অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस.....

शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस.....

15 जूनची सकाळ जराशी वेगळी होती.... त्याला कारणेही दोन होती.... एक तर प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या पावसाने दमदार हजेरी लावली होती आणि दुसरीकडे जागोजागी रस्त्यावर किलबिलाट दिसत होता. पण हा किलबिलाट पक्ष्यांचा नव्हता तर हा किलबिलाट होता विद्यार्थ्यांचा.. सकाळी सकाळी शाळेचा नवा गणवेश घालून, नवे दप्तर सांभाळत ही मुले शाळेत निघाली होती. गेले दीड-दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आजपासून अनेक शाळा सुरू झाल्या. त्यामुळे इतके दिवस ओस पडलेल्या शाळा गजबजल्या होत्या. नवे वर्ग.. नवे मित्र-मैत्रीण.. नवा अभ्यास.. नवे शालेय साहित्य घेऊन नवा ध्यास घेत विद्यार्थी आपल्या पालकांच्या मदतीने शाळेत पोहोचत होती. खरे तर शाळा म्हटले की आपसुकच अभ्यास आलाच... पण आज शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अभ्यासाचे टेन्शन काही या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.
आजपासून २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू झाल्या. शाळेचा हा पहिला दिवस चैतन्यमय आणि उत्साहवर्धक व्हावा यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे ठरविले. शालेय शिक्षण मंत्री यांनी यंदाच्या वर्षी म्हणजेच 2015-16 या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णयच घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी स्वत:ही केली. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते, असा विश्वास श्री. तावडे यांना वाटत असल्याने त्यांनी शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी स्वतः मुंबईतल्या काही शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे ठरविले. सकाळी 9 ते 10 यावेळेत त्यांनी दादरच्या राजा शिवाजी विद्यालयाला भेट दिली. सकाळी 9 च्या सुमारास शालेय शिक्षणमंत्री दादरच्या शाळेत पोहोचले. शाळेच्या आवारात पोहोचल्यावर श्री. तावडे प्रवेशद्वाराजवळच थांबले. प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे त्यांनी हसून स्वागत केले.
त्यानंतर काही वेळाने ते शाळेतल्या विविध वर्गात गेले. वर्गात गेल्यावर त्यांनी अनेक विदयार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचा अभ्यासक्रम कसा वाटतो, मोठेपणी कोण व्हायचे आहे? शाळेत यायचा कंटाळा आला का? शाळेत शिकवलेले समजते का? शाळेची वेळ योग्य वाटते का? शाळेत यायला मज्जा येते का? असे विविध प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. असे प्रश्न विचारत असतानाच आपण कोण आहोत हे माहित आहे का असे विचारताच काही विद्यार्थी गोंधळले, घाबरले... पण श्री. तावडे यांनी मात्र आपण विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री अशी ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली. या ओळखीनंतर आपण शाळेत का आलो आहोत हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितले. शिक्षणमंत्र्यांचा शाळेत येण्यामागचा हेतू कळताच विद्यार्थ्यांनी मग बिनधास्त उत्तरेही दिली. शालेय शिक्षण मंत्री यांनी या मुलांना सांगितले की, तुमच्या प्रत्येकामध्ये विविध कुवती आहेत. कुणाची तार गणितात जुळते, तर कुणाची नृत्यात ! कुणाची खेळाच्या मैदानात, तर कुणाची चित्रकलेच्या वर्गात ! दुर्दैवाने अभ्यास, परीक्षा, मार्क यांच्या पाठी पळणाऱ्या पालकांकडून आणि काही शाळांमधून या गोष्टींना तितकंसे महत्त्व दिले जात नाही. जेव्हा दिले जाते तेव्हा त्यामध्ये मुलांना निखळ आनंद उपभोगण्याऐवजी यशाची शिखर गाठण्याचे बाळकडू बळेबळे पाजले जाते.
शाळेत मुलांचे स्वागत केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल क्लास रुमच्या माध्यमातून संवाद साधला. हा संवाद साधताना अनेक विद्यार्थ्यांनी श्री. तावडे यांना मराठीसह हिंदी आणि इंग्रजीतूनही प्रश्न विचारले. शालेय शिक्षण मंत्री यांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य पोहोचले आहे का याबाबतही त्यांनी चौकशी केली. गणित या विषयात प्राविण्य असलेल्या महंमद अली याला भारतामार्फत अमेरिकेत पाठविण्यात आले होते. शालेय शिक्षणमंत्री यांनी यावेळी महंमद अली या मुलाचे विशेष कौतुक केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
राजा शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते पाचवीतील मुलांना मोफत पुस्तकांचे वितरणही करण्यात आले. शिक्षण मंत्री यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली शाळेत येण्याची भूमिका स्पष्ट केली. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच येणारे पुढील शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांना आनंददायी वाटावे यासाठीच आपण मुंबईतील काही शाळांना भेटी देण्याचे ठरविल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
काही वेळाने शालेय शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांशीही संवाद साधला आणि शाळेत येण्यामागचा उद्देश समजावून सांगितला. शालेय शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांनी दक्ष रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूला असे कोणी शिक्षणापासून वंचित असलेली मुले आढळल्यास त्यांची माहिती वर्ग शिक्षकांना द्यावी, वर्गशिक्षक सदर माहिती मुख्याध्यापकास कळवतील आणि मग मुख्याध्यापकांनी अशी माहिती आपणास कळविल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही श्री. तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळांमध्ये गणवेष, दप्तरं, डबा, पाण्याची बाटली घेऊन आईवडिलांचा हात धरून उत्साहात जाणारे विद्यार्थी दिसतात. या कार्यक्रमाचे मुख्य उदि्दष्ट म्हणजे मोठ्या सुट्टीनंतर शाळेत येणाऱ्या मुलांचे स्वागत करणे हा तर आहेच, पण याचबरोबर शाळा आणि अभ्यास याबाबत कोणतेही दडपण न वाटता हसत खेळत अभ्यास करावा आणि आपल्याला आवडेल ते क्षेत्र निवडावे, असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सांगितले.
मुळात शालेय शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे, तो मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांशी संवाद साधताना शालेय शिक्षण मंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी विषयाचा अभ्यासक्रम, विषयाचे शिक्षक, वेळापत्रक, परीक्षा या सगळ्यांचा विचार कराच पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा बुध्यांक वाढविण्यासाठीही प्रयत्न करा.
आजचा हा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम खरे तर विद्यार्थ्यांमधली शाळा याविषयीची भीती घालविणारा होता आणि मुळातच शाळेविषयी आपुलकी, अभ्यासाविषयी आवड, मित्र मैत्रिणीमध्ये आपुलकीचे नाते निर्माण करणारा होता असेच म्हणावे लागेल.....


-वर्षा फडके -

माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, १५ जून, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate