मोबाईल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. देश, प्रदेश आदी सीमारेषा पुसट झाल्या आहेत. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. त्यातही विविधता येत आहे. दिवसेंदिवस मोबाईल मधील फीचर्स बदलत असून काळाशी सुसंगत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मोबाईल हा आजच्या काळातील प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटकच बनला आहे. एक अत्यावश्यक घटक ! संपर्क साधता यावा या दृष्टीने मोबाईल सारखे दुसरे जलद व प्रभावी साधन नाही. मोबाईल क्षेत्रातील नोकरी आणि व्यवसायाच्या संधींचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अगदी कुठेही मोबाईलच्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो. आज तर असे काही मोबाईल तंत्रज्ञान विकसित केले आहे की मोबाईल हँडसेटच्या त्या छोट्या स्क्रीनवर आपण संवाद साधलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहू शकतो केवढी ही मोबाईल क्रांती झाली आहे. भारतात मोबाईल आदी सेवा उपलब्ध होऊन तब्बल वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि मोबाईल धारक शंभर कोटी आहेत. या व्यवसायाचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे आणि जगभरातील अनेक कंपन्यांना भारतीय बाजारपेठ महत्त्वाची वाटते. भारतीय बाजारपेठेत अनेक मोबाईल कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन, जोडणी, वितरण, विक्रीपश्चात सेवा आदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो आहे. अनेकदा मोबाईल कंपन्या विक्रीपश्चात सेवा वर्षभर देत असतात. या सेवेसाठी त्यांना कुशल तांत्रिक मनुष्यबळाची गरज भासते. या सर्व बाबींचा विचार केला असता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र तरुणांसाठी लाभदायी ठरणारे आणि अखंड चालू राहणारे क्षेत्र आहे.
कोर्स
मोबाईल दुरुस्ती शिकवणाऱ्या संस्था देशभरात खूप आहेत. मोबाईल संबंधी अनेक कामे असतात पण दुरुस्तीचे प्रशिक्षण कमी खर्चामध्ये उपलब्ध होते. तसेच यातून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसे पाहिले तर मोबाईल दुरुस्ती या क्षेत्रात अजून कोणताही डिग्री कोर्स उपलब्ध नाही. कुठल्याही संस्थेमधून डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. या प्रशिक्षणाचा कालावधी तीन ते सहा महिन्यांचा असतो डिप्लोमा इन मोबाईल रिपेअरिंग अॅण्ड मेंटेनन्स आणि डिप्लोमा इन मोबाईल रिपेअरिंग इत्यादी कोर्सेसही फायदेशीर आहेत. तसेच डिप्लोमा कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त एक वर्षाचा असतो. तसेच प्रात्यक्षिकावर जास्त भर दिला जातो.
प्रवेश पात्रता
या कोर्सेससाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी भाषेची किमान ओळख हवी. काही ठिकाणी बारावी पास असणे अशीही अट असू शकते. नाबार्ड तसेच शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण बेरोजगार युवकांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असतात त्यामध्ये मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षणाचा अंतर्भाव असतो.
प्रवेश फी
प्रत्येक शिक्षण संस्थांची प्रवेश फी वेगवेगळी असू शकते. शक्यतो दहा ते पंधरा हजार या दरम्यान फी आकारली जाते. शासनमान्य संस्था असल्यास फी कमी असते. यामध्ये अभ्यासासंबंधी टूलही दिले जाते.
संधी
अनेक मोबाईल कंपन्यांच्या सर्विस सेंटरवर तंत्रज्ञ म्हणून नोकरी करता येते. पगार दहा ते पंचवीस हजारापर्यंत मिळू शकतो. तसेच स्वत:चा व्यवसाय देखील करता येतो. व्यवसायातून दरमहा पन्नास हजारापर्यंत कमवू शकता.
प्रशिक्षण संस्था
मोबाइल तंत्रज्ञान संस्था
- गुरुनानक रोड, डी / २, नूतन नगर, वांद्रे तलाव, वांद्रे (प), मुंबई, ४०० ०५०.
- मोबाईल तंत्रज्ञान अल्फा संस्था - सी-१५, सायबा खरेदी केंद्र, न्यू मिल रोड, कुर्ला (प.), मुंबई, ४०० ०७०.
- स्टार संस्था (मोबाइल, दुरुस्ती) मुंबई महापालिकेचे इमारत, स्टेशन आरडी , दिना बामा इस्टेट, भांडुप पश्चिम, मुंबई -४०००७८.
- महेंद्र टेक्निकल इन्स्टिट्यूट - ब/३ पहिला माळा, एम.बी.क्लासिक इमारत, चिंचवड स्टेशन, पुणे -४११०१९.
- मेमोन सेलफोन केयर मोबाइल ट्रेनिंग क्लास इन्स्टिट्यूट - चंदन नगर, पुणे, ४११०१४.
- ग्लोबल मोबाइल दुरुस्ती केंद्र - ७६७/ई, ६ लेन, शाहूपुरी कोल्हापूर – ४१६००१.
व्यवसाय करताना ही खबरदारी घ्यावी
- हे काम सूक्ष्म पद्धतीचे असल्याने काळजीपूर्वक करावे लागते.
- मोबाईलचे सुटे पार्टस् आणि संगणकाची माहिती हवी.
- बाजारपेठेत येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाची तसेच मोबाईलची माहिती ठेवणे आवश्यक.
- जागेची निवड योग्य प्रकारे करावी
देशात आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. तो नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्तीसाठी तो जवळच्या शॉपचा शोध घेतो. किमान किफायतशीर दरात तो दुरुस्त व्हावा अशी ग्राहकाची इच्छा असते. स्वतंत्र व्यवसाय करण्याची तयारी असेल तर हा व्यवसाय वाढत जाणारा आहे. भारत हा देश मोबाईलची जागतिक बाजारपेठ म्हणून विस्तारत आहे. मोबाईल तंत्रज्ञानात सतत होणारे बदल लक्षात घेता हा व्यवसाय कालानुरूप वाढेल असा विश्वास गुंतवणूक सल्लागारांना वाटतो. या व्यवसायात उत्पन्नाचे स्त्रोत अमर्यादित असतात. फक्त गरज असते उत्तम सेवा देण्याची.
लेखक - सचिन पाटील