অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

भौतिकी व गणित या विषयांत मूलभूत संशोधन करणारी ही संस्था स्थापन करण्याची मूळ कल्पना होमी जहांगीर भाभा यांची असून ते बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक असतानाच १९४३ साली त्यांनी याबाबतीत पुढाकार घेतला होता. सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांनी सरकारच्या सहकार्याने जून १९४५ मध्ये ही संस्था स्थापन केली. मुंबईतील पेडर रस्त्यावरील एका लहान जागेत या संस्थेचे कार्य सुरू झाले. विश्वकिरण (अवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण), उच्च ऊर्जा भौतिकी व गणित या विषयांतील संशोधन कार्य संस्थेने प्रथम हाती घेतले. व्याप वाढल्यामुळे १९४७ साली ही संस्था द रॉयल यॉट क्लबच्या मोठ्या जागेत नेण्यात आली. संस्थेची सध्याची इमारत मुंबईच्या कुलाबा विभागात मोठ्या जागेत असून या इमारतीचे औपचारिक उद्‌घाटन १९६२ साली झाले. ही संस्था भारताच्या अणुऊर्जा खात्याच्या प्रशासकीय कक्षेत येते व याच खात्यामार्फत तिला अनुदाने मिळतात. या संस्थेतील अध्ययन व संशोधन यांची गणित व भौतिकी या विभागांत विभागणी केलेली आहे.

गणित विभाग : शुद्ध गणिताच्या विविध क्षेत्रांतील उच्च दर्जाच्या संशोधनाला उत्तेजन देण्याकरिता हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाची उत्तरोत्तर वाढ होत असून १९७४ साली त्यात ७० तज्ञ कार्य करीत होते. त्यांपैकी सु. निम्मे विद्यार्थी आणि उरलेले पीएच्.डी. पदवीनंतरचे संशोधन करणारे व प्रसिद्ध गणितीही आहेत. त्यांच्यामार्फत होणारी व्याख्याने व चर्चासत्रे तसेच सर्व जगातून योणाऱ्‍या अभ्यागत प्रसिद्ध गणित्यांची व्याख्याने यांभोवती या विभागाचे कार्य केंद्रित झाले आहे. त्यांपैकी बहुतेक व्याख्याने विभागाच्या लेक्चर नोटस् नावाच्या मालेत प्रसिद्ध होतात. जानेवारी १९७४ पर्यंत या विभागाने २७० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध केले आहेत. दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय गणितीय संघटनेच्या सहकार्याने या विभागातर्फे आंतरराष्ट्रीय परिषद भरिण्यात येते. आतापर्यंत अशा पाच परिषदा झाल्या असून पहिल्या चार परिषदांच्या कामकाजाच्या नोंदी प्रसिद्ध झाल्या आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बरोबरही या विभागाने सहकार्य सुरू केले असून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रगत अभ्यासक्रम आता बंगलोरला घेतले जातील. गणिताच्या पदव्युत्तर शिक्षणाशी संबंधित अशा बाबींविषयी मुंबई विद्यापीठाच्या प्रगत अध्ययन केंद्राशी सहकार्य करणे, भारतातील महाविद्यालयीन प्राध्यापक व संशोधक यांच्याकरिता उन्हाळी वर्ग भरविणे इ. कामेही हा विभाग करतो.

भौतिकी विभाग : या विभागामध्ये पुढील शाखांतील सैद्धांतिक व प्रायोगिक संशोधन कार्य चालते. त्या त्या शाखेत काम करणाऱ्‍या तज्ञांची १९७४ साली असलेली संख्या कंसात दिली आहे. (अ) शुद्ध भौतिकी उपविभागाच्या शाखा : उच्च ऊर्जा भौतिकी (१४), अणुकेंद्रीय भौतिकी (२८), घन अवस्था भौतिकी (२१) व सैद्धांतिक भौतिकी (४०). (आ) ज्योतिषशास्त्र व अवकाशविज्ञान उपविभागाच्या शाखा : सैद्धांतिक खगोल भौतिकी (११), रेडिओ ज्योतिषशास्त्र (१५) व विश्वकिरण भौतिकी (२७). (इ) अनुप्रयुक्त (व्यावहारिक उपयोगाच्या) भौतिकी उपविभागाच्या शाखा : संगणनशास्त्र व तंत्र (१०), सूक्ष्मतरंग अभियांत्रिकी (५), घन अवस्था इलेक्ट्रॉनिकी (७) व जलविज्ञान. (ई) रासायनिक व जीववैज्ञानिक उपविभागाच्या शाखा : रासायनिक भौतिकी (२१), रेणवीय जीवविज्ञान (२०) व तोंडाच्या कर्करोगासंबंधीचा खास प्रकल्प (१४).

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चटाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

संशोधन व अध्ययन यांना उपयुक्त अशा अनेक सोयी संस्थेने केलेल्या आहेत. संस्थेचे ग्रंथालय असून त्यात ३० हजार ग्रंथ व शास्त्रीय नियतकालिकांचे (जर्नलांचे) २० हजार खंड आहेत. ग्रंथालयात अशी ७५० नियतकालिके येतात. शिवाय अशा नियतकालिकांतून येणाऱ्‍या लेखांच्या व ग्रंथांच्या काही भागांच्या प्रसिद्धीपूर्व प्रतीही येथे येतात. हे ग्रंथालय रोज १५ तास व सुटीच्या दिवशी आठ तास उघडे असते. या संस्थेची सर्व सोयींनीयुक्त अशी स्वतःची कर्मशाळा असून तेथे इतर संस्थांची खास कामेही करून दिली जातात. संस्थेच्या काचशाळेतील कारागीर अतिशय कुशल असून विविध संशोधक गटांच्या गरजा ते भागवितात. तसेच इतर शैक्षणिक संशोधन संस्थांची कामेही तेथे केली जातात. नीच तापमान निर्माण करण्याची सोयही संस्थेने केली आहे. येथे दर आठवड्याला १,६०० लि. द्रवरूप नायट्रोजन (७०° के.) व दर तासाला ६ लि. द्रवरूप हीलियम (४° के.) बनविण्याची सोय आहे. दोन लक्षपट वर्धन करणारा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शन व दोन क्ष-किरण यंत्रे संस्थेत आहेत. स्फटिकांच्या संरचनेचा अभ्यास आणि जीवविज्ञान व धातुविज्ञान यांच्याशी संबंधित अशा वस्तूंचे अनुसंधान करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. संस्थेमधील वेगवेगळ्या उपविभागांसाठी लागणारी किरणोत्सर्गी (भेदक किरण वा कण बाहेर टाकणारी)  द्रव्ये तयार करण्यासाठी व त्यांच्या रासायनिक प्रक्रिया करण्यासाठीही एक प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा संस्थेच्या मुख्य इमारतीपासून दूर बांधलेली आहे. त्यामुळे किरणोत्सर्गी द्रव्ये सुरक्षितपणे साठविण्याची व हाताळण्याची ती आदर्श जागा असून प्रयोगांच्या जागी होऊ शकणारे संदूषणही ती दूर असल्याने टळते. ३·५ Mevइलेक्ट्रॉन रैखिक वेगवर्धक [⟶कणवेगवर्धक] व ३,००० क्यूरी शक्तीचा कोबाल्ट प्रारण उगम यांच्या साहाय्याने इलेक्ट्रॉन व गॅमा किरण यांच्या माऱ्‍याचा पदार्थांवर होणाऱ्‍या परिणामाचा अभ्यास करता येतो. नेहमी वापरात येणारी व्याख्यानांची अनेक दालने व चर्चासत्रांचे कक्ष संस्थेत असून भाभा सभागृहात १,००० जणांची बसण्याची व एकाच वेळी चार भाषांत व्याख्यान अनुवादित केले जाण्याची सोय आहे.

यांशिवाय पुष्कळ वर्षांच्या संशोधनामुळे कित्येक क्षेत्रांत संस्थेला एकमेवाद्वितीय स्थान प्राप्त झाले असल्याने संपूर्ण देशाला उपयुक्त अशा सोयीही संस्थेमुळे उपलब्ध झाल्या आहेत. या सोयी देशातील इतर संस्था व संशोधक यांना उपलब्ध होऊ शकतात. या सोयी पुढीलप्रमाणे आहेत. (१) राष्ट्रीय संगणक केंद्र : संगणक (गणित कृत्ये करणारे यंत्र), मिनिटाला १,२०० छिद्रित पत्रे वाचणारे दोन छिद्रित पत्र वाचक (पंचकार्ड रिडर्स), मिनिटाला १,२०० ओळी छापणारे जलद रेषामुद्रक, १२ चुंबकीय फीत विभाग, १·६ कोटी शब्दांची तबकडीरूप फाईल व आलेखलेखक या केंद्रात आहेत. खास प्रशिक्षित कार्यकर्ते या केंद्राची व्यवस्था पाहतात. या केंद्राचा वापर करू इच्छिणाऱ्‍यांना ते मार्गदर्शनही करतात. देशातील १०० हून जास्त संस्था याचा नियमितपणे वापर करतात. या केंद्राची स्थापना १९६४ साली झाली असून त्याची वाढ करण्याचे प्रयत्न चालू आहेत. (२) अवकाशात फुगे (बलून) सोडण्याचे केंद्र : प्राथमिक विश्वकिरण, क्ष-किरण ज्योतिषशास्त्र, वातावरणीय शास्त्रे इत्यादींच्या दृष्टीने उपयुक्त असा अभ्यास हवेत सोडल्या जाणाऱ्‍या फुग्याच्या साहाय्याने केला जातो. त्याकरिता संस्थेने हैदराबादजवळ हवेत फुगे सोडण्याचे केंद्र उभारले आहे. तेथे प्रयोगशाळा आणि निवासाची सोयही केलेली आहे. ८५,००० घ. मी.हून मोठ्या आकारमानाचे व ५०० किग्रॅ.पर्यंत वजन वाहून नेऊ शकणारे पॉलिएथिलिनाचे फुगे तयार करणे व सोडणे या केंद्रामुळे शक्य झाले आहे. या केंद्राचा वापर देशातील व परदेशातील संस्थाही करतात. अमेरिका, ब्रिटन व जपान येथील अनेक विद्यापीठांच्या सहकार्याने असे फुग्यांच्या उड्डाणाचे दोन विस्तृत कार्यक्रम येथे पार पाडण्यात आले आहेत. ऊटकमंड येथे संस्थेने एक रेडिओ दूरदर्शक उभारला असून त्यामुळे प्रगत संशोधनाची व तरुण शास्त्रज्ञांच्या प्रशिक्षणाची चांगली सोय झाली आहे. या क्षेत्रात रस घेणाऱ्‍या संस्थांना व विद्यापीठांना हा दूरदर्शक जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याची योजना आहे. तरुण शास्त्रज्ञांत या क्षेत्राविषयी गोडी निर्माण व्हावी व त्यांना रेडिओ दूरदर्शक वापरता यावा, या दृष्टीने ऊटकमंड येथे व्याख्याने व उन्हाळी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखण्यात येत आहे. या केंद्रावर संगणक व निवासाची सोयही आहे.

शिक्षण आणि प्रशिक्षण : या दोन्हीच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी संस्थेचे पुढील कार्यक्रम आहेत. प्रगत अध्ययनाचा व संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी गणित आणि भौतिकीच्या अनेक शाखा व त्यांच्याशी निगडित क्षेत्रे यांतील पदवीधरांसाठी अध्ययन कार्यक्रम संस्थेत आहेत. याकरिता दर वर्षी १५–२० अत्यंत हुशार विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश देण्यात येतो. त्याकरिता एम्.एस्‌सी. वा एम्.ए. पदवी व असामान्य शैक्षणिक कर्तृत्व या किमान पात्रता असून या कार्यक्रमानुरूप त्यांना सखोल प्रशिक्षण देण्यात येते. यात यशस्वी होणाऱ्‍यांना मुंबई विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी देण्यात येते. विद्यार्थ्याला कमाल ५ वर्षांपर्यंत आर्थिक साहाय्य मिळते. बाहेरील शिष्यवृत्त्या किंवा विद्यावेतन असणाऱ्‍या योग्य पात्रतेच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकतो. याशिवाय इतर नियमित अभ्यासक्रमही संस्थेत आहेत. पीएच्.डी. पदवीनंतरही सखोल अध्ययन करणाऱ्‍यांना अनुप्रयुक्त संशोधनाच्या क्षेत्रात संधी देण्यात येते. देशातील इतर विद्यापीठांतील व संस्थांतील शिक्षकांना आणि तज्ञांना संस्थेमध्ये पीएच्.डी.ची पूर्वतयारी करण्यासाठी येथे अल्पकाळ राहण्याची संधी मिळू शकते. मुंबई विद्यापीठातील आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील भौतिकीच्या प्राध्यापकांकरिता संस्थेमार्फत सुटीतील कार्यक्रम ऑगस्ट १९७१ पासून सुरू करण्यात आला असून त्याला विद्यापीठ अनुदान मंडळाचे आर्थिक साहाय्य मिळते. यानुसार दर वर्षी सु. ६ जणांना वर्षभर प्रशिक्षण देण्यात येते. भौतिकीच्या शिक्षणात सुधारणा व्हावी हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. भारतातील तज्ञांसाठी ही संस्था मुंबईत व मुंबईबाहेर दर वर्षी उन्हाळी वर्ग चालविते. त्या वेळी विविध क्षेत्रांत झालेल्या संशोधनाच्या प्रगतीवर चर्चा होते. बाहेरून येणाऱ्‍यांना मर्यादित प्रमाणात आर्थिक साहाय्य देण्यात येते. ही संस्था विद्यापीठ अनुदान मंडळाच्या साहाय्याने भारतातील सर्व विद्यापीठांमधील प्राध्यापकांसाठीही दर वर्षी उन्हाळी वर्ग भरविते. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शास्त्रीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने स्थानिक विद्यार्थ्यांपुढे व्याख्याने देणे, प्रात्यक्षिके करणे व दर वर्षी आंतरशालेय वैज्ञानिक प्रदर्शन भरविणे, या गोष्टी संस्था करते. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने अभ्यासक्रमात सुधारणा व शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमही संस्था हाती घेणार आहे. एम्.एस्‌सी. झालेल्या व नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी उन्हाळ्यात संस्थेतर्फे चर्चासत्रांचा व व्याख्यानांचा कार्यक्रम आखण्यात येतो. संशोधनामध्ये गोडी निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांना स्फूर्ती मिळावी, हा याचा मुख्य हेतू आहे. याला केंद्र सरकारचे आर्थिक साहाय्य मिळते. यांशिवाय जे शास्त्रज्ञ आपले संशोधन पुढेही चालू ठेवू इच्छितात अशा योग्य पात्रतेच्या शास्त्रज्ञांना संस्था तशा सोयी उपलब्ध करून देते. याच योजनेत अभ्यागतांसाठीही थोड्या जागा ठेवल्या आहेत. या नेमणुका वर्षाकरिता असून त्यांचे तीन वर्षांपर्यंत नूतनीकरण करता येते. इतर शिक्षण व संशोधन संस्थांतील वरिष्ठ तज्ञांच्या थोड्या कालावधीसाठी नेमणुका करण्याची सोयही संस्थेने केली आहे.

या संस्थेचा व्याप तर वाढला आहेच, परंतु आता तिला आंतरराष्ट्रीय कीर्ती व मान्यताही लाभली आहे. भारतातील अणुऊर्जा कार्यक्रमाच्या विकासात या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध वैज्ञानिक क्षेत्रांत स्वतंत्रपणे संशोधन करणारे पात्र शास्त्रज्ञांचे गट या संस्थेमुळे निर्माण होऊ शकले व त्यांच्यातील सहकार्याने विज्ञानाच्या आघाडीवर असलेल्या क्षेत्रात संशोधनकार्य होणे शक्य झाले आहे. भारतातील परिस्थितीत या गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारी अनुप्रयुक्त क्षेत्रे व तंत्रविद्या यांमधील पात्रताही संस्थेने मिळविली आहे.

मूलभूत संशोधन करणे व देशातील अतिशय बुद्धिमान तरुणांना मानवी ज्ञानाच्या अग्रभागी असलेल्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करून त्या क्षेत्रात कार्य करण्यास उत्तेजन देणे, हा संस्थेचा उद्देश आहे. तो साध्य करीत असतानाच औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा अनुप्रयुक्त संशोधनाच्या क्षेत्रांतही या संस्थेने अर्थपूर्ण भूमिका बजाविण्यास प्रारंभ केला आहे.

लेखक : अ. ना.ठाकूर

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/9/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate