जर्मन प्रजासत्ताक संघराज्यातील (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी) पश्चिम बर्लिनमध्ये असलेले एक विद्यापीठ. स्थापना १९४८. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात बर्लिनसकट जर्मनीची पूर्व व पश्चिम अशी फाळणी करण्यात आली.
विद्यापीठाचे स्वरूप अध्यापनात्मक व सत्रपद्धतीचे आहे. पशुविकारविज्ञान, विधी, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान व समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, जर्मन भाषा-साहित्य, आधुनिक भाषाशास्त्र, नीतीशास्त्र, न्यायशास्त्र, विद्युत् अभियांत्रिकी, गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, औषधविज्ञान, वनस्पतिविज्ञान, भूविज्ञान इ. विषयांच्या अध्ययनाची सोय आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबर उन्हाळी सुटीचा काल असतो.
प. जर्मनीतील इतर विद्यापीठांप्रमाणेच याही विद्यापीठांत विद्यार्थ्यांना अध्ययनविषय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे ठराविक अभ्यासक्रम नसतो. प्रत्येक सत्राच्या प्रारंभी जे विविध विषय किंवा अभ्यासाची क्षेत्रे अध्यापकांनी आपल्या व्याख्यानांसाठी आणि परिसंवादासाठी योजलेले असतात, त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येते. त्या यादीतील व्याख्यानांना किंवा परिसंवादांना उपस्थित राहावयाचे, हे विद्यार्थी ठरवितात आणि त्यानुसार आपले वेळापत्रक तयार करतात. अशा प्रकारच्या आठ सत्रांनंतर विद्यार्थ्याला परीक्षेसाठी अर्ज करता येतो. परीक्षा-पात्रता ही विद्यार्थ्याने आठ सत्रांत मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या विशिष्ट संख्येवर अवलंबून असते. पदविकापूर्व, पदवी आणि पदव्युत्तर अशा तीन प्रकारच्या परीक्षा असतात. या सर्व परीक्षांसाठी विद्यार्थ्याला प्रबंध लिहावा लागतो.
वैद्यक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर एक परीक्षा द्यावी लागते व नंतरच पुढील चार सत्रांच्या शिक्षणक्रमास प्रवेश दिला जातो. दहा सत्रांच्या अध्ययनानंतर विद्यार्थी वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. पहिल्या परीक्षेत तीनदा अपयश आल्यास संबंधित विद्यार्थ्याचे नाव हजेरीपटावरून काढून टाकण्यात येते.
वैद्यकीय शाखेस १९६८ साली एक स्वतंत्र संस्था संलग्न करण्यात आली. तीत वैद्यकीय उपचारांबरोबरच वैद्यकीय अध्ययन, अध्यापन आणि संशोधन यांचीही सोय आहे.
विद्यापीठ विद्यार्थ्यांनी मोफत शिक्षण देते. याशिवाय होतकरू विद्यार्थ्यांनी विद्यापीठातर्फे शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. विद्यापीठात २४० प्राध्यापक व ३०,००० विद्यार्थी होते (१९८३–८४). विद्यापीठ व संलग्न महाविद्यालये यांचे संयुक्त ग्रंथालय असून तेथील ग्रंथालय असून तेथील ग्रंथसंख्या ८,३५,००० होती.
लेखक: के. एम्. शर्मा; म. व्यं. मिसार
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/31/2023
तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील अन्न...
ईजिप्तमधील एक प्रसिद्ध व प्राचीन इस्लामी विद्यापीठ...
उत्तर प्रदेश राज्यातील अलीगढ येथे १९२० मध्ये स्थाप...
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.