाचा तसेच सर्वांच्या चर्चेचा विषय तो म्हणजे वस्तू आणि सेवा कर कायदा. ‘वस्तू आणि सेवा कर कायदा-सकारात्मक पैलू’ या विषयावर अमरावतीचे अधीक्षक (सीजीएससटी) जी. बी. देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वस्तू आणि सेवा कर म्हणजे काय हे अगदी साध्या सोप्या भाषेत दैनंदिन गोष्टीचे उदाहरण देऊन उपस्थिताना समजावून सांगितले. ही सूंदर कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्वांनी आयोजकांचे आभार मानले. माझ्यासाठी ही कार्यशाळा अविस्मरणीय ठरली.

लेखक: विजय राऊत

माहिती स्रोत:महान्युज

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate