অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शालेय शिक्षणमंत्री बनले विद्यार्थ्यांचे मित्र आणि शिक्षक !

शालेय शिक्षणमंत्री बनले विद्यार्थ्यांचे मित्र आणि शिक्षक !


मंत्री आणि राज्यमंत्री यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना आणि बैठकींना उपस्थित राहणे आणि त्याचे वृत्तांकन करणे ही विभागीय संपर्क अधिकाऱ्याची जबाबदारी असते. कधी या बैठका मंत्रालयात होतात तर कधी बाहेर .... बुधवार 24 जून रोजी अशाच एका कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. मंत्री महोदयांचा दौरा आदल्या दिवशी कळतो आणि मग त्यानुसार पुढील दिवसाचे नियोजन करावे लागते. मंगळवारी रात्री आलेल्या नियोजित कार्यक्रमानुसार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे वडाळा येथील विद्यालंकार शैक्षणिक संकुलास भेट देणार आणि येथील विदयार्थ्यांशी संवाद साधणार, असा कार्यक्रम ठरला होता... बुधवारी सकाळी या कार्यक्रमाला जाण्याचे नियोजन करुन आम्ही विद्यालंकार संकुलात पोहोचलो.
कार्यक्रम बरोबर दहा वाजता सुरु होणार होता. पण शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे वेळेच्या काही मिनिटे अगोदरच या संकुलात पोहोचले होते. या संकुलात पोहोचल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री थेट ऑडिटोरिअम मध्ये पोहोचले. या ऑडिटोरिअममध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम शिकणारे अनेक विदयार्थी आणि शिक्षक आधीच उपस्थित राहून शालेय शिक्षण मंत्री यांची वाट पहात होते. ऑडिटोरिअममध्ये श्री. तावडे पोहोचताच त्यांचे स्वागत उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेपासून झाली आणि मग निवेदकाने नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या कॉलेजमधील विदयार्थ्यांनी उपस्थितांसमोर दीपयोग सादर केले. साधारण सात मिनिटाच्या या दीपयोगने उपस्थितांचे लक्ष वेधले असेच म्हणावे लागेल. शालेय शिक्षण मंत्री यांनीही या दीपयोगचे विशेष कौतुक केले. यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांचे स्वागत झाले आणि त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री यांनी विद्यालंकारला भेट देण्यामागचे प्रयोजन सांगितले. विदयार्थ्यांशी अधिकाधिक कनेक्ट होण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले. विदयार्थ्यांशी संपर्क साधताना, बोलताना व्यासपीठावर न बसता उभे राहून त्यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. विदयार्थ्यांशी बोलताना, त्यांची आताच्या शिक्षणाबाबत त्यांनी मते जाणून घेतली. विदयार्थ्यांना कोणत्याही विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी यावेळी त्यांनी दिली. मात्र असे करताना त्यांनी उपस्थित विदयार्थ्यांना समजावून सांगितले की, आज मी येथे तुमचा एक मित्र म्हणून आणि एक शिक्षक म्हणून आलो आहे.....
उपस्थित विदयार्थ्यांनी सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या सूचना पाळून त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. विशेष म्हणजे हे प्रश्न फक्त शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण या विभागापुरतेच सिमित न राहता सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा या विषयावर देखील विद्यार्ध्यांनी अनेक प्रश्न विचारले. चॉईस बेस्ड सिस्टीम, पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाचे फायदे-तोटे, फेरपरीक्षा, दूरस्थ शिक्षणाचे आणि परदेशी शिक्षणाचे फायदे-तोटे, आरक्षण पद्धती, इंजिनिअरीग आणि वैद्यकीय शिक्षणात असलेल्या संधी, तसेच अभ्यासक्रमावर आधारीत मिळणारी नोकरीची हमी अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी श्री. तावडे यांना प्रश्न विचारले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना श्री. तावडे म्हणाले की, एखाद्या शहराचा विकास आराखडा दर दहा वर्षांनी बदलतो. कारण त्या शहराची लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्येनुसार त्या शहराची रचना होणे आवश्यक असते. या रचनेमध्ये पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. आता याच धर्तीवर शिक्षणाचा आराखडा अभ्यासक्रमानुसार आणि मागणीनुसार दर पाच वर्षांनी बदलणे आवश्यक आहे. आपली भूमिका अधिक स्पष्ट करीत असताना त्यांनी लहान मुलांची बुद्धी कशी वेगवेगळे प्रयोग करणे, कृती करणे यावर भर देते याची उदाहरणे दिली. आजची मुले तंत्रज्ञानाला किती सहज आपलेसे करतात हेही त्यांनी यावेळी सांगितले. आजच्या शिक्षणाची पद्धत बदलते आहे. विद्यार्थ्यांमध्ये असाधारण चिकित्सक बुद्धी आहे. म्हणून पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकांवर आधारीत ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. म्हणूनच आगामी काळात शालेय शिक्षण मंत्री म्हणून अभ्यासक्रमात कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याचा आपला प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री म्हणून आपली अशी भूमिका मांडताच उपस्थित विदयार्थ्यांनी टाळया वाजवून श्री. तावडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांशी बोलताना श्री. तावडे यांनी थ्री इडियटस या चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटातील तीन तरुणांनी आपली आवड असणारे क्षेत्र निवडले, तसे प्रत्येकाने आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी श्री. तावडे यांनी थ्री इडियटस या चित्रपटाचा दाखला देताना सांगितलले की, या चित्रपटात यशस्वी झालेल्या रँचोने कधीही पाठांतर किंवा रट्टा मारुन यश मिळविले नाही, तर त्याने नेहमी त्याला जे आवडेल ते करण्यालाच पसंती दिली. प्रत्येक विद्यार्थ्यानेही अशाच पद्धतीने आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
दहावीची फेरपरीक्षा यावर्षापासून आणि बारावीची फेरपरीक्षा पुढील वर्षापासून एक महिन्याच्या आत घेण्याचा निर्णय घेण्यामागची भूमिका मांडताना शालेय शिक्षण मंत्री म्हणाले की, यापुढे शालेय अभ्यासक्रमात कोणताही विदयार्थी नापास होऊ नये, तसेच नापास असा शिक्का त्यांच्या आयुष्यात बसू नये हीच मानसिकता या निर्णयामागे होती. कोणतेही काम करताना ते मन लावून करा, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि चौकटीच्या बाहेर विचार करा अशी यशाची त्रिसूत्रीही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी यापैकी विद्यार्थ्यांनी आपल्याला नेमके काय व्हायचे आहे हे जाणून मग अभ्यास करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज राजकारणातही अनेक संधी आहेत आणि राजकारणातही चांगले करीअर करता येते त्यामुळे विद्यालंकारच्या विदयार्थ्यांनी आगामी काळात राजकारणात यावे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

-वर्षा फडके
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

माहिती स्रोत: महान्यूज, बुधवार, २४ जून, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate